श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “अन्याभाई” ☆ श्री मंगेश मधुकर

मध्यरात्र उलटून गेलेली, सगळी सोसायटी चिडीचूप. भटक्या कुत्र्यांचा आवाज सोडला तर एकदम शांतता. इतक्यात मोठमोठ्यानं हॉर्न वाजवत तीन कार वेगानं गेटच्या आत येऊन थांबल्या. त्यातून उतरलेल्या दहा बारा तरूणांनी आरडा ओरडा करत फटाक्यांची मोठी लड लावली. पुढची दहा एक मिनिटं फक्त आणि फक्त आवाज. सगळी सोसायटी जागी झाली. बेधुंद नाचणाऱ्या पोरांकडं वैतागलेले, हतबल सोसायटीकर असहाय्यपणे पाहत होते. त्यांच्यातच ‘शुभा’ सुद्धा होती. सगळ्यांना वाटत होतं पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची हिंमत नव्हती. शुभाला राहवलं नाही. दोन जिने उतरून ती गेटजवळ गेली. पाठोपाठ नवरा होताच.

“ए, बंद करा. अकला नाहीत का. किती वाजले ? ” शुभा किंचाळली पण परिमाण शून्य. मग शुभानं थेट स्पीकरचं बंद केला तेव्हा एकजण ओरडला “ओ बाई, हे काय, कुणाला इचरून बंद केलं”

“वेळ काळ समजते का”

“का? काय झालं”

“वर तोंड करून मलाच विचार”

“इथ दुसरं कोणये? ज्याला इचरू” बोलणारा खी खी करत हसला.

“लोकांना त्रास होतोय.. हा धांगडधिंगा बंद करा”

“आमी आमचा एंजॉय करतोय. कुणाला त्रास देत नाहीये. ”

“सगळ्यांची झोप मोड झाली. इतक्या रात्री धिंगाणा कशासाठी?”

“बड्डे सेलिब्रेशन”

“कोणाचा”

“अन्याभाईचा”

“मग त्याचा त्रास दुसऱ्यांना का? घरी जाऊन सेलिब्रेट करा. फुकटचा तमाशा कशाला?”

“बाई, जरा नीट बोला. सोसायटीत नवीन दिसताय. ”

“महिना झालाय. ”

“तरीच इतकं बोलण्याची डेरिंग करताय”

“तू काय धमकी देतोयेस. ”

“ही सोसायटीच अन्याभाईची आहे”

“असेल मी काय करु. गप घरी जा. आता आवाज नको”

“अजून केक कापायचा नंतर फॅन्सी फटाके.. फुल टू एंजॉय” 

“पुन्हा सांगते. घरी जा”

“बाई, ऐकून घेतो म्हणून जास्त बोलू नका. महागात जाईल”

“सस्ती चिजो का शौक मुझे नही”हिंदीत सुरू झालेली शुभा नवऱ्यानं खांद्यावर थोपटल्यावर गप्प झाली. तेव्हा पोरं चेकाळली आणि जास्तच आरडाओरडा करायला लागली. शुभाचा संताप अनावर झाला. “वा रे वा, एका बाईला गप्प केलं म्हणून एवढी खुशी !!”

“बाई!! काय प्रॉब्लेम आहे ”.. कारच्या बाजूनं आवाज आल्यावर पोरं एकदम गप्प झाली. जवळपास सहा फुट ऊंची, कमावलेलं आडदांड शरीर, लांब उभट चेहरा त्यावर झुपकेदार मिशी, लिननचा पांढरा शर्ट, जीन्स, स्पोर्टस बूट घातलेला एकजण पुढे आला. “मी अन्याभाई !!, काय अडचण आहे. ”अन्याभाईला पाहून शुभा प्रचंड घाबरली पण चेहऱ्यावर उसनं आवसान आणित म्हणाली “नमस्कार दादा”

“हा नमस्कार, मघाशी जे बोलला ते परत एकदा ऐकायचंय”

“जाऊ द्या ना. या पोरांना बोलत होते. तुम्हांला नाही”

“मला का नाही”अन्याभाईच्या अनपेक्षित प्रश्नानं शुभा गोंधळली.

“तुम्हांला कोण बोलणार?”

“का?मला शिंग आहेत”भाईच्या जोकवर पोरं मोठ्यानं हसली.

“हे बघा. रोज रात्री इथं येऊन नाचत नाही. आज बड्डे म्हणून पोरं एंजॉय करतायेत. त्रास होत असेल तर कानात कापूस घालून बसायचं. एक दिवस सहन करा. परत सांगणार नाही. समजलं. चला गुड नाइट!!”अन्याभाईचं प्रेमळ बोलणं शुभाला नेमकं समजलं. पोरं परत नाचायला लागली. फटक्याची लड पुन्हा लावली. बिल्डिंगच्या दाराशी गेलेली शुभा परत फिरली आणि अन्याभाई समोर जाऊन उभी राहिली.

“काय पोलिसाना बोलवायचं”

“नाही हो. तुम्ही असताना पोलिस कशाला?”

“मग काय!!एकदा सांगितलं सहन करा. आता जा”

“एक बोलायचं होतं. चिडणार नसाल तर बोलू”शुभा.

“बिनधास्त, आज आपला स्पेशल दिवस आहे”

“तेच तर सांगायचं होतं. तुमचा वाढदिवस आणि लोकं शिव्या घालतायेत”

“एवढी कुणाची हिंमत, नाव सांगा”

“तोंडावर कुणी बोलणार नाही पण इतक्या रात्री झोपमोड झाल्यावर कुणी कौतुक तर नक्कीच करत नसणार. ”

“बाई, नक्की काय म्हणायचंय”दारूचा वास येऊ नये म्हणून अन्याभाई लांबूनच शुभाशी बोलत होता.

“कसं य दादा, दरवर्षी वाढदिवस असाच साजरा करता. ”

“असाच म्हणजे”

“हेच धिंगाणा, आरडाओरड, चार पाच केक कापणे, फटाके, दारू, मटन वगैरे”

“मग बड्डे अजून कसा साजरा करतात. ”

“एक विनंती आहे. उद्या माझ्या घरी जेवायला या. छान स्वैपाक करते. तुम्हांला काय आवडतं. ”

शुभाचं बोलणं ऐकून अन्याभाई एकदम गडबडला. नक्की कसं रिअॅक्ट व्हावं हेच समजत नव्हतं. खरंतर इतक्या प्रेमानं आतापर्यंत कोणीच बोललं नव्हतं. भाई चक्क इमोशनल झाला. पोरांसाठी हे सगळे फारच नवीन होतं. सगळे एकदम गप्प झाले.

“पाच मिनिटांत आले”म्हणत शुभा धावतच घरी गेली. काय चाललयं कोणालाच काही कळत नव्हतं. जो तो एकमेकांकडे पहायला लागला इतक्यात शुभा परत आली तिच्या हातात ओवाळणीचं ताट होतं.

“हे काय”.. अन्याभाई 

“दादा, वाढदिवस आहे म्हणून तुम्हांला ओवाळते. आपली परंपरा तीच आहे ना”

अन्याभाईनं लगेच डोक्यावर रुमाल ठेवला. शुभानं ओवाळलं तेव्हा गॅलरीत, खिडकीतून पाहणाऱ्यांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या तेव्हा अन्याभाईनं सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला. बदललेली परिस्थिती पाहून सगळी पोरं एकेक करून निघून गेली. पुन्हा एकदा जेवायचं आमंत्रण देऊन घरी आलेल्या शुभानं काही वेळानं खिडकीतून पाहिलं तर मंदिराच्या पायरीवर एकटाच बसलेला अन्याभाई शर्टाच्या बाहीनं डोळे पुसत होता. ते पाहून शुभाला गलबलून आलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments