डॉ. जयंत गुजराती

❤️ जीवनरंग ❤️

☆ तुटलेली तार – – ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

नेहेमीप्रमाणे पहाटे पहाटेच जाग आली. तसे तडकच मियां अंथरूणातून उठून बसले. समोर कोपऱ्यात ठेवलेल्या सतारीस त्यांनी हात जोडून नमस्कार केला व एक दीर्घ उसासा सोडला. पहाटे पहाटे आन्हिकं उरकून रियाझाला बसायचं ही परंपरा वर्षभरापासून खंडित झालेली. एका सुबक कोरीव गोल लाडकी टेबलावर खोळ चढवून बसवलेल्या सतारीस केवळ फुलं वाहून, धूप दाखवून नमस्कार करणं एवढंच हाती उरलेलं.

पुरातन म्हणता येईल अशी ही सतार ही सुबक कोरीव देखणीच शिसवी. सहाव्या की सातव्या पिढीपासून घराण्यात असलेली ही सतार तशी सर्वांनाच पूजनीय. मियांसाठी तर ती जीव की प्राण! या सतारीने घराण्यास नावलौकिक मिळवून दिलेला. सहा सात पिढ्यांची पोटापाण्याची सोय सतारीने करून दिलेली. मंचावर सतार घेऊन बसलो व त्यावर बोटं फिरायला लागली की समोरचे रसिक मंत्रमुग्ध होणारच. ही हुनर पिढ्यानपिढ्या जोपासली गेलेली. इतर सतारीही घरी असलेल्या, परंतु या सतारीची गोष्टच वेगळी. लोकवायका आहे की कुणी सिद्ध साधुपुरूषाने प्रसन्न होऊन ही सतार प्रसाद म्हणून दिलेली. त्या सिध्ध पुरूषाला साक्षात सरस्वतीने ही सतार दिली होती अशीही वदंता आहे. मियांच्या घराण्यानेही मग सतार मानाने वागवलेली पिढ्यानपिढ्या.

लहान असल्यापासून मियांची बोटं सतारीवर फिरत आलेली. घराण्याचे कसब मियांनेही आत्मसात केलेले. पूर्वी राजघराण्यांकडून बोलावणे यायचे. बिदागी मिळायची. दोन घास सुटायचे. स्वातंत्र्यानंतर राजघराणी गेली. मग रसिकांनी संमेलने भरवायला सुरूवात केली. दिल्ली, ग्वाल्हेर, आग्रा, पुणे, कलकत्ता येथे जाहीर कार्यक्रम व्हायचे. क्वचित पूर्वाश्रमीचे राजे वा श्रीमंत घराणी खासगी बैठकीतून कलेला दाद द्यायची. तेवढाच मानसन्मान, पैका व मुख्य म्हणजे समाधान मिळायचे.

समाधान म्हटले की असमाधान ही येतंच आयुष्यात. पिढ्यानपिढ्या जपलेली सतारवादनाची परंपरा खंडित होते की काय ही परिस्थिती उद्भवलेली. एकुलता एक मुलगा इंजिनीयर झाला. सरकारी नोकरीतून रस्ते पूल बनवू लागला. सतारीला तर हातही लावला नाही. अब्बू अब जमाना बदल गया हैचा राग आळवत त्याने घराणेशाहीशी फारकत घेतली. तरीही होईल तितके कार्यक्रम करत नावलौकिक टिकवण्याचा आटापिटा मियां करत आलेले आता आतापर्यंत. नातूने वाद्ये हातात घेतली पण ती पाश्चात्य. इलेक्ट्रिक गिटार वाजवत असतो. बऱ्याच समूहांबरोबर कार्यक्रम ही करत असतो पण त्यात जान नाही हे मियांचं परखड मत. याने नावलौकिक मिळवता येत नाही. पोटापाण्याची सोय होते एवढंच. मंचावरची सजवलेली बैठक, समोर दर्दी रसिकांचा मेळा. ववादन होत असताना जाणकारांनी दिलेली उत्स्फूर्त दाद. खास जागांवर माना डोलावणं याची सर अन्य कोणत्याही कार्यक्रमाला नाही. बऱ्याच वेळा वाटायचं, बिदागीपेक्षा हे मोठं. कलेच्या परमोच्च सादरीकरणातला आनंद अमूल्यच. पण आता ते सगळं इतिहासजमा होतंय की काय याची धाकधूक वर्षभरापासून.

वर्षभरापूर्वीच एका कार्यक्रमात सतारीची तार तुटली. तार तुटण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बऱ्याचदा तारा तुटल्या, दुरूस्त करून झाल्या की सतारीतून सूर पूर्ववत उमटत असे. सतार दुरूस्त करणारे कारागीर ही पिढ्यानपिढ्या ठरलेले. वर्षातून एकदोनदा तरी त्यांची गरज पडे. सतार दुरूस्त होऊन आली की पुन्हा काही गवसल्याचं समाधान मिळे! वर्षभरापूर्वी तुटलेली तार दुरूस्त होऊन आलेली तरीही सतार पूर्वीसारखी सूर काढत नव्हती. माहित असलेले सर्व कसब पणाला लावूनही सतार रूसलेलीच. तारेवरचा ताण कमीजास्त करून पाहिला, खुंट्या पिरगाळून पाहिल्या, पण मनासारखे बोल उमटतच नव्हते. त्यातही डॉक्टरांनी मिंया तुम्हाला पार्किन्सन्स नावाचा आजार जडलाय. याची उद्घोषणाच करून टाकली. कंपवात. साठी जरी उलटलेली असली तरी ताठ बसणं अजूनही होत असलेलं. मांडी घालून एकाच जागी ही बसणं जमत असलेलं, पण रूसलेल्या सतारीस मनवणं जमत नसलेलं. मियां तुमच्या हातातील जादू आता संपलीय हे जेव्हा सतार दुरूस्त करणाऱ्या कारागिराने सांगितलं तेव्हा तर काळीज फाटून गेलं.

रोज सवयीप्रमाणे पहाटे उठायचं. सतारीस नमस्कार करायचा. गतवैभवाच्या आठवणी काढत दिवस ढकलायचा एवढंच हाती उरलेलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटेस लवकर उठायचं म्हणत मिंया निजले ते पहाटे सतारीतून उमटणाऱ्या सुरावलीच्या धक्क्यानेच. सूर तेवढे पक्के नव्हते पण बऱ्याच दिवसांनी उमटलेले सतारीचे बोल कानांना सुखावून गेले. मियां डोळे चोळतच उठले, पाहिलं तर नातू सतारीतून सूर जमवण्याच्या खटपटीत. तुटलेली तार पुन्हा सांधली जातेय की काय?! या विचाराने मिंयांचे डोळे डबडबले.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments