सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ सायसाखर… भाग-२ – लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
(प्रसंगपरत्वे जुनी गाणी गुणगुणत, स्तोत्रे म्हणत आणि सवड झाली की असेल, मिळेल, दिसेल ते पुस्तक वाचत बसलेली असायची. त्यातूनच तिचं जीवनविषयक तत्वज्ञान बनत गेलं होतं.) – इथून पुढे
सगळे सण आमच्याकडे आईच्या स्पर्शानं पावन व्हायचे.
प्रत्येक सणाला खास काहीतरी असायचं.
मग कधी ते ठिपक्यांच्या रांगोळीत दिसायचं. कधी गणपतीत आरास करताना दिसायचं. दिवाळीत आकाशकंदील तयार करताना दिसायचं.
आम्हाला गणपतीच्या मूर्तीला हात लवायला परवानगी नसायची. पण चतुर्थीच्या आधल्या सायंकाळी मूर्ती घरी आली की आईबरोबर मूर्ती बघताना मजा वाटायची.
अण्णांच्या नकळत आई गणपतीला औक्षण करायची, त्याच्या गालावरून हात फिरवायची. रंगसंगतीचं कौतुक करायची. उंदीरमामाला गोंजारायची. बाप्पाला जपून आणलं म्हणून त्याच्यासमोर गूळ ठेवायची.
गणपती विसर्जनाच्या दिवशी ती रडवेली व्हायची, म्हणायची, ” चेहरा बघ कसा उतरलाय तो. जपून जा बाबा, आणि पुढल्या वर्षी लवकर ये “
गणपतीच्या दिवसातल्या प्रत्येक दिवसाच्या भावना ती बोलून दाखवायची. गणपतीवर मानवी भावभावनांचं आरोपण कसं करायचं, ते तिनं शिकवलं.
– त्या दिवशी न्हाणीघरात रडण्याचा आवाज आला म्हणून मी बघायला गेलो तर, वाडीतली दरडातली लक्ष्मी रडताना दिसली.
आई तिला बडबडत होती.
“– रानडुकराचं मटण खायची गरज होती काय त्याला ? आठलीडोंगरातून अख्खा गाव त्या डुकराचा माग काढत होता. त्यात सगळा दिवस घालवलात, आणि वाट्याला काय आलं, तर वाटीभर मटण. ते सुद्धा पचवता आलं नाही, मग हे असं होणारच… “
आईनं मग तिला कसलं तरी झाडपाल्याचं औषध दिलं.
दोन दिवसांनी पुन्हा लक्ष्मी आली.
” आता काय झालं ? “
” पोराच्या तोंडास चव नाय. “
आई आत गेली.
आणि चांद्याच्या पानांचा द्रोण तयार करून त्यात लिंबाचं लोणचं घालून दिलं.
” कायतरी मटण म्हावरं खाता नी आजारी पडता, त्यापेक्षा गरम भात, वरण खायला दे. “
ती बडबडत म्हणाली. लक्ष्मी निघून गेली पण खाण्यावर नेमकं भाष्य करून गेली.
आमच्याकडे प्रघातच पडून गेला होता. कुणी आजारी पडला की हमखास आमच्याकडल्या लोणचं, मिरचीला पाय फुटायचे.
कधीकधी मी रागावायचो.
मग ती म्हणायची,
” आपल्याला देवानं काही कमी दिलेलं नाही. आणि मी तरी माझ्याकडचं कुठं काय देते ? जे देवानं दिलं, त्यातलंच तर मी त्यांना देते. “
असं काही आई सांगू लागली की राग पळून जायचा.
– आई अशी कुठून कुठून मनात उगवत राहिली.
कधी हौसेनं लावलेल्या हापूसच्या कलमांना स्वतः कळशीनं पाणी शिंपून निगराणी करणारी आई…
देवाला वाहण्यासाठी, अण्णांना भरपूर फुलं लागतात म्हणून स्वतः फुलझाडं लावून, झाडं बहरली की आनंदी होतानाची आई…
पासष्टच्या चक्रीवादळात झाडांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर कोलमडून गेलेली पण पुन्हा तितक्याच जिद्दीनं उभं राहण्यासाठी खंबीर बनलेली आणि आम्हाला खंबीर बनवणारी आई…
शिमग्यात पालखी नाचवणाऱ्यांचे खांदे सोलपटून निघाल्यानंतर त्यांना लोणी हळद देणारी आई…
एका शिमग्यातल्या आईचं रौद्ररूप अजून आठवतं.
आईचं आणि अण्णांचंसुद्धा.
गावकऱ्यांना शिमग्यात मोठी होळी, तीसुद्धा आंब्याच्या झाडाची लागायची.
दरवर्षी अशी अनेक झाडं तोडली जायची.
त्यावर्षी आमच्याकडील झाड तोडायला गावकरी पहाटे चारच्या सुमारास आले.
ढोल ताशांच्या आवाजाने आम्ही जागे झालो.
सगळे गावकरी आमच्या आवारातील मोठे झाड तोडायला आले होते.
आम्ही सगळ्यांनी विरोध केला, पण ते कुणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
कधी न भांडणारे आई अण्णा खूप भांडले, रागावले, झाड तोडायला विरोध केला. पण काही उपयोग होत नव्हता. शेवटी आईनं मला पुढं ढकललं, म्हणाली, ” जा त्या झाडाला मिठी मारून उभा राहा, तुला तोडल्याशिवाय त्यांना आंब्याला हात लावता यायचा नाही, जा, बघतोच आम्ही आता, ते काय करतात ते. “
आईचं हे असं रुद्ररूप मी कधी पाहिलंच नव्हतं.
मी तिरिमिरीनं पुढं झालो आणि त्या झाडाला घट्ट मिठी मारून उभा राहिलो.
पुढं काय होईल याचा विचारसुद्धा मी केला नाही. बिथरलेले आणि झिंगलेले गावकरी काय करतील याचा अंदाज नव्हता.
आणि तसंच झालं.
दोन चार गावकरी कुऱ्हाडी घेऊन पुढे आले. सगळ्यांचा श्वास अडकला. ढोल वाजवणारे अचानक थांबले. काहीतरी भयंकर घडणार याची कल्पना आली.
इतकावेळ भांडणारे, बडबडणारे गावकरी अवाक होऊन पाहू लागले.
कुऱ्हाडी घेऊन आलेल्यांकडे मी एकदा पाहिलं. आणि त्यांचा अवतार बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. पण क्षणकालच. मी स्वतःला सावरलं. डोळे मिटून मी झाडाला चिपकून उभा राहिलो.
पण काहीच घडलं नाही. मी डोळे उघडले. आता सीन पालटला होता.
बाकीच्या गावकऱ्यांनी, अंगावर धावून येणाऱ्यांना आवरलं होतं.
आम्हाला शिव्या देत सगळे निघून गेले होते.
आई अण्णा धावत माझ्याजवळ आले.
आईचं रौद्ररूप मावळलं होतं.
ती धाय मोकलून रडत होती. माझ्या गालावरून तिचा हात फिरत होता. मध्येच ती झाडावरून हात फिरवत होती. पुन्हा रडत होती. अण्णा तिला सावरत होते.
” या झाडासाठी मी तुला पणाला लावलं. “
एवढं बोलून ती मटकन खाली बसली.
खूप वेळानं आमचं घर सावरलं.
त्यादिवशी आईनं पंचपक्वान्न करून नैवेद्य दाखवला.
मला जवळ घेऊन ती म्हणाली,
” आज तुझ्यामुळं माझं आणखी एक लेकरू वाचलं. “
अण्णा हसत घरात आले.
” ही सायसाखरेची वाटी आंब्याच्या झाडाजवळ मिळाली. “
” मीच नेऊन ठेवली होती. त्यातली सायसाखर आंब्याच्या मुळांना लावली. आता उरलेली तुम्ही सगळ्यांनी खा. “
सायसाखर ही आमची गंमत होती.
साखरेची गोडी सायीत मिसळली की नातं घट्ट होतं. सायीची स्निग्धता सगळ्यांना सामावून घेते. असं आईचं तत्वज्ञान होतं.
त्यामुळं कामात राबराब राबलेले आईचे हात कितीही खरखरीत असले तरी सायसाखरेसारखे मृदू मुलायम आणि गोड वाटायचे.
– आज सगळं आठवलं.
– एसटी थांबली. मी उतरलो. घरी निघालो. रात्र झाली होती. घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली. आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती.
सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती…
— समाप्त —
लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈