श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ ‘आभाळाला हात टेकवून जमिनीवर येणारा माणूस !‘ – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एक दिवसच कसाबसा टिकला तो वेदपाठशाळेत ! पण त्या एका दिवसात तो थेट गुरुजी दिसायला लागला होता! शेंडी वगळता डोईवरच्या उर्वरीत सर्व केसांना त्याला मुकावं लागलं होतं! तो वेदपाठशाळेतून घरी कसा परतला कुणास ठाऊक.. पण घरी आल्याबरोबर त्याच्या भावंडांनी त्याला “टक्कल! टक्कल!” म्हणून चिडवायला आरंभ केला. त्यावर या पठ्ठ्याने हाती काठी धरली… आणि तिचे दोन फटकारे लगावून त्या दोघा भावांना गावातल्या केशकर्तकाच्या समोर पोत्यावर नेऊन बसवले.. आणि ते दोघेही तंतोतंत आपल्या सारखे दिसावेत याची तजवीज केली! हा थोरला आणि ती बिचारी दोन लहान पोरं… करणार काय?
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने अक्षरश: पावन झालेल्या मातीत तो जन्माला. घरात उदरभरणाचे दोनच मार्ग… एक पौरोहित्य आणि भातशेती. पण पहिल्या मार्गावर त्याची पावले फारशी स्थिरावली नाहीत… मात्र भाताच्या खाचरांमध्ये तो उतरला की शेतक-याचं रुपडं पांघरलेला बळीराजा भासायचा. पंचक्रोशी हे जणू त्याचं खेळायचं अंगण… आणि गावातले सारे सख्खे मित्र. परंपरेने आलेले त्याला बुद्धीमत्तेचा वारसा त्याच्या वडिलांकडूनच लाभला होता.
शिक्षणासाठी गावापासून थोडे दूर पण एका सोयीच्या गावी सर्व भावंड कंपनी एकत्र वास्तव्यास असताना त्याच्या बाललीलांना केवळ बहरच आला होता. गुरुजींना चकवा देऊन बहिणीची गृहपाठाची वही स्वत:ची म्हणून तपासून घेण्यात त्याला सहजी यश मिळायचे.
तो त्याच्या काकांकडून मंडप बांधायला शिकला आणि स्पीकर लावायला सुद्धा. हा व्यवसाय मात्र त्याने अगदी गंमत म्हणूनच केला. त्यासाठी लागणारी सारी सामग्री त्याने जमवून ठेवली होतीच. आणि सोबतच अक्षरश: बारा बलुतेदारांना आवश्यक असतात अशी आयुधे त्याच्याकडे जमा झाली होती… त्यामुळे कोणतंही काम कधी अडून राहायचं नाही.. गावातल्या कुणाचंही.
जनसंग्रह करण्याची त्याची नैसर्गिक ओढ होती… त्याला सतत माणसं लागायची. आणि या माणसांच्या हृदयात प्रवेश करायला त्याला फारसे सायास लागत नसत. लाल मातीने माखलेल्या पायांनी तो कुणाच्याही घरी गेला तरी सर्वांना तो यायला हवा असायचा.
पण खोडकरपणा हा गुण त्याने जाणीवपूर्वक जोपासला होता की काय, अशी शंका यावी एवढी त्याने या अस्रावर हुकुमत मिळवली होती. ज्या व्यक्तीवर तो हे असले अचाट प्रयोग करी, त्यांना त्याचा कधी फार राग आला आहे, असे कधी व्हायचे नाही.
अंगणातल्या बाजेवर दिवसाउजेडी गाढ झोपी गेलेल्या माणसाच्या शेजारच्या भिंतीवरच्या खुंटीवर, कुठून तरी पैदा केलेल्या रिकाम्या सलाईनच्या बाटलीत पाणी भरून, ती बाटली टांगून ठेवणे आणि त्या बाटलीची नळी त्या माणसाच्या पायाजाम्याच्या खिशात अलगद घालून तिथून पोबारा करणे, असा अफाट उद्योग तोच करू जाणे! गरज नसेल त्यावेळी काथ्याच्या बाजेला बांधलेल्या, विणलेल्या दो-या लोक काढून ठेवत आणि गरज असेल तेंव्हा पुन्हा बांधत. अशा दो-या न बांधलेल्या बाजेवर सुंदर गोधडी अंथरूण, गावातल्या एका मित्राला मोठ्या आग्रहाने त्या बाजेवर त्याने बसायला भाग पाडले आणि तिथून पलायन केले!
वडिलांना शक्य नसेल अशा वेळी कुणाच्या घराचे कार्य अडून राहू नये म्हणून खांद्यावर पिशवी लटकावून रानावनातून, दोन-तीन डोंगर ओलांडून, चढून यजमानांच्या घरी काका म्हणून तंगडतोड करीत जाण्यात त्याने कधी कंटाळा नाही केला.
बारावी कॉमर्स उत्तीर्ण या एवढ्या शिदोरीवर त्याने शहरात येऊन सुरु केलेला प्रवास गेल्या काही वर्षांत एका अर्थाने आभाळाला हात टेकवू शकेल इतपत झाला.
मिळालेल्या संधीचा मनमोकळेपणाने स्वीकार करत त्याने मेहुण्यांच्या दुचाकीवर मागे बसून कामावर जाणे ते कंपनी मालकाच्या हेलिकॉप्टरमधून नियमित प्रवास करण्यापर्यंत मजल मारली. यात त्याला इथपर्यंत आणणा-या सहृदय माणसांचे श्रेय होते तेवढेच त्याच्या स्वकर्तृत्वाचे सुद्धा होते. लोक ज्या सहजतेने ‘ मी आताच एस. टी. तून उतरलो’ एवढ्या सहजतेने तो मी आताच हेलिकॉप्टरमधून उतरून घरी आलो’ असं सांगायचा. आणि हे सांगताना त्याच्या शब्दांत कोणताही बडेजाव मिरवण्याचा हेतू नसायचा.
औपचारिक व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्याआधीच त्याने त्या व्यवसायातील कित्येक कौशल्ये शिकून घेतली. कोणत्याही निमित्ताने इतरांशी आलेले संबंध सौहार्दाचे राखले. इतरांच्या घरांतील थेट स्वयंपाक घरापर्यंत तो सहजी पोहोचत असे, यातच त्याच्या निर्मळ मनाचे आणि वर्तनाचे सार होते.
मालकाचा प्रतिनिधी म्हणून देशभर वावरत असताना त्याने अत्यंत विश्वासाचे स्थान निर्माण केले होते. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात कित्येक लाख कमावण्याची संधी असताना त्याने केवळ पगारात भागवले हे अगदी खरे. त्यामुळे त्याला कधी काही कमी पडले नाही. त्याच्या सर्व सामर्थ्याचा लाभ त्याच्या जवळच्या सर्वांनाच झाला. इतरांची आजारपणे, आर्थिक अडचणी, कायदेविषयक कटकटी, कौटुंबिक ताण त्याने स्वत:चे मानले. जबाबदारी ही गोष्ट प्रत्येकाच्या मानण्यावर असते. आणि समोर जर जबाबदारी बेवारस पडली असेल तर त्या जबाबदारीला हा गडी थेट आपलीच मानायचा… त्यामुळे त्यासोबत येणा-या सा-या साधका-बाधक गोष्टी त्याच्या खात्यावर डेबिट पडायच्या.
आणखी एक गोष्ट… त्याला वर्तमानपत्रातील शब्दकोडी सोडवायला आणि ती देखील अत्यंत वेगाने सोडवायला आवडायचे. पण एखादा तरी शब्द अडायाचाच.. मग जवळच्या लोकांना सकाळी सकाळी फोन लावणे आलेच. दर रविवारी तर महाशब्दकोडे हा प्रकार तो अत्यंत प्रतिष्ठेचा बनवून ठेवायचा. शिवाय शब्दकोडे सोडवण्यासाठी त्याने निवडलेली जागा अशी होती की त्याला कुणी तिथे त्रास द्यायला जाणार नाही! कुणी त्याला शब्द सांगायला थोडा अधिक वेळ लावला तर तो पर्यंत त्याला शब्द सुचलेला असायचा. बरं, फोनवर बोलताना तो समोरच्याला त्याच्या ख-या नावाने कधीच हाक मारायचा नाही. एखाद्याचे नाव प्रसन्न असेल तर तो त्याला गोपाळ संबोधणार हे ठरलेले. मित्रांच्या बायकांना तर तो नावे ठेवून म्हणजे नवी नावे देऊन अक्षरश: वात आणायचा… पण या सर्व बायाबापड्या वर्गाला हा म्हणजे हक्काचा माणूस वाटायचा…. निर्मळ दृष्टी, प्रेमाचे बोलणे, हिताचे बोलणे, आर्जवाचे बोलणे हे त्याचे वैशिष्ट्य. आपल्या सभ्य वागण्याने त्याने त्याच्या सहवासात येणा-या सा-याच महिलांचा आदर कमावला. त्या सा-या जणींना त्याच्या सहवासात सुरक्षित वाटायचे!
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान.उत्कंठावर्धक