सौ. वृंदा गंभीर
जीवनरंग
☆ वेळीच मन मोकळं करा… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
दादा वहिनी दोघं आनंदात राहत होते. मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडले होते. त्यांचा संसार आनंदात सुरू होता.
दादा फार शिस्तप्रिय तर वहिनी प्रेमळ मायाळू नाती सांभाळणारी माणुसकी जपणारी……
दादा क्लासवन ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालेले तर वहिनी एक आदर्श शिक्षिका म्हणून रिटायर्ड झाल्या…….
” नोकरीमुळे सतत बदल्या.. बाहेर राहणं.. मुलांच्या शिक्षणासाठी कधी वेगळं राहणं, असचं आयुष्य गेलेलं… आता दोघेही रिटायर्ड झाले उर्वरित आयुष्य एकमेकांना द्यायचं एकमेकांच्या सहवासात राहायचं असं ठरवलं… म्हणून मुलांकडे जाणं टाळलं दादांनी…
मस्त मजेत दिवस चालले होते त्यांचे तीर्थ यात्रा, पर्यटन स्थळांना भेट देऊन झाली…
एक दिवस दादांच्या छातीत दुखायला लागले सीमावहिनीला काहीच सुचेना त्यांनी मुलांना कॉल केला. मुलं म्हणाली “ आम्ही कुणाला तरी पाठवतो हॉस्पिटल मध्ये घेऊन जा आम्हाला वेळ नाही. ”
सीमावहिनीला वाईट वाटलं, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्याला कॉल केला. तो लगेच आला आणि दादांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला…
दादांची इंजिओग्राफी केली रिपोर्ट मध्ये ब्लॉकेज निघाले त्यांना ताबडतोब आंजिओप्लास्टी करायला सांगितली… वहिनीने मुलांना सांगितलं व डॉक्टरांना ऑपरेशन करा सांगितलं. ऑपरेशन सक्सेस झालं…
दादांची पुढील ट्रीटमेंट सुरू केली. 8 ते 10 दिवसात दादा पूर्वीप्रमाणे झाले.
दादांना घरी आणलं पाहुणे, मित्र मंडळी, ऑफिस मधील स्टाफ वहिनींचे विद्यार्थी सगळे येऊन गेले
मुलं काही भेटायला आली नाही.
दादांचं मन उदास झालं होतं. ज्या मुलांसाठी जीवाचा आटापिटा करून त्यांना वाढवलं शिकवलं मोठं केलं त्यांना आज बाबांसाठी वेळ नव्हता. सीमावहिनी बोलायच्या “ आहो, मुलं कामात असतील नाहीतर आले असते… ” मनाची समजूत काढत होत्या.
शेवटी न राहवून वहिनींनी समीरला कॉल केला…
वहिनी ” हॅल्लो समीर, आई बोलतेय “
समीर “. हा, आई बोल काय म्हणतेस ? “
वहिनी ” अरे बाबांना घरी आणलंय. तू भेटून जा.. त्यांना बर वाटेल तू आला तर…”
समीर ” आई यायचं होतं ग पण कामच खूप आहे. सुट्टी मिळत नाही.
वहिनी ” ठीक आहे एकदा वेळ मिळेल तेंव्हा येऊन जा. ”
समीरने ‘हो’ म्हणून फोन ठेवला…..
वहिनी आता कबीरला फोन करतात…
“ हॅल्लो कबीर मी आई बोलतेय…”
कबीर “. हा आई बोल…”
वहिनी, ” बाबांना घरी आणलंय.. तू आला नाही भेटायला…”
कबीर,
“आई खरचं वेळ नाही ग. खूप वाटतं यावं पण काय करू ? फार आठवण येते बाबांची तरी नाही येऊ शकत मी…”
आई, “ बर कबीर ठेवते मी फोन “
कबीर, “ सॉरी आई…”
दादा वहिनी विचार करत बसतात काय कमी केलं आपण, असं का वागतात ही मुलं?
एक दिवस समिरचा मित्र येतो घरी. दादा वहिनींना फार आनंद होतो.
दादा म्हणतात “ अरे या वयात मुलांचा आधार हवा असतो. पण, एकही मुलगा जवळ नाही.. वाईट वाटतं, , , , , , , मुलांना सगळं सुख मिळावं, त्यांचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही एकमेकांना सोडून राहिलो आज मुलं आम्हाला सोडून दूर गेली. ”
समीरचा मित्र म्हणतो “ काका त्यांना काम असते. शेवटी सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट नोकरीमध्ये फरक असतो, जबाबदारी असते मोठी.. ती पार पाडावी लागते, नाहीतर घरचा रस्ता दाखवला जातो.
या धकाधकीच्या जीवनात वेळ उरला कुठे जेमतेम पाच ते सहा तास असतात घरी आराम करायला… सुट्ट्या तर बिलकुल नाही. या कॉर्पोरेट च्या जगात जीवनही कॉर्पोरेट होऊन गेलं…”
दादांना वाईट वाटतं…
तो थोडं शांत बसून बोलायला लागतो… ” काका समीर थोडा रागात आहे त्याने कधी बोलून नाही दाखवलं तुम्हाला पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या होत्या…… त्याला स्पोर्टस मध्ये करियर करायचं होतं… तुम्ही करू दिलं नाही. तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर हो म्हणाले त्याची इच्छा नसतांना तो इंजिनियर झाला…
कॉलेजमध्ये असताना त्याला एक मुलगी आवडायची खूप प्रेम करायचा तिच्यावर. तुम्ही लग्नाला होकार दिला नाही आणि नात्यातली मुलगी पसंद केली आणि लग्न केलं त्याच्या मनाविरुद्ध.
तो अजूनही मनात राग धरून आहे… तुम्ही चांगलंच केलं त्याचं करियर घडवलं…
वेळेत मन मोकळं करता आलं नाही, , , , , त्याच्यासाठी काय योग्य अयोग्य हे सांगितलं असतं तर कदाचित हा दुरावा नसता तुमच्यात….. ”
“ बर, मग कबीरचं काय ? त्याचं तर सगळं मनासारखं आहे तो का दूर पळतोय…”
“काका, कबीरचा तुमच्यात जीव होता. त्याला तुम्ही जवळ असावे असं वाटतं होतं. बालपण होतं वडील जवळ नव्हते… तो शिकला वडिलांशिवाय रहायला… मान्य आहे तुमचा वेळ देता येत नव्हता, पण तुम्ही त्यावेळी त्याला समजून सांगितलं असतं मनातील गैरसमज वेळीच दूर केले असते तर?”
…….
म्हणून मन मोकळं वेळेतच करता आलं पाहिजे म्हणजे बालमनावर परिणाम होऊन दुरावा निर्माण होतं नाही.
दादा वहिनी शांत होते नोकरीमुळे मुलांना वेळ देता आला नाही हे खरं आहे पण, हे सगळं त्यांच्यासाठीच केलं ना… आज मुलांना दादा वहिनीच्या प्रॉपर्टीची काही गरज नाही आणि त्यांच्यासाठी मुलांकडे वेळ आणि… अपुरा संवाद दुरावा निर्माण करतो हेच खरं…
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈