श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ वाटणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

एका केसची फाईल चाळत असतांनाच मोबाईल वाजला. बापूकाकांचं नांव स्क्रीनवर पाहून मला आश्चर्य वाटलं. कारण काका क्वचितच कुणाला स्वतःहून फोन करत.

” बोला काका. आज बऱ्याच दिवसांनी फोन केलात. तब्येत वगैरे ठिक आहे ना?”

” तब्येतीचं काय सांगायचं?तशी ठिक आहे पण सतत काहितरी आजारपण सुरुच असतं. जीवाला काही आराम नाही “

“आता वय झालं की असं होणारच. बोला आज कशी काय आठवण काढलीत?”

” फोन याचकरीता केला की आता माझ्या तब्येतीचं काही खरं राहीलं नाही. म्हंटलं काही बरंवाईट होण्याच्या आत घराचे वाटेहिस्से करुन द्यावेत. म्हणजे आपण गेल्यानंतर पोरांनी कोर्टकचेऱ्या करायला नकोत “

काका योग्य तेच म्हणत होते. मागेही त्यांना तसं सुचवण्याचा विचार माझ्या मनात आला होता पण ते त्यांना कितपत रुचलं असतं हा विचार करुन मी चुप बसलो होतो.

” हो बरोबर. मग तुमचा काय विचार आहे तसं मला सांगा म्हणजे तसं मृत्युपत्र तयार करता येईल”

” या रविवारी तुला गांवी यायला जमेल का?रमेशलाही बोलावून घेतो. गांवातल्या एकदोन प्रतिष्ठित मंडळींनाही सांगावा धाडतो. एकत्र बसून सगळ्यांच्या सल्ल्याने ठरवू. मग मृत्युपत्र बनवू “

” हो चालेल. पण तुमची इच्छा काय आहे ते तरी कळू द्या “

” तशी काय आपली फार मोठी इस्टेट नाही. एक घर आणि शेती याव्यतिरिक्त आपल्याकडे काहिही नाही. आणि तू तर बघतोच आहेस की रमेशचं सगळं व्यवस्थित चाललं आहे. सरकारी नोकरी आहे. शहरात स्वतःचं मोठं घर आहे. चारचाकी गाडी आहे. योगेशकडे त्यातलं काही नाही. कशीबशी शेतीवर गुजराण करतो बिचारा. म्हणून रहातं घर आणि शेती दोन्ही त्याच्या नावावर झालं तर बरं होईल “

काका योग्य तेच म्हणत होते. मी स्वतःही ते जाणून होतो.

“हो बरोबर. मला वाटतं काका रमेशही काही हरकत घेईल असं वाटत नाही. तो तसा समजदार आहे “

” मलाही तसंच वाटतं. रमेश चांगलाच आहे रे पण त्याची बायको जास्त शहाणी आहे. ती त्याला तसं करु देणार नाही “

सुरेखा वहिनी हुशार होती. उच्चशिक्षित होती हे मला माहित होतं पण आपल्या दिराची आर्थिक परिस्थिती तिलाही दिसत होती आणि अशीही तिच्या संसारात कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती. त्यामुळे ती काही आडकाठी घेईल असं मला वाटत नव्हतं. अर्थात इस्टेटीचा प्रश्न आला की माणुसकी, रक्ताची नाती विसरली जातात, भाऊ भावाचा, मुलगा वडिलांचा खुन करायला मागेपुढे पहात नाही हे माझ्या वीस वर्षांच्या वकिली व्यवसायात मी अनेकदा अनुभवलं होतं.

” ठिक आहे काका. मी येतो. समोरासमोर बसुनच ठरवू. मात्र रमेशला सांगून ठेवा की सुरेखा वहिनीला सोबत आणू नकोस. भावांऐवजी जावांचीच भांडणं व्हायची ” मी हसत म्हणालो

” तसं काही होणार नाही पण ती भानगडच नको. मी रमेशला तसं सांगून पहातो. पण त्याचंही बायकोपुढे फारसं चालत नाही “

” तसं तर बहुतेक नवऱ्यांचं बायकोपुढे चालत नाही ” मी हसत म्हणालो ” पण ठिक आहे. सुरेखावहिनी आलीच तर मग काही इलाज नाही “

” खरंय. ठिक आहे. ये मग नक्की “

असं म्हणून काकांनी फोन बंद केला. माझ्या डोळ्यासमोर सुरेखावहिनी उभी राहिली आणि माझ्या लक्षात आलं की कुणी कितीही तिला नावं ठेवली तरी तिच्या हुशारीमुळेच रमेशची भरभराट झाली होती हे मात्र शंभर टक्के खरं होतं. ती महत्वाकांक्षी होती. रमेशला प्रमोशनच्या परीक्षा द्यायला लावून तिने हट्टाने त्याला अधिकारी बनवलं होतं. तिच्या तुलनेत रमेश अतिशय साधा होता. मी त्याला सरकारी नोकरीत लावलं नसतं तर तो आजही कुठल्यातरी दुकानात फालतू नोकरी करीत बसला असता. तसा तो मेहनती होता. मात्र स्वतःची प्रगती करुन घ्यायची हुशारी त्याच्यात नव्हती.

संध्याकाळी कोर्टातून घरी आलो. चहा घेऊन होत नाही तोच मोबाईल वाजला. स्क्रीनवर सुरेखावहिनीचं नांव वाचल्यावर माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. आता ही बया काय म्हणते या विचारातच मी फोन उचलला

” भाऊजी मी सुरेखा बोलतेय. कामात तर नाही ना?नाहीतर नंतर फोन करते “

” नाही नाही. बोल ना “

” भाऊजी बापूंचा तुम्हांला फोन आला असेल. रविवारी तुम्हांला बोलावलं असेल. खरं ना? “

” हो बरोबर. का?काही अडचण?”

” नाही अडचण काही नाही. पण ते तुम्हांला हेच सांगतील की रमेशला काही कमी नाही तर घर आणि शेत योगेशला देऊन टाकूया “

मी सावध झालो. माझ्यातला वकील जागा झाला. ती माझं मत विचारणार होती आणि ते आताच उघड करणं चुकीचं झालं असतं

” तसं ते मला काही बोलले नाहीत. पण तसं ते पुढे बोलले तर मग तुझा विचार काय आहे ?”

“भाऊजी मी तुमचं मत विचारतेय. तुम्हांला काय वाटतं देऊन टाकावं सगळं योगेशभाऊजींना?”

मी आता काय बोललो त्याचा उल्लेख रविवारी होणाऱ्या चर्चेत नक्कीच झाला असता त्यामुळे मी माझं मत व्यक्त करणं चुकीचं होणार होतं.

” मला काय वाटतं यापेक्षा दोघा भावांना विशेषतः बापूकाकांना काय वाटतं ते महत्वाचं आहे वहिनी. कारण इस्टेट त्यांची आहे. रविवारच्या बैठकीत त्यावर चर्चा होईलच”

” भाऊजी मला मान्य आहे की आम्हांला कशाचीच कमतरता नाही. ह्यांची चांगली नोकरी आहे आणि माझा ब्युटीपार्लरचा व्यवसायही उत्तम सुरु आहे. पण मला सांगा लहानपणापासून आतापर्यंत बापूंनी ह्यांना काय दिलं?कोणतं बापाचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं?माझ्यापेक्षा तुम्हीच हे जाणता की वयाच्या दहाव्या वर्षापासून हे काम करताहेत. त्याच्याही अगोदर पाच वर्ष हे त्यांच्या मामाकडेच शिकायला होते. म्हणजे जन्मल्यापासून फक्त पाच वर्ष बापूंनी ह्यांना सांभाळलं. ती पाच वर्षही अतिशय गरीबीची होती असं मला ऐकून माहित आहे. आज हे बेचाळीस वर्षाचे आहेत. या बेचाळीस वर्षात कधी बापूंनी ह्यांना नवीन कपडे केलेत?कधी ह्यांची मुलगा म्हणून हौसमौज पुर्ण केली?कधी ह्यांच्या शिक्षणावर खर्च केला?सांगा ना कोणतं बापाचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं?उलट बापाने ह्यांना पोसायच्या ऐवजी ह्यांनीच आईबापांना पोसलं हे तर जगजाहीर आहे “

ती पोटतिडकीने बोलतेय आणि तिच्या बोलण्यात काही चुक नव्हती हे मला समजत होतं. पण काहितरी बोलावं म्हणून मी म्हणालो

” हो हे मान्य आहे मला वहिनी पण बापूकाकांची आर्थिक परीस्थितीच तशी होती. शेती अशी बिनभरवशाची. कधी दुष्काळ तरी कधी अतिवृष्टी तर कधी पिक जोमाने आलं तर शेतमालाला भाव नाही. चार एकर शेतीत कसं करावं माणसाने?ते स्वतःच कसंबसं पोट भरत होते. मुलांची हौसमौज त्यांनी करावी तरी कशी?ते नेहमीच आर्थिक विवंचनेत असत. माझ्या वडिलांनीही त्यांना बऱ्याचदा आर्थिक मदत केलीये”

” हो भाऊजी ते कळतंय मला. पण माझ्या नवऱ्याने काय नाही केलं त्यांच्यासाठी?जीवापाड कष्ट करुन शेतीला वेळोवेळी पैसा पुरवला. प्लाॅट घेऊन घर बांधायला मदत केली. योगेश भाऊजींचं शिक्षण केलं. दहा वर्षांपूर्वी आई वारल्या तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराचा आणि धार्मिक विधींचाही खर्च ह्यांनीच केला. बापूंनी आणि योगेश भाऊजींनी एक रुपयाची मदत केली नाही. दोन वर्षांपूर्वी बापूंची एंजिओप्लास्टी झाली तेव्हाही तसंच. सगळा खर्च ह्यांनीच केला. तेव्हाही योगेश भाऊजींनी एक रुपयाची मदत केली नाही. या गोष्टींची तरी त्यांनी जाणीव ठेवायला हवी होती की नाही?योगेश भाऊजी कामाला लागले, शेतीत चांगलं उत्पन्न मिळू लागलं तेव्हा तर बापू काही करु शकले असते?मुलाला एखादं शर्टाचं पीस आणि सुनेला एखादी साधी साडी घेण्याचीही त्यांची ऐपत नव्हती?”

“म्हणजे आजपर्यंत त्यांनी कधीही तुम्हांला कपडे वगैरे घेतले नाहीत?तुम्हांला नसतील तर तुमच्या मुलांना तर केले असतील?”

ती आता रडायला लागली. रडतारडता म्हणाली

” भाऊजी एक छोटंसं खेळणं, एखादं चाँकलेटसुध्दा बापूंनी माझ्या मुलांना कधी घेऊन दिलं नाही. कधी विषय काढला तर म्हणतात, तुम्हांला काय कमी आहे. धो धो पैसा वाहतोय. पण मग आम्ही सतत देतच रहावं का?त्यांच्याकडून कधी अपेक्षाच करु नये का?दिवाळीला गांवी गेलं की आम्ही सगळ्यांना कपडे करतो. योगेश भाऊजींच्या मुलांसाठी खुप सारा खाऊ घेऊन जातो. फटाके घेऊन जातो. आणि ते आम्हांला काय देतात?दोन किलो मुगाची आणि तुरीची डाळ?योगेश भाऊजींना आणि त्यांच्या बायकोला कळत नसेल तर बापूंनी तर त्यांना सांगायला पाहिजे?”

ती म्हणत होती तो एकूण एक शब्द खरा होता. बापूकाकांचा स्वभाव तसाच होता. माझ्या वडिलांनीही त्यांना अनेकदा मदत केली होती पण कधीही त्यांनी माझ्या वडिलांना काही घेतलं नव्हतं. एवढंच काय आम्ही त्यांचे पुतणे असूनही कधी आमच्यासाठी खाऊ आणल्याचं ही मला आठवत नव्हतं. यावरुन घरात माझ्या आईवडिलांचेही बऱ्याचदा वाद झालेले मी बघितले होते. मला काय बोलावं ते सुचेना. क्षणभराने मी तिला विचारलं

” मग रमेश काय म्हणतो अशा वेळी?”

” ते काय म्हणणार?तुम्हांला तर माहितच आहे की ते हरीश्चंद्राचे अवतार आहेत. मी काही म्हंटलं की म्हणतात ‘जाऊ दे आपण मोठे आहोत, आपण आपलं कर्तव्य करत रहायचं. देवाच्या कृपेने आपल्याला कसलीच कमतरता नाही. ते गरीब आहेत. त्यांच्याकडून आपण कशाला अपेक्षा करायची?’ भाऊजी मला सांगा झोपडपट्टीत रहाणारेसुध्दा आपल्या कर्तव्याला चुकत नाहीत. आमच्या घरी काम करणारी बाई तिचा श्रीमंत भाऊ तिच्याकडे आला तर त्याला आणि त्याच्या बायकोला कपडे केल्याशिवाय सोडत नाही. मग बापू आणि योगेश भाऊजी एवढे भिकारी तर नाहीत ना?”

सुरेखा वहिनीचा दुखरा कोपरा माझ्या आता लक्षात आला होता. बापूकाका, योगेश आणि त्याची बायको रमेशच्या कुटुंबाला किंमत देत नव्हते आणि हीच गोष्ट सुरेखा वहिनीच्या जिव्हारी लागली होती. अर्थात कायद्याच्या भाषेत आणि संपत्तीचे वाटेहिस्से करतांना या वैयक्तिक भावनांना काही स्थान नव्हतं.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments