श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ तुम्ही म्हणाल तसं… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(या उलट ती मला समजून घेत शांत करत आलीय. मुलांच्यावर संस्कार करण्याचं काम आणि त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण धुरा तिनं एकटीने सांभाळली आहे. ती नसती तर..?’) – इथून पुढे —
भावनावश झालेले गंगाधरपंत हलक्या आवाजात म्हणाले, “सुलु, बरं वाटत नाहीये का तुला? डोकं दुखतंय का?”
तिनं हळूच डोळे उघडत विचारलं, “फिरून आलात का? चहा करून देऊ का तुम्हाला?” आणि उठून बसली.
गंगाधरपंत पटकन म्हणाले, “नाही, नको. मानसीने आताच करून दिलाय.” असं म्हटल्यावर सुलोचना तोंडावर पाणी मारून देवघरात निरांजने पेटवून हात जोडून बसली.
संध्याकाळी काहीच न घडल्यासारखं रात्रीची जेवणं उरकली. शतपावली करून आल्यावर टीव्हीवरच्या बातम्या न ऐकताच गंगाधरपंत बेडरूममध्ये शिरले. उशीला पाठ टेकून विचारमग्न स्थितीत बसले. सुलोचना स्वयंपाकघरातील आवराआवर करून आली आणि शेजारी बसत म्हणाली, “काय पंत, आज मूड बिघडलेला दिसतोय. अहो, एवढे विचारमग्न व्हायला काय झालंय?”
त्यावर गंगाधरपंत काय बोलणार? सुनेनं जे सुनावलं, ते सांगायचं का सुलोचनेला? सूनदेखील काय चुकीचं बोलली? तिनं फक्त आरसा दाखवण्याचं काम केलं होतं. गंगाधरपंत पटकन म्हणाले, “अं, कुठं काय? काहीच नाही. असाच बसलो होतो.”
सुलोचना त्यांचं अंतरंग ओळखून होती. ती हसत हसत म्हणाली, “आता जास्त विचार करत बसू नका. लवकरच आपल्या कुटुंबात आणखी एका सदस्याची भर पडणार आहे, आहात कुठे आजोबा? झोपा आता.” ही आनंदाची बातमी ऐकून गंगाधरपंतांना त्या रात्री शांत झोप लागली.
एक नवी सकाळ. गंगाधरपंतांना अंतर्बाह्य बदलून गेली. ते सकाळच्या प्रहरी फिरायला जायला लागले. लवकरच त्या भागातल्या प्रभात मंडळाचे सदस्य झाले. वेगवेगळ्या मतांचे विचारमंथन त्यांच्या कानावर पडत होते. कित्येक दिग्गज लोकांच्या अनुभवाचा खजिना त्यांच्यासमोर रिता होत होता. आत्ममग्न झालेल्या गंगाधरपंतांना नकळत स्वत:चं खुजेपण जाणवत होतं, त्यामुळे हळूहळू ते विनम्र होत चालले होते.
एके दिवशी सकाळी मंडळाच्या बैठकीत एक तरुण आला आणि हात जोडत म्हणाला, ‘मी विनय. माधवरावांचा मुलगा. बाबा काल पुण्याला गेले आहेत. येत्या सहा डिसेंबरला आईबाबांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे. आम्ही त्या निमित्ताने हॉटेल ओपलमधे एक सोहळा आयोजित केला आहे. कृतज्ञता सोहळाच म्हणा हवं तर. सर्वांचेच आईबाबा मुलांच्या भवितव्यासाठी झटत असतात. माझे आईबाबा मात्र आजही आमचं जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते दोघे आमच्यासाठी आधारवड बनून ठामपणे उभे आहेत. तुम्हा सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्या दिवशी अवश्य उपस्थित राहून आईबाबांना सरप्राइज द्यावं, अशी विनम्र प्रार्थना. मंडळाच्या नावे हे निमंत्रण.’
निमंत्रण अगत्याचं होतं. वेळ दुपारची होती. मंडळाचे सदस्य एका ठिकाणी जमले. दोन जाडजूड पुष्पहार घेऊन हजर झाले. माधवरावांच्या मुलाने आणि सुनेने त्यांचं अगत्याने स्वागत केलं. माधवरावांना मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती अनपेक्षित होती. ते हरखून गेले. कार्यक्रमात मुलगा-सून, कन्या-जावई, नातवंडं यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रीतीभोजनाचा आस्वाद घेऊन सगळेच जण घरी परतले.
दुसऱ्या दिवशी माधवराव सकाळी मंडळाच्या मीटींगला हजर झाले. सगळ्याच सदस्यांनी त्यांच्या मुलाचं आणि सुनेचं कौतुक केलं. गंगाधरपंत म्हणाले, “माधवराव, तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा मुलगा आणि सून खूपच चांगले आहेत.”
माधवराव काहीसे गंभीर होत म्हणाले, “होय. ते दोघे खूप चांगले आहेत. आपण जन्मदात्या मातापित्यांचा प्रत्येक शब्द झेलत होतो. आता तो जमाना संपला. आजचं एक कटु सत्य सांगू का? आज प्रत्येक नात्यात तुम्हाला ‘युटिलीटी’ म्हणजे तुमची उपयोगिता सिद्ध करावी लागते. आपण त्यांच्याशी चांगले वागलो तरच ते आपल्याशी चांगले वागतात. जुनं फर्निचर जास्त कुरकुर करायला लागलं की आजकाल लगेच मोडकळीत टाकतात. तसंच जास्त कुरकुर करणाऱ्या आणि उपयोगिता नसलेल्या आईवडिलांना देखील नाईलाजाने वृद्धाश्रमात पाठवलं जातं.”
माधवरावांच्या बोलण्याने सगळेच जण गंभीर झाले. माधवराव पुढे म्हणाले, “मित्रांनो, आजकाल मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात. आजच्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांना तिमाही टार्गेट्सच्या चक्रात अक्षरश: पिळून निघावं लागतं. लठ्ठ पगार मिळतो पण त्यांना तणाव नावाच्या राक्षसाशी दोन हात करावे लागतात. ऑफिसातल्या ताणतणावाने ते पार थकून जातात. घरी आल्यावर तुमच्यामुळे कटकटी होत असतील तर ते कसे सहन करतील?
त्यांना पोटापाण्यासाठी ऑफिसातले ताणतणाव टाळता येत नाहीत. मग नाईलाजाने तुम्हाला दूर करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. एवढंच सांगतो, सावध व्हा. त्यांच्यावर बोजा बनून न राहता शक्य असेल तेवढी मदत करा. घरी कामवाल्या बायका असतात त्यांच्या कामावर लक्ष ठेवा. सांसारिक कटकटीतून त्यांना मुक्त करा. बाजारहाट करायचं काम आनंदाने करा. नातवंडांना सांभाळा. घरातलं वातावरण शक्य तेवढं आनंदी ठेवा. मग बघा, हे जुनं फर्निचरच ते अॅंटिक पीस म्हणून अभिमानाने जपतील. कधीच वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही.” त्यावर सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
हल्ली घरात लागणारं सामान गंगाधरपंत ऑनलाईन ऑर्डर करून घरपोच मागवून घेत होते. संध्याकाळी सुलोचनेसोबत समोरच्या बागेत फिरायला जात होते. माघारी येताना ताज्या भाज्या आणि फळे घेऊन येत होते. ऑफिसातून सून घरी येताच, तिला फळांचा बाऊल देवून दूध पिण्यासाठी आग्रह करत होते. ‘मानसी बेटा, आपल्या तब्येतीची काळजी घे, ’ असं वारंवार सांगत होते.
गंगाधरपंतांचं हे नवं रूप पाहून सुलोचना हरखून गेली. गंगाधरपंत त्या रात्री भावविवश होत सुलोचनेला म्हणाले, “सुलु, या जगात तुझ्या इतकं मला समजून घेणारं कुणीही नाही. तू मला कधीही सोडून जाणार नाहीस म्हणून वचन दे, अगदी देवानं बोलवलं तरी!”
सुलोचना पंतांच्या हातावर हात ठेवत म्हणाली, “पंत, वचन देते. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मग तर झालं?”
सुलोचनेचा हातात असलेला हात दाबत गंगाधरपंत हळूच म्हणाले, “सुलु, आजपासून अख्खं राज्य तुझंच ! यापुढे सगळं काही तू म्हणशील तसंच होईल.”
त्यावर सुलोचना खळखळून हसली आणि खट्याळपणे म्हणाली, “पंत, तुम्ही म्हणाल तसं….!”
— समाप्त —
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈