सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
शिवाजी मंदिर मधून नाटक बघून बाहेर पडलो. मूड छान होता. नेहमीप्रमाणे नाटकातील पात्रे मनांत, डोळ्यासमोर नाचत होती. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बालपणीच्या, काका, काकी आत्या बरोबर घालवलेले लाडाचे दिवस. आजोळचे सुट्टीतले दिवसआठवले. तेवढ्यात बबडी, बबडी हाक ऐकू आली.मला वाटलं हा पण भासच आहे.पण तो भास नव्हता. एक साधारण साठ, पासष्ट मधला माणूस आमच्या समोर उभा. अग बबडे,लहानपणीच माहेरचं लाडाचं नाव, मी आता विसरलेच होते.कारण आता मला भरपूर उपाध्या मिळाल्या होत्या. आई, काकी, मामी, अहो आई, आजी सुध्दा. ‘अग, बबडे तुला केव्हा पासून गाठण्याचा प्रयत्न करतोय. मध्यांतरात दिसलीस आणि नंतर नाहीशी झालीस.” माझ्याबरोबर माझा चिरंजीव होता. तो प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे आणि त्या गृहस्थाकडे पहात राहिला. मी पण गोंधळले. “अग, मी मन्या”आता माझी ट्यूब पेटली. “अरे, किती बदललास तू? तूच येऊन भेटलास म्हणून. नाहीतर मी ओळखलचं नसतं. चौदा पंधरा वर्षापूर्वी भेटलेलो. तुझं रुप साफ पालटलं”
मन्या म्हणजे माझ्या दादाचा बालमित्र. गिरगांवात आमच्या शेजारीच रहायचा. माझे बाबा आणि त्याचे वडील, अण्णा म्हणत असू आम्ही त्यांना. दोघे मित्र. माधुरी ताई आणि मन्यादादा ही त्यांना दोन मुलें. मन्यादादाच्या लहानपणीच त्यांची आई वारल्याने अण्णाच त्यांची आई आणि वडील.अण्णाना दुसरे जगच नव्हते. ऑफिस आणि घरं. मुलांचेजेवण खाणं, अभ्यास. रविवारी त्यांना बाहेर फिरवणे. त्याच्या आजारपणांत रात्री, रात्री जागरणे करणं. मन्यादादा आणि दादा एकाच वर्गात. मन्यादादा अख्खा दिवस आमच्याकडेच असायचा. माझी आई पण त्याचे दादाच्या बरोबरीनेच करीत असे. माधुरीताईला लहान वयांतच मागणी आली. मुलगा आणि घरदारं चांगले माहितीतले असल्यामुळे एफ्. वाय् ला असतानाच अण्णांनी तिचे लग्न करुन दिले. पुण्याला तिचे सासर. आमच्याशी तिचा पत्र व्यवहार होता. तेव्हा आता सारखे फोन फारच कमी. mobile तर नव्हतेच. अण्णांची नोकरी फिरतीची त्यांच्या बदल्या नाशिकला, नंतर साता-याला अशा होत राहिल्या. सगळे आपापल्या उदयोगधंद्यात. आमचे संबंध हळूहळू कमी झाले.
“अरे मन्यादादा, किती खराब झालास, न ओळखण्या इतपत. अण्णा कसे आहेत वहिनी कश्या आहेत. मुलं काय करतात?” तेवढ्यात चिरंजीव म्हणाले, “आई, सगळ्या गोष्टी रस्त्यावरच बोलणार का? आपण कुठेतरी चहा घेऊ या म्हणजे मनसोक्त गप्पा मारता येतील. “आम्हालाही घरी जायची घाई नव्हती. रात्रीचे जेवण बाहेरचं घ्यायचे होतं. हे ट्रीपला गेले होते. सूनबाई चार दिवस माहेरी गेली होती. मग आम्ही तृप्ती मध्ये गेलो.
क्रमशः…
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Excellent. …flash back memories…
Waiting for the next