डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ किरण… – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
(आजारावर नियंत्रण मिळालेय ही खात्री झाल्याने मलाही धीर वाटला आणि याचा परिणाम म्हणून माझी शारीरिक रिकव्हरी वेगाने होऊ लागली.) – इथून पुढे —
कॅन्सर चोर पावलाने प्रवेश करीत असतो, ही या रोगाची विशेषता जाणूनच डॉक्टरांनी दोन डोस रेडिएशन (अर्थात किरणोपचार) चा सल्ला दिला. पण किरणोपचार किंवा रसायन उपचार दोघेही अतिशय तीव्र वेदनादायी उपचार असल्याने माझे तर अवसानच गेले. “नाही, नकोत मला हे उपचार. वाटल्यास मला मारून टाका. पण या उपचारांना सामोरे जायला सांगू नका. ” – माझा आक्रोश सुरू झाला होता.
“ताई घाबरण्याचं कारण नाही. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने आधुनिक उपचार पद्धती ही बऱ्याचशा सुकर झाल्या आहेत, कमी त्रासदायक आहेत. पण तुमची इच्छा नसेल तर आपण दर तीन महिन्यांनी पहिल्या वर्षी सोनोग्राफी रिपोर्ट करूया आणि पुढील चाल वर्षे दर सहा महिन्यांनी. आमच्या फॉलोअप रेग्युलर राहिला तर आजाराचे निदान आजाराची कुणकुण आमच्या सहजपणे लक्षात येईल. त्यामुळे काळजी करू नका. आज तुम्ही रोगमुक्त आहात. पुढेही तसेच घडेल. आता तुम्ही तुमच्या कामावर रुजू ही होऊ शकता. मी मेडिकल व फिटनेस सर्टिफिकेट तयार करून देतो. “
माझे दैव बलवत्तर होते, म्हणून स्वर्गाकडे एक पाऊल पुढे पडूनही मी पुन्हा पृथ्वी तळावर परतले होते. एकाच जन्मात पुन्हा नव्याने जन्मण्याचा अनुभव मी घेतला होता. आयुष्याचा बोनस मिळाला होता. आता आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा. कोणतीही चिंता, काळजी करायची नाही हे मी मनोमन ठरवले. पण माझं मन, माझ्या अंतरात्मा मला आवाज देऊ लागला. “तू तर या आजारातून बरी झालीयेस, कॅन्सरला हरवलेस, आयुष्याचा बोनस मिळवला आहेस, आता या आयुष्याचा उपयोग तुझ्या सारख्या कर्करोगाने त्रस्त लोकांसाठी का करत नाहीस?” आणि माझ्या या अंत:स्थ प्रेरणेतूनच “कॅन्सर ची लढा एक पाऊल पुढे” चा जन्म झाला. माझ्यासारखे पीडित कर्करोगग्रस्त बंधू भगिनीं ही हळूहळू या संस्थेची जोडले जाऊ लागले. प्रत्येकाचे अनुभव कथन, आजाराशी दिलेली झुंज याची देवाण-घेवाण होऊ लागली. अर्थात कर्करोगा विषयी जनजागृती होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण भारतासारख्या देशात कर्करोगग्रस्तांचं वाढलेलं प्रमाण व त्यायोगे होणारे मृत्यू अधिक प्रमाणात असल्याचं कारण कर्करोगाचे उशिरा होणारे निदान. आजार वाढल्यानंतर किंवा शारीरिक त्रास अधिक प्रमाणात वाढल्यानंतरच आपण डॉक्टरांकडे जातो. कर्करोगाचे निदान होईपर्यंत या रोगाने शरीरात आपले स्थान खूपच मजबूत केलेले असते. साधारणपणे तिसऱ्या व चौथ्या ग्रेड मधील कर्करोगावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. यासाठी कर्करोगाचे लवकर निदान होणं गरजेचं आहे. यासाठी जनजागृती महत्त्वाची. तेच काम आमची संस्था करते. यासाठी विविध प्रकारचे कर्करोग, त्यांचं स्वरूप, त्यांची होणारी वाढ, हे स्लाईडशो अर्थात चलचित्रद्वारे आम्ही विविध कार्यक्रमातून दाखवतो. कर्करोगावरील विविध चर्चासत्रांचे आयोजन आमची संस्था करते. यासाठी कर्करोग तज्ज्ञांना निमंत्रित केले जाते.
तसेच प्रत्येक वयाची चाळीस वर्षे पार केलेल्या व्यक्तीने मग ती निरोगी असली तरी त्यांनी आपली शारीरिक तपासणी वर्षातून एकदा तरी अवश्य करावी. अनेकदा आपल्याला काही शारीरिक व्याधी न जाणवताही गंभीर आजाराचे निदान या तपासणीतून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
समाज प्रबोधन होण्यासाठी जागतिक कर्करोग दिनी आमच्या संस्थेने मॅरेथॉन स्पर्धेचे ही आयोजन केलं होतं. शालेय विद्यार्थ्यांपासून तर अनेक ज्येष्ठ नागरिक ही या मॅरेथॉन मध्ये सामील झाले होते.
“खूपच छान तुमचं समाज प्रबोधन, जनजागृती, निश्चितच कर्करोगग्रस्तांना तर उपयोगी आहेच पण कर्करोगाला रोखण्यात ही फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रेमाताई तुमचा हातभार फार महत्त्वाचा आहे. “
“नाही माधुरीताई, मी खूप काही मोठं काम करतेय असं नाही. पण खारीचा वाटा मात्र जरूर उचललाय. ” माधुरीताई अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न असतात आजाराविषयी, उपचार पद्धती विषयी, त्यास जाणून घ्यायचे असते. कर्करोग म्हणजे काय? तो कशामुळे होतो? तो ओळखावा कसा? त्याच्यावर प्रभावी उपचार कोणते? या उपचारांचे दुष्परिणाम कोणते? यासारखे अनेक प्रश्न रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात गर्दी करतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी डॉक्टरांकडे पुरेसा वेळ नसतो. प्रश्नांची उत्तरे टाळली जातात किंवा सविस्तरपणे दिली जात नाहीत. मिळालेल्या उत्तरांनी रुग्णांचे, नातेवाईकांचे पूर्ण समाधान होत नाही. आणि रुग्णांची ही अडचण ओळखूनच आमच्या संस्थेने विविध प्रकारचे कर्करोग व त्यावरील प्रभावी उपचार सांगणारी पुस्तक मालिकाच तयार केलीय. अनेक कर्करोगग्रस्त रुग्ण व नातेवाईकांनी त्यांना या पुस्तकांचा बराच उपयोग झाल्याचे अनेकांनी कळविले आहे.
“प्रेमाताई, हे फार मोठे कार्य करीत आहे आपली संस्था. कर्करोग ग्रस्तांना या पुस्तक मालिकांचा उपयोग निश्चित होतोय. “
“माधुरीताई, सांगायला मला आनंद होतोय की, मी लिहिलेले “कर्करोग काळोखातून प्रकाशाकडे’ हे मी व माझे सहकारी यांचे स्वानुभवावरचे पुस्तक लवकरच प्रकाशित होतंय. कर्करोग ग्रस्तांना ते निश्चितच प्रेरणा देणारे ठरणार आहे. “
प्रेमाताईंचे कर्करोग व त्यावरील विवेचन त्यांची संस्था करीत असलेले कार्याविषयी आपण जाणून घेतले. आपणास त्यांच्याशी संपर्क करायचा असल्यास त्यांचा दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक आम्ही देत आहोत. ते आपण टिपून ठेवावे.
प्रेमाताई आपण व आपली संस्था करीत असलेले कार्य कर्करोगाच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे. कर्करोगापासून व कर्करोग्यांपासून ही लोक चार हात लांब राहणचं पसंत करतात. कर्करोगाचा संशय देखील मनाचा थरकाप उडवतो. कर्करोग हा अप्रिय शब्द कानावरही पडू नये असेच सर्वसामान्यांना नेहमीच वाटते. तरीही काहींना कर्करोग हा गाठतोच. अशावेळी रुग्णांनी गर्भगळीत न होता कर्करोगाला सामोरे जाणे हे त्यांच्याच हिताचे असते. सर्वसामान्यांकडून नाकारल्या जाणाऱ्या कॅन्सर ग्रस्तांना आपण मदतीचा हात देतात, त्यांचे मनोधैर्य वाढवतात हे खरोखरीच अतुलनीय कार्य आहे. कर्करोग्यांसाठी प्रेमाताई व त्यांचे सगळे सहकारी प्रकाशाची एक एक किरण ज्योती आहेत ज्या या रुग्णांच्या जीवनात पुनश्च आशेचे किरण जागवून कर्करोगाला सामोरे जाण्यात त्यांची मदत करतात. त्यांचे मनोधैर्य वाढवितात. समाज प्रबोधन, विचार जागृती करून कर्करोगाचे लवकर निदान, उपचार आणि कर्करोगा चे नियंत्रण यावर प्रभावी मार्गदर्शन करतात. अशा प्रत्येक शहरात, गावात किरण ज्योती निर्माण झाल्यास आपण या आजारावर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी होऊ शकतो हे आजच्या “स्वस्थ भारत” या कार्यक्रमातून आपण जाणून घेतले आहेच.
“प्रेमाताई, आपण येथे आलात कर्करोग, व त्याविषयीची जनजागृतीसाठी आपण स्वतः व आपली संस्था करीत असलेले कार्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत जी आमच्या प्रेक्षकांना निश्चितच मदत करणारी आहे; अनेक कर्करोग ग्रस्तांना यातून दिलासा मिळाला असेलच. मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करते. दूरदर्शनचे व हजारो प्रेक्षकांचे मीही आभार मानते. “
…. फुलांचा बुके माधुरीताईंनी माझ्या हाती दिला. एक विजयी हास्य माझ्या चेहऱ्यावर होते.
— समाप्त —
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]