डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ कूपमंडूक… — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(साधना त्यांना डायनिंग हॉल मध्ये घेऊन गेली. तो अतिशय सुंदर भव्य आणि उच्च अभिरुचीने सजवलेला एरिया बघून डोळे विस्फारले या तिघींचे.) – इथून पुढे
साधना म्हणाली, हवे ते मागवा ग. लाजू नका” मेन्यूकार्ड बघत बघत भली मोठी ऑर्डर दिली तिघीनी. रेणुका हे मजेत बघत होती. ऑर्डरने टेबल भरून गेलं. करा ग सुरुवात. ” साधना म्हणाली.
तिघी त्या डिशेसवर तुटून पडल्या.
“बास ग बाई आता. अगदी पोट फुटेपर्यंत खाल्लं. अंजू, आज मुलांना आणायला हवं होतं ना? त्यांनाही मिळालं असतं फाईव्ह स्टार मधलं जेवण. पण त्यांचे वेगळेच असतात प्रोग्रॅम. ती कुठली आपल्याबरोबर यायला? आता आईस्क्रीम खाऊया ना?”
साधनाने आईस्क्रीम मागवलं.
कला म्हणाली, ” साधना, अग सोळा हजार बिल? काय ग. किती हा खर्च. ”
माधुरी म्हणाली, ” हो मग. होणारच एवढा. फाईव्ह स्टार हॉटेल आहे हे. साधनाला काय कमी आहे? मस्त परदेशात जॉब करतेय. नवराही असेल भरपूर कमावत.
साधनाने काही न बोलता सही केली आणि बिल आपल्या अकाउंटवर टाकायला सांगितलं.
“साधना, थँक्स ग. आता पुढच्या वेळी आलीस की घरीच ये आमच्या. म्हणजे खूप गप्पा होतील.
येताना परदेशातून काही आणलं नाही का?”
साधना म्हणाली, ” छे ग. मला काय माहिती तुम्ही भेटाल? आणि मी इथे कॉन्फरन्ससाठी आलेय ना. ” शांतपणे साधना म्हणाली.
“ रेणुका, कारने आली आहेस ना? मग सोड की आम्हाला. तेवढीच टॅक्सी नको करायला. ”
रेणुका म्हणाली, “ नाही ग. मला विरुद्ध दिशेला जायचंय ना. नाहीतर नक्की सोडलं असतं. बाय बाय. ”
त्या तिघी निघून गेल्यावर रेणुका साधनाच्या जवळ बसली ”. गेल्या ना त्या? आता चल बस माझ्या गाडीत. ” साधनाला बोलू न देता रेणुकाने तिला आपल्या कारमध्ये बसवले. कार जुहूच्या रस्त्याला लागली.
सफाईने कार पार्क करत रेणुकाने साधनाला आपल्या दहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये नेले. किती सुंदर आणि मोठा होता रेणुकाचा फ्लॅट. खूप सुंदर सजवलेला, उत्तम फर्निचर आणि अभिरुचीपूर्ण नीटनेटका ठेवलेला.
रेणुका म्हणाली “आरामात बस साधना. आता सगळं सांगते तुला. आपल्या चाळीतल्या खोल्या लागून लागूनच होत्या नाही? अम्मा अप्पा सुद्धा गरीबच ग. माझा भाऊ रवी खूप शिकला आणि परदेशी निघून गेला. मी मात्र झटून अभ्यास केला. एम ए केलं आणि नंतर आय ए एस सुद्धा झाले. मंत्रालयात मिनिस्टरची सेक्रेटरी आहे मी. माझे मिस्टर नागराजन एका मल्टिनॅशनल कंपनीत डायरेक्टर आहेत. एकुलता एक मुलगा आय आय टी रुरकी ला आहे. साधना, खूप झगडले मी इथपर्यंत यायला. सोपी नव्हती ग ही वाट. या एक्झाम्स देताना घाम फुटला मला. आणि नोकरी करून या यू पी एससी क्रॅक करणं सोपं का होतं? मी तिसऱ्या अटेम्प्टला चांगल्या मार्कानी यशस्वी झाले आणि ही ब्रँच निवडली. मग माझं लग्न झालं. अगदी साध्या गरीब कुटुंबातला होता नागराजन. पण त्याची जिद्द हुशारी वाखाणण्याजोगीच होती. दोन खोल्यातून इथपर्यंतचा हा प्रवास दोघानाही सोपा नाही गेला. आता अम्मा अप्पा नाहीत, पण लेकीचं सगळं वैभव बघूनच सुखाने डोळे मिटले त्यांनी. ” रेणुकाच्या डोळ्यात पाणी आलं.
“ आता तुझ्याबद्दल सांग ना मला साधना. ”
साधना म्हणाली, “ तुझ्याइतकं नाही झगडावं लागलं मला रेणुका, पण माझीही वाट सोपी नव्हतीच. एकटीने जर्मनीसारख्या देशात रहाणं सोपं नव्हतंच. पण ही वाट मी माझ्या हट्टाने स्वखुशीने निवडली होती ना? मग तक्रार कशी करू मी? माझी सगळ्याला तयारी होती. मध्ये नोकरी गेली तेव्हा मी हॉटेलात सुद्धा काम केलंय. सोपं नसतंच तिकडे बेकार राहणं ग… पण मग तिकडची पीएचडी मिळाल्यावर मला चांगला जॉब मिळाला. इथली पीएचडी असूनही मला तिकडचीही करावी लागलीच. तेव्हा फार हाल झाले माझे पण नंतर सगळं सुरळीत झालं. अभयसारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. आणि मुलंही गुणी आणि हुशार आहेत माझी. मुलगी डॉक्टर होतेय आणि मुलगा अजून कॉलेज करतोय… एका गोष्टीचं मला फार आश्चर्य वाटलं रेणुका. जेव्हा या कला माधुरी अंजू बघितल्या ना तेव्हा. ! मी मध्यमवर्ग समजू शकते. सगळे लोक कुठून ग डॉक्टर इंजिनीअर आणि तुझ्यासारखे ऑफिसर होणार? पण याही बऱ्या परिस्थितीत आहेतच की. पण काय ग ही वृत्ती. किती हा अधाशीपणा. मला गंमत वाटली, त्यांनी माझी एका शब्दानेही चौकशी केली नाही बघ.. की साधना तू तिकडे काय करतेस? मुलं किती आहेत? मिस्टर काय करतात?
मीच उत्साहाने म्हटलं की आपण तुमच्या कोणाच्या तरी घरी जमूया. तर माधुरीने ते चक्क टाळलेच.
फाईव्ह स्टार हॉटेलात मी उतरलेय म्हटल्यावर त्यांना तिथेच जेवण हवे होते. त्यांना त्यांच्या घरी मला बोलवायचे नव्हते. मी नावे का ठेवणार होते त्यांच्या घरांना ? मी जुन्या मैत्रीसाठी आसुसलेली होते ग ”. साधनाच्या डोळ्यात पाणी आलं.
रेणुका म्हणाली, “ हे असंच असतं ग साधना. मीही हे अनुभव घेतले आहेत यांचे. माझ्या घरी अनेकवेळा येऊन जेऊनखाऊन गेल्यात या तिघी. पण मी अजूनही यातील एकीचेही घर बघितलं नाहीये. सोड ग. आपण केलेले कष्ट दिसत नाहीत त्यांना. मी म्हणूनच लांबच असते यांच्यापासून. मला काय वाटतं साधना, हे लोक असेच रहाणार. डबक्यातले बेडूक. हेच कोतं विश्व त्यांचं… एव्हढसंच.. त्यांचं मनही मोठं नाही ग. हेवेदावेही आहेतच. आता बघ ना.. इतक्या वर्षांनी तू भेटलीस तर त्यांनी कौतुकाने घरी बोलवायला हवं होतं. किती आनंद झाला असता ना तुला. पण ते केलं नाही त्यांनी. वसुली केल्यासारखं अन्नावर तुटून पडल्या त्या. कधी बाहेरचं जग बघितलं नाही, आणि त्या डबक्यातून बाहेर पडायची इच्छाही नाही. जाऊ दे ग. माणसं अशीच असतात साधना. तू खूप दूर परदेशात रहातेस म्हणून तुला हे खटकलं. मला सवय झालीय या वृत्तीची… पण सांगू का.. मला माधुरीचा फोन आला तेव्हा मात्र खराखुरा आनंद झाला. मी तुला भेटायची संधी सोडणार नव्हते. खूप घट्ट मैत्रिणी होतो आपण. कितीतरी वेळा तुझ्या आईच्या हातचं सुग्रास जेवण जेवलेय मी. मोठ्या मनाचे ग आईभाऊ तुझे. पण बाकी काही असलं तरी माधुरीमुळे आपण इतक्या वर्षांनी भेटलो म्हणून तिचे आभारच मानले पाहिजेत.”
यावर दोघीही हसायला लागल्या. “ आता मात्र आपण कायम एकमेकींच्या संपर्कात राहूच. साधना, त्या अशा हावरटासारख्या वागल्या म्हणून मी तुझी क्षमा मागते. ”
” अगं काय हे रेणुका. क्षमा कसली मागतेस तू? वेडी आहेस का? ” साधनाने तिला जवळ ओढून घेतलं. “आता ही जुळून आलेली मैत्री कधीही सोडायची नाही. कबूल ना?”
रेणुका हसत ‘हो’ म्हणाली. आत गेली आणि एक सुंदर भरजरी कांजीवरम साडी तिच्या हातात देत म्हणाली ” ही मुकाट्याने घ्यायची. नेसायची. हे आपल्या नव्याने उजाळा मिळालेल्या मैत्रीचे प्रतिक म्हणून वापर तू. ”
… दोघीना हुंदका आवरला नाही.
“ रेणुका, तोंडदेखलं नाही पण अगदी मनापासून म्हणते, एकदा खरोखरच ये जर्मनीला. मैत्रिणीचा संसार तिचं घर बघायला. येशील ना? ”
“ अगं. नक्की येईन. आवडेल मलाही. ”
… पुन्हा रेणुकाला गच्च मिठी मारून आणि दोघींचे डोळे पुसून साधनाने रेणुकाचा हसत हसत निरोप घेतला.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्योती ताई कथेतून वास्तव जीवनातला पैलू छान उलगडून दाखवला.