श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘प्रश्न ???’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी 

ती अंथरुणावर खिळुन होती त्याला चार-पाच महिन्याचा कालावधी लोटला होता. निमित्त झाले होते ते पाय घसरून पडण्याचे.. साठी ओलांडल्यावर सावधपणे वावरावे लागते हे तिलाही ठाऊक होतं. ती तशी वावरतही होती. तरीही पाय घसरून पडली आणि सक्तीची कंटाळवाणी विश्रांती घ्यावी लागली..

असे खिळून, बसून राहणे तिच्या स्वभावातच नव्हतं…पण आताशा तिला उठावं, काही करावं अशी इच्छाच राहिली नव्हती. तशी ती एकटीच राहत होती. मुलं मुलांच्या जागी, मुलगी तिच्या घरी होती. ती घरात एकटी होती पण तरीही कामाच्या रामरगाड्यात दिवस निघून जायचा. सायंकाळच्या वेळी प्रपंचातून निवृत्त झालेल्या गल्लीतील दोन -तीन सासवा पाय मोकळं करायला म्हणून आपापल्या घरातून बाहेर पडायच्या त्या तिच्या दारातल्या कट्ट्यावर येऊन विसावायच्या.. ती ही दारात कट्ट्यावर येऊन त्यांच्या सोबत विसावायची.. पाय मोकळे होताना मनंही मोकळी होऊन जायची. ती एक श्रोता म्हणूनच त्यात असायची. तिला कधी मोकळं व्हावंसं वाटलेच नाही. भरभरून बोलावे, मन मोकळे करावे हा तिचा स्वभावच नव्हता. काय बोलायचे आणि का बोलायचे ? वर्तमान काळात काही बोलण्यासारखं नव्हते आणि भूतकाळ ? भूतकाळातले बोलून काही उपयोग नव्हता.

उपयोग नव्हता म्हणजे खरंच काही उपयोग नव्हता. एकतर कितीही बोलले, सांगितले, कुणी ऐकले तरी भूतकाळ काही परतून येत नाही.. त्यामुळे बदलता येत नाही. आणि दुसरे म्हणजे ‘परदुःख शीतल’ न्यायाने तिची वेदना, तिची सल कुणाला उमजतच नाही.. तिला पडलेला प्रश्न हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे असे पूर्वीही कुणाला, अगदी तिच्या आई-वडिलांनाही वाटलं नव्हतं.. मग इतरांना वाटण्याचा प्रश्नच उरत नव्हता.

“काय वाईट आहे गं.. राहायला घर आहे, नोकरी आहे, पोटापुरती शेती आहे.. तू अशी सावळी तरीही गोरागोमटा, शिकलेला, राजबिंडा नवरा तुला मिळालाय.. बाईच्या जातीला आणखी काय हवं असते गं.. ? “

तिची आई तिचे लग्न ठरवताना आणि नंतरही कितीतरी दिवस हेच म्हणत होती.. नंतर त्यात एक दोन वाक्याची भर पडत गेली होती.

तिच्या वडिलांनी तर केव्हापासून कान झाकून घेतले होते. त्यांनी ते उघडलेच नाहीत. तिला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यायचे सोडाच पण साधे ऐकून घ्यायची तसदी कुणी घेतली नव्हती.. लग्नाचे ठरवण्याआधीपासून तिच्या बाबांनी जमदग्नीचा अवतार धारण केला होता.. त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची प्राज्ञा नव्हती.. कुणाचे धाडस होत नव्हतं.. त्यांच्याजवळ नसले तरी एकदा ती आईजवळ म्हणाली होती..

“पण आई, मला खूप शिकायचंय…” 

“शिकायचंय.. शिकायचंय काय चाललंय गं तुझे.. शिकून तरी काय करणार आहेस ? आणि तुझं भलं बुरं आम्हांला कळत नाही ? आम्ही काय वैरी आहोत का तुझे ? … आणि हे बघ यांच्यासमोर एक शब्दही काढू नकोस यातला.. शिक्षणाचे नाव ही काढू नकोस.. आम्ही चार दिवस जगावं वाटत असलं तर गप्प बस.. ”

“पण आई.. “

“तुला गप्प बस म्हणून सांगितले ना एकदा.. “

चिडून आई म्हणाली.. ती गप्प झाली. ओठ घट्ट मिटून घेतले. पण मन ? मन तर स्वतःशी बोलतच होते.. या मनाचे ओठ कसे घट्ट मिटून घ्यायचे.. ? मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते.. एखादे मरणासन्न जनावर दिसल्यावर त्याच्या मरणाची आणि त्याच्यावर झडप घालण्याची वाट बघत गिधाडे जशी आकाशात घिरट्या घालत राहतात तसा तिच्या मनात एकच प्रश्न घिरट्या घालत होता.. तिच्यावर झडप घालून चोच मारत होता.. तेंव्हापासून.. आयुष्यभर.

काळ पुढं सरकत राहिला.. मुलगा झाला..

आई म्हणाली,

“भाग्यवान आहेस, घराण्याला कुलदीपक मिळाला.. जन्माचं सार्थक झालं. बाईच्या जातीला आणखी काय हवं असते गं ? “

आईच्या मुखातून बोलल्यासारखे शेजारी-पाजारी, नातेवाईक ही तसंच काहीतरी म्हणाले.

मुलगी झाली. आई म्हणाली,

“घरात लक्ष्मी आली.. बाईच्या जातीला आणखी काय हवं असतं गं.. ? “

जगाच्या दृष्टीनं सारं सुरळीत चालू असलं तरी ते तसं असतंच असं नाही. ‘दुरून डोंगर साजरे’ असं म्हणतात तसाच प्रकार असतो तो. तिची सारी स्वप्नं काचेसारखी तडकून, विखरून गेलेली, त्यांचा चुराडा झालेला.. जीवन म्हणजे स्वप्नांच्या चुराड्यावरची बोचरी शय्या. ती बोच दुसऱ्या कुणाला जाणवत नव्हती, दिसत नव्हती पण म्हणून तिला, तिच्या मनाला रक्तबंबाळ करत नव्हती असं नव्हतं.

नवऱ्याला बऱ्यापैकी नोकरी होती. पण त्याच्या मनमानी, लहरी स्वभावामुळे ती ही टिकली नव्हती. अतिशय स्वयंकेंद्रीत वृत्ती, बेजबाबदारपणामुळे त्याच्यावर कोणत्याच गोष्टीसाठी विसंबून राहण्यात, अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही हे तिला लग्नानंतर काही दिवसातच उमगलं होतं.

“मला पुढं शिकावं वाटतंय.. मी शिकू का ? “ 

तिनं भीत भीतीच नवऱ्याला विचारलं.

“कशाला ? गप्प घरात बसायचं.. माझ्यासमोर नखरे करायचे नाहीत.. स्वतःचं डोकं चालवायचं नाही.. एकदाच सांगतोय.. पुन्हा सांगणार नाही…समजलं का ? “

ती गप्प झाली. ‘पुढं शिकू का ? ‘ विचारलं त्यात नखरा काय होता ? ‘ हा मनात आलेला प्रश्न मनातच राहिला. असे कितीतरी प्रश्न मनातच राहिले होते. काही मनातून ओठांपर्यंत यायचे पण ओठांच्या दारातून बाहेर यायचे नाहीत.. दाराशी थबकायचे, दाराआडून बाहेर पहायचे.. पण बाहेर पडावे असे वातावरणच बाहेर नसायचे मग ते परत मनात जाऊन खळबळ माजवत बसायचे.. तिच्याबरोबर त्यांचीही चिडचिड व्हायची पण ती ही आतल्या आत..

“असे पूर्वी न्हवतं नाही.. ” 

एखादा प्रश्न तिला म्हणायचा.

‘हूँ ! ‘ ती स्वतःशीच बोलल्यासारखी हुंकारायची. मग त्याच त्या एका अनुत्तरीय प्रश्नाचा सर्प तिच्या मनाला वेटाळून बसायचा. तिचं मन मात्र भूतकाळात गेलेलं असायचं.

“बाबा, मलाही ताईसारखी सायकल पाहिजे. “

ताई माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर बाबांनी तिच्यासाठी सायकल आणली तेंव्हा ती बाबांना म्हणाली होती..

ताईची शाळा दूर आहे की नाही.. म्हणून तिला आणलीय सायकल.. तुझी शाळा तर घराजवळच आहे. तू त्या शाळेत जायला लागलीस की तुलाही आणूया नवी सायकल..”

बाबांनी मायेने तिची समजूत घातली. तिला ते पटलंही होतं. ताईची माध्यमिक शाळा गावाच्या दुसऱ्या टोकाला, तेही गावापासून काहीशी दूर माळावर होती. तिची शाळा तर अगदी घराजवळ होती..

क्रमशः भाग पहिला 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments