डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
अभिनंदन ! अभिनंदन !!
कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात आपल्या समूहातील जेष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना “ कलावंत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
आजच्या अंकात वाचूया “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ ही त्यांची कथा. (भाग दुसरा).
☆ तुला शिकवीन चांगलाच धडा… भाग – २ ☆
(नीताचे फायनल इयर होते. परीक्षा होती म्हणून ती माहेरपणाला आलेली ” काय गं नीता, अशी मलूल का दिसतेस ? तुझ्या सासरी सगळं व्यवस्थित आहे ना ?” आईच्या प्रेमळ शब्दांनी नीताच्या संयमाचा बांध फुटला होता.) – इथून
” उगी उगी बाळ, रडू नकोस. काय झालंय ते मला व्यवस्थित सांग ” नीताने सगळी हकीकत सांगितली.
” बेटा, जीवन हे असेच असते. घर, कुटुंब आम्हां स्त्रियांनाचं सांभाळावं लागतं प्रसंगी नवर्याची नवरेशाही ही खपवून घ्यावी लागते. आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, माहेरच्या घराण्याचंही नाव उज्वल करण्यासाठी स्त्रियांना हे हलाहल प्राशन करावंच लागतं बाई. पण तू घाबरू नकोस. एखादं मूलबाळ होऊ दे. तुझा त्रास बराच कमी होईल कारण मूल हे आईवडिलांना जोडणारा एक भक्कम दुवा असतो. पोरी सर्व ठीक होईल. अशोक तर चांगला वागतो ना तुझ्याशी “
” नाही आई, खरं दुखणं तिथेच आहे. अशोकला दारूचं व्यसन आहे आई. कामानिमित्त मित्रांसोबत घ्यावं लागत हे त्याचं सांगणं, ” इट इज अ सोशल ड्रिंक, मी जर मित्रांसोबत प्यायलो नाही तर माझा त्यांच्याशी संपर्क तुटेल व पर्यायाने माझ्या कामावर, माझ्या बिझनेसवर परिणाम होईल. आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी मला हे करावंच लागणार हे तो ठासून सांगतो “. ” असेलही बाई तसं. पण तुला तर तो त्रास देत नाही ना ? ” आई कसं सांगू तुला. रात्री अपरात्री त्याचं येणं. दारूचा तो उग्र दर्प आणि अशा अवस्थेत त्याची पत्नीसुखाची अपेक्षा. किळस येते मला या सर्व गोष्टींची.
नीताची आईसुद्धा मुळापासून हादरली. नीताच्या वडिलांच्या कानावर तिने ही गोष्ट घातली. ” अहो फसवणूक झालीय आपली. आपण चौकशीही नीट केली नाही. मुलाचं शिक्षण, नोकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली आपण, पण ही चौकशी नाही केली. फुलासारखी कोमल माझी नीता. कसं होणार हो तिचं ? ” शांत हो मीनाक्षी. जे घडतंय ते विपरीतच आहे. पण हा प्रसंग संयमानं हाताळायला हवा आम्हांला. नीताला मजबूत बनवा तुम्ही. सबुरीनं घेण्याचा सल्लाही द्या, आणि होय एखादं मूल झालं कि कमी होईल निश्चितपणे तिचा त्रास. “
नीताच्या बि. काॅम फायनल इयरचा निकाल लागला. नीता विद्यापीठात प्रथम आली होती. तिला सुवर्णपदक ही मिळाले आणि या आनंदात आणखी एक आनंदाची बातमीही तिच्या जीवनात आली. नीताला कडक डोहाळे लागले. पाणीही पचेनासे झाले.
” मीनाक्षी मी सांगितलं होतं ना सगळं चांगलं होईल. नीता अशोकमधला दुरावा आता नक्कीच कमी होईल. कुटुंबाची जवाबदारी वाढल्यानं त्याचंही व्यसन कमी होईल. घराची ओढ वाढेल. येणारं हे मूल त्यांच्यातील हा सेतुबंध नक्कीच घट्ट करील. आता तुम्ही आजीबाई होणार. सगळी तयारी आतापासून करायला हवी. ” ” होय आजोबा, मी तर करीनच सगळी तयारी, तुम्हीही हातभार लावा ” ” नक्कीच लावणार. प्रमोशन होणार आहे माझं. मी आजोबा होणार. इवलं इवलं नातवंडं घरात येणार. त्याच्या बोबड्या बोलांनी घरात मधुर वातावरण निर्माण होणार, त्यासाठी मी मदत केलीच पाहिजे. काय पाहिजे तुला, सगळी यादीच करून दे मला. आणून देतो सगळं.
” आतापासून नको काही आणायला. अपशकून असतो तो. बाळ जन्मल्यावरच करा तुम्ही सगळी धावपळ ” म्हणत मीनाक्षी खळखळून हसली.
नव्या जीवाच्या चाहुलीनं नीता मनोमन खूष झाली होती. अंगोपांगी बहरली होती. आपल्या शरीरात एक अंश जोपासत होती. ” खरंच सगळं चांगलं होईल, माझे दिवस बदलतील ” नीताचा आत्मविश्वास वाढला होता. पण स्वप्नरंजन आणि वास्तवस्थितीत फरक असतोच. अशोकची सुधारण्याची चिन्हे दिसेनात. आता तर तो नीताचा मानसिक छळ तर करीत होताच पण शारीरिक हिंसाचारावरही तो उतरला होता. ” काय चुकलं हो माझं ? कां म्हणून तुम्ही असे वागता माझ्याशी ? तुमची सेवा करते. तुमच्या आईवडिलांची सेवा करते ” ” मग उपकार करतेस कि काय आमच्यावर. सुनेचं कर्तव्यच असतं ते. ” ” मी तर माझं कर्तव्य करतेच हो. पण तुम्ही मात्र तुमचं कर्तव्य विसरत आहात. घरात नवीन पाहुणा येणार आहे. मला खूप शारीरिक थकवा वाटतो. काही खावसं वाटत नाही. अन्न पचत नाही. पण तुम्ही डाॅक्टरांकडे नेणं तर सोडाच साधी माझी मनधरणीही करीत नाहीत ” ” आम्ही तुझी काळजी घेत नाही हे कसं काय म्हणू शकते तू ?” ” कसं काय म्हणजे ? खरं तेच तर सांगितलंय. ” ” थोबाडं फोडून टाकीन पुन्हा वर तोंड करून बोलशील तर ” म्हणत अशोकने एक सणसणीत तिच्या गालावर ठेवूनच दिली. नीता कोलमडली. बाजूच्या सोफासेटचा तिनं आधार घेतला म्हणून बचावली, नाहीतर खालीच कोसळली असती. अशोक तडक खोलीतून निघून गेला. नीता मुसमुसत राहिली.
अशोकचं नीताचा छळ करणं चालूच होतं. त्याचे आईवडिलही त्याचीच री ओढायचे. अशा स्थितीत नीतानं करावं तरी काय ? आईवडिलांना किती टेन्शन देणार. याचा व्हायचा तोच परिणाम झालाच. शारीरिक आणि मानसिक छळापायी एक दिवस नीताच्या पोटात तीव्र वेदना उठल्या. नीता धाय मोकलून रडू लागली तेव्हा तिच्या सासूबाईनं तिला दवाखान्यात नेलं. नीताचा रक्तस्त्राव सुरू झाला होता आणि रक्ताच्या या प्रवाहात तो मांसल गोळाही केव्हाच निसटला होता.
” किती उशीर केलात तुम्ही ? आणि मुलगी गरोदर असतांना डाॅक्टरांचा सल्ला घेणं, नियमित गर्भाची तपासणी करणं, त्याची वाढ योग्य दिशेनं होतेय कि नाही हे पाहाणं, आईच्या शरीरात काही कमतरता असेल तर त्याची भरपाई करणं आणि जोडीला औषधांची मदत घेणं, हे तुम्हांला माहित नाही काय ?तुम्ही तर मोठ्या आहात ना घरातील, दोन मुलांच्या आई. मग सुनेकडे लक्ष देऊ नये ? आता नुकसान कोणाचं झालं ? तुमच्याच वंशाचा अंश होता ना तिच्या पोटात. जन्माला येणारा जीव जन्माआधीच गेला की निघून “.
नर्स पेशंटला आँपरेशन थिएटरमध्ये घ्या. अँनेस्थेशियासाठी डाॅ. विमलला फोन करा. गर्भाचं सॅक काढावं लागेल. पोटातील सफाई व्यवस्थित करावी लागेल. जा लवकर कर सगळं “. म्हणत डाॅ. शुभाने नर्स मीराला पाठविले.
नीताच्या दुःखाला पारावार नव्हता. जन्माआधीच तिच्या पोटातील नवांकुर निघून गेला होता. रिते पोट, रिते शरीर, रिते मन घेऊन नीता घरी परतली ती जणू दुखणं घेऊनच. तिला जेवण आवडत नव्हते. पोटात अन्न नसल्याने सारखे चक्कर येत असत.
” मी नीताला माहेरपणासाठी घेऊन जाते. तिथे करीन मी तिची ट्रीटमेंट ” नीताची आई मीनाक्षी बोलत होती. नीताच्या सासूला तर ते हवंच होतं. आजारी सुनेची सेवा करणं तिला त्रासदायक वाटत होतं. ” घेऊन जा तिला आणि चांगली बरी झाल्यावरच पाठवा “.
— क्रमशः भाग दुसरा
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]