सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ४९८ – अ… – भाग – २ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री हेमन्त बावनकर

 (‘‘साहेब, आपण अगदी खरं बोलताय. जावयाच्या बाबतीत आम्ही खरंच नशीबवान आहोत. पण साहेब, हे सुख पदरात टाकण्यासाठी देवीआईने आमची अगदी कठोर परीक्षा घेतली होती. ”) – इथून पुढे — 

राजेश काहीसा चमकला. रामजी हे काय बोलताहेत?

सरोजदेखील रामजींकडे उत्सुकतेने बघू लागली. रामजी थोडा वेळ गप्प बसले. जसा काही विचार करत होते की आपली व्यथा, दु:ख बोलावं की न बोलावं? त्यांच्या चेहे-यावरचे भाव भराभरा बदलू लागले. ते बघता बघता राजेश पुन्हा म्हणाला, ‘‘अखेर, देवीआईने आपली कोणती परीक्षा घेतली?”

रामजीची पत्नी जया हिला आपल्या पतीचं बोलणं मुळीच पसंत नव्हतं. तिला वाटायचं, आपलं दु:ख आपल्यापाशी आपल्यापुरतं. ते जाहीर कशाला करायचं? पण रामजींचं मत मात्र वेगळं होतं. त्यांना वाटायचं, ‘दु:ख वाटल्याने कमी होतं आणि सुख वाटल्याने वाढतं. ’ राजेशने पुन्हा एकदा विषय उकरून काढायचा प्रयत्न केला. ‘‘काय झालं रामजी? आपण कोणत्या विचारात पडलात?”

रामजींनी एक दिर्घ श्वास घेतला. आपले डोळे बंद केले. देवाला हात जोडले. आणि आपला माथा झुकवून त्याला नमस्कार करत, आपल्या विनम्र शैलीत बोलायला सुरूवात केली. ‘‘देवीआईची कृपा आहे. आणि तिचं बोलावणं आलं म्हणून आम्ही आपल्या सोबत यात्रेला निघालो. एरवी, आमचं आयुष्य बरबादच होत होतं. तसंही सध्या भलेपणाचे दिवस राहिले नाहीत. ”

रामजी काही वेळ स्तब्ध राहिले आणि नंतर सुरूवातीपासूनच सगळं सांगू लागले.

‘‘राजेश साहेब, मला तीन मुले. मोठी मुलगी सविता. आणि तिच्या पाठीवरची दोन मुले, भरत आणि लखन. मुलीचा विवाह तसा लवकरच झाला. आमचे जावई सुरेश किती चांगले आहेत, हे आपण बघीतलंच. त्यांचा बु-हाणपूरला मोठा व्यापार आहे. मी स्वत: अतिशय धार्मिक स्वभावाचा, श्रध्दाळू आणि देवीआईचा भक्त आहे. देवीच्या कृपेने माझ्याकडे सगळे आहे. एक मोठं दुकान आहे. गोदाम आहे. शेत आहे. एक ऍम्बॅसेडर गाडी आहे. माझा किराणा मालाचा ठोक व्यवसाय आहे. आसपासच्या छोट्या गावातील दुकानदारांना किरकोळ भावाने माल सप्लाय करतो. गेल्याच वर्षी सिमेंटची एजन्सी घेतली. तेही काम चांगलं चाललय. ”

आता रामजी थोडा वेळ थांबले. दोन्ही बर्थच्या मध्ये असलेल्या ट्रेमधून पाण्याची बाटली उचलून पाणी पिऊ लागले. बोगीत आता पहिल्यापेक्षा शांतता होती. आसपासच्या बर्थवरील लोक झोपू लागले होते. ट्रेनने नर्मदा नदी पार केली होती. बाहेर चांगलाच काळोख झाला होता. रामजींनी पाण्याची बाटली ट्रेमध्ये ठेवली आणि आपलं बोलणं पुढे चालू केलं.

‘‘सगळं काही ठाक-ठीक चालू होतं, पण दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. काम-व्यापार करता करता समाजसेवा करण्याचं व्यसन मला जडलं. त्या कामामुळे समाजातली माझी प्रतिष्ठा वाढली. काही मोठे लोक, राजकारणी पुढारीसुध्दा मला ओळखू लागले होते. मनात इच्छा होती, समाजातील गरीब, तळा-गाळातील लोकांसाठी काही करावं, त्यामुळे मान-सन्मान वाढेलच, पण मनाला शांतीही मिळेल. पण या समाजसेवेनेच मला बरबाद केलं. ”

‘‘समाजसेवा तर पुण्याचं काम आहे. ”

‘‘बस्स! काही पुण्य कमवावं, गरीबांना काही मदत व्हावी, म्हणून एक दिवस आवेशात येऊन सामूहिक विवाहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मनापासून कौतुक केलं. मोठ्या लोकांनी सर्व त-हेच्या मदतीचं आश्वासन दिलं. काहींनी ते निभावलं पण बहुतेक जण पैसे देऊन मोकळे झाले. हिंडून-फिरून सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी केवळ माझ्यावर येऊन पडली. देवीआईच्या कृपेने सगळं व्यवस्थित पार पडलं. पण तेव्हा लक्षात आलं नाही, की त्यावेळी माझी बुध्दीच भ्रष्ट झाली होती. विवाहापूर्वी वधु-वर मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी मला काय सुचलं, कुणास ठाऊक? जीवनातला एक महत्त्वाचा निर्णय मी कोणताच विचार न करता घेतला. ”

आता रामजी पुन्हा थोडा वेळ गप्प बसले. आणि खिडकीबाहेर बघू लागले. रामजींची पत्नी जया गुपचुप आपल्या पतीचं बोलणं ऐकत होती. आता सरोजलाही रामजींच्या कथेत रस वाटू लागला होता. रामजींना खिडकीबाहेर दूरवर नजर टाकताना बघून, बोलणे पुढे वाढवावे, या दृष्टीने राजेशने म्हंटले, ‘‘आपण केलेली समाजसेवा, म्हणजे खरोखर वाखाणण्यासारखं काम आहे. सामूदायिक विवाहाचा निर्णय खरोखरच मोठे पुण्याचे काम आहे. यात कसली आलीय चूक?”

‘‘काय आहे, समाजातील प्रतिष्ठित लोक आपल्या मुलांचा विवाह सामूदायिक विवाह सोहळ्यात करत नाहीत. मला वाटलं, माझ्या मुलाचा विवाह मी असा सामूदायिक विवाह सोहळ्यात केला, तर लोकांना, समाजाला ते उत्तम उदाहरण घालून दिल्यासारखं होईल. त्याच भावनेच्या आवेशात मी वधू-वर मेळाव्यात सरिता नावाच्या मुलीला माझ्या भरतसाठी पसंत केलं. पत्नी, मुलगी, जावई, मुले सगळ्यांशीच बोलून मग त्यांच्यासह सरितेच्या घरच्यांशी बोलणी केली. त्यांनी तत्काळ संमती दिली. बोला-चालायला, व्यवहाराला माणसं बरी वाटली. मग मी जास्त काही जाणून न घेता, सार्वजनिक मंचावरून भरत आणि सरिता यांच्या विवाहाचा निर्णय जाहीर केला. एक पैसाही हुंडा न घेता, हा विवाह होईल, असेही तेव्हा सांगितले. अनेकांनी टाळ्या वाजवून माझ्या या निर्णयाचे स्वागत केले. स्तुती केली. नाही म्हणायला, माझा अगदी लहानपणापासूनचा दोस्त मला म्हणाला, ‘तू जरा घाईच करतो आहेस, असं नाही तुला वाटत? हा भरतच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे. ’ परंतु माझा निर्णय घेऊन झाला होता.”

‘‘मग? तुम्ही तुमच्या मुलाचा विवाह केलात?”

‘‘होय राजेश साहेब. तुम्ही विश्वास ठेवा. देवीआईच्या कृपेने अजूनही मुले माझ्यापुढे तोंड उघडत नाहीत. मोठं हसत-खेळत इतर सामुदायिक जोड्यांबरोबर भरत आणि सरिताचंही लग्न झालं. समाजात आमची प्रतिष्ठा वाढली. घरातील सगळ्यांनी सरिताला मुलीचीच माया दिली. सरिताने देखील, सगळ्यांचीच मने जिंकून घेतली. ‘माँजी-माँजी’ म्हणत ती सतत जयाच्या मागे असायची. मी कामावरून आलो, की ‘बाबूजी-बाबूजी’ म्हणत मागे यायची. माझा नाश्ता, जेवण याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायची. भरतच्या चेह-यावरसुध्दा एक प्रकारचं तेज आलं होतं. एका नव्या-नवेल्या सुनेकडून आमची तरी यापेक्षा काय जास्त अपेक्षा असणार? मला वाटलं, माझा निर्णय अगदी शंभर टक्के बरोबर आहे. पण दैवाला मात्र काही वेगळंच मंजूर होतं. ”

राजेशला आश्चर्य वाटलं. ‘‘मग काय झालं?”

‘‘राजेश साहेब, इथूनच आमचे वाईट दिवस सुरु झाले. तीन-चार महिने गेले असतील, एक दिवस सरिताचे वडील सीताराम घरी आले. हात जोडून अतिशय विनम्रतेने म्हणाले, ‘मुलीची खूप आठवण येतेय. काही दिवस पाठवलंत तर मोठी मेहेरबानी होईल. ’ मी त्यांना म्हंटलं, ‘सरिताचा तो हक्कच आहे. मीदेखील मुलीचा बाप आहे. ’ खरं म्हणजे सरिता आमच्या घरात इतकी रमून गेली होती की तिने एकही दिवस माहेरची आठवण काढली नव्हती. मी सीतारामना म्हंटलं, ‘सरिता प्रथमच माहेरी चाललीय. भरत तुम्हाला पोचवायला येईल. ’ सीतारामनी मान हलवली आणि आपल्या मुलीशी एकांतात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मला त्यात काहीच अडचण वाटली नाही. आम्ही सरिता आणि सीताराम यांना बैठकीच्या खोलीतच एकांतात बोलण्याची संधी दिली. त्यानंतर भोजन करून त्यांना निरोप दिला. ”

राजेश सहजपणे म्हणून गेला, ‘‘इथपर्यंत सगळं ठीक वाटतंय. ’

‘‘इथपर्यंत सगळं ठीकच होतं राजेश साहेब! सरिताला निरोप देण्याची वेळ आली, तेव्हा सगळं घर उदास झालं. सरिताच्या चेह-यावर मात्र माहेरी जात असल्याची खुषी होती. आम्हाला वाटत होतं, सरिता नाही, जशी काही आमची मुलगीच काही दिवसांसाठी जात आहे. तिच्या बरोबर देण्यासाठी अनेक खाण्या-पिण्याचे जिन्नस पॅक केले. ”

यावेळी प्रथमच जया सरोजकडे बघत म्हणाली, ‘‘ताई, खरोखरच काजू, बदाम, आक्रोड, बेदाणे आणि सरिताला आवडणारी मिठाई मी सगळं माझ्या हाताने बांधून दिलं. ”

बहुधा रामजींना जयाचं हे मधे बोलणं योग्य वाटलं नाही. त्यांनी नजरेने इशारा केला आणि जया गप्प बसली.

सरिताने बॅग भरताना मोठ्या प्रेमाने जयाला विचारलं, ‘‘माँजी मी या साड्या नेऊ? हे दागिने घेऊन जाऊ?” असं म्हणत जवळ जवळ सगळेच दागिने बॅगेत भरले. ते चार-पाच लाखांचे सहज असतील. त्याच प्रमाणे सगळ्या किमती, महाग-मोलाच्या साड्या ठेवल्या. मी भरतला माझ्या ऍम्बॅसेडर गाडीत त्यांचे सगळे सामान ठेवायला सांगितले आणि जड मनाने त्यांना निरोप दिला. मला त्यावेळी काय माहीत होतं की ती सरिताची शेवटची पाठवणी असेल. ”

‘‘शेवटचा निरोप?”

‘‘नाही. आपल्याला वाटतय, तसं काही नाही. असं झालं की सरिता माहेरी गेली, त्याला तीन महिने झाले, पण ती काही परत येण्याचे नाव घेईना. मी सीतारामांना निरोप पाठवला की त्यांनी सरिताला आता परत पाठवावे. त्यांचा निरोप आला की तिला आणखी काही दिवस माहेरी राहू दे. मी विचार केला, ठीक आहे. सगळ्यांनाच तसं वाटतय, तर तसं होऊ दे. होता होता सहा महिने झाले. दोन वेळा भरत आणायला गेला, तर त्यालाही असंच सांगून परत पाठवलं. असं करता करता नऊ-दहा महिने होऊन गेले. आता मला वाटलं, मी स्वत:च जायला हवं. मग मी आणि भरत दोघेही सरिताला आणायला गेलो. मी प्रथमच त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचं एकूण घर, रहाणी पाहून मला माझा मित्र कन्हैयालालचं बोलणं आठवलं. मग पुन्हा मनात आलं, सरिताच्या माहेरचं घर, रहाणी याच्याशी आपला काय संबंध? आपला संबंध फक्त सरिताशी. ती खूश, तर आम्ही खूश. सीतारामांनी आमचं आदरातिथ्य केलं. सरितादेखील चहा-नाश्ता घेऊन आली. आम्हाला नमस्कार केला. पण तिला बरोबर चलण्याविषयी बोललो, तेव्हा सीताराम गप्प बसले. त्यांनी सरिताकडे पाहिले. सरिता मान खाली घालून म्हणाली, ‘बाबूजी मी नंतर येते. ’ आणि ती आत निघून गेली. सीतारामही दोन्ही हात जोडून म्हणाले, ‘रामजी आपण काळजी करू नका. आम्ही तिला पाठवतो. ’ मी म्हंटलं, ‘सीतारामजी दहा महिने होत आले. ’ ते पुन्हा हात जोडून म्हणाले, ‘रामजी आम्ही पाठवतो म्हंटलं नं!’ मी भरतकडे पाहिले, तो उदास झाला होता.

आपलं बोलणं पुढे चालू ठेवत रामजी म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या कारमध्ये बसून घरी आलो. मला रात्रभर झोप आली नाही. दुस-या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मी कन्हैयालालकडे गेलो. त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, ‘तरी मी तुला सांगत होतो, इतकी घाई करू नको. असो. जे झालं ते झालं. आता आपण याबाबतीत हरीभाईंचा सल्ला घेऊ या. ’ हरीभाई आमचे लहानपासूनचे मित्र. ते सध्या वकिली करतात. हरिभाईंचा सल्ला घेऊन मी घरी आलो आणि त्यांनी सुचवलेल्या योजनेसंबंधी जया आणि भरतशी चर्चा करू लागलो.

भरत केवळ हो ला हो करत होता. गेले कित्येक दिवस तो गप्प गप्पसाच होता. आणि ते स्वाभाविकही होतं. त्याचं खाणं-पिणं कमी झालं होतं. मन लावून कामही करू शकत नव्हता. ”

नंतर मी, जया, भरत आणि कन्हैयालाल पोलीस ठाण्याला लागून असलेल्या कुटुंब कल्याण केंद्रात पोचलो. हरिभाईंकडून आधी अर्ज लिहून घेतलेला होताच. आम्ही जेव्हा कुटुंब कल्याण केंद्राच्या इनचार्जला सगळी हकिकत सांगितली, तेव्हा त्यांना प्रथम खूप आश्चर्य वाटलं. त्या म्हणाल्या, ‘मुलाकडच्यांनी, मुलगी नांदायला येत नाही, अशा प्रकारची तक्रार करणारी, तुमची पहिलीच केस आमच्याकडे आली आहे. ’

मी त्यांच्यासमोर भरत-सरिताच्या विवाहा संबंधीची सगळी कागदपत्रं ठेवली. योगायोगाने माझ्याजवळ त्या वेळच्या वर्तमानपत्रातून सामूदायिक विवाहासंबंधी आलेल्या बातम्यांची कात्रणेही होती. त्याच्या झेरॉक्स प्रतीदेखील मी अर्जासोबत जोडल्या. माझा अर्ज आणि अन्य कागदपत्रे पाहिल्यावर त्या म्हणाल्या, ‘आपली काय इच्छा आहे?’ मी म्हंटलं, ‘सरिता आपल्या घरी पुन्हा नांदायला यावी, एवढीच इच्छा आहे. ’

इनचार्ज मॅडमनी केंद्रातील अन्य लोकांशी चर्चा केली. मग त्या म्हणाल्या, ‘पुढच्या सोमवारी मुलीकडच्यांना केंद्रात उपस्थित रहाण्यासाठी आम्ही नोटीस पाठवतो. आपण आपली नोटीस थोड्या वेळात घेऊन जा. आणि पुढल्या सोमवारी आपणही इथे या. त्यावेळी बोलू या. ”

आता आमची उत्सुकता वाढली होती.

– क्रमशः भाग पहिला 

☆☆☆☆☆

मूळ हिंदी कथा – ४९८ -अ

मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments