श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

जरी आंधळा मी ! श्री संभाजी बबन गायके 

जन्माला झाली असतील पंधरा-सोळा वर्षं. जातीवंत आईच्या पोटी जन्मलो तेव्हा सर्वांनाच आनंद झाला होता. वीसेक एकर शेती, शिवाय इतरांची कसायला, अर्धलीनं घेतलेली तेवढीच शेती…   माझ्या येण्याने शेत-शिवार आणखी फुलून यायला मदतच होणार होती….    लेकरं चार घास आणखी मिळवणार होती.

आईनं दुधाला कमी पडू नाही दिलं. अंगी बळ वाढत होतं आणि लवकरच शेतावरही जाऊ लागलो. माझे मोठे डोळे, काळेभोर. त्वचेवर पांढ-या ढगांची जणू पखरण झालेली. दमदार चाल आणि बैजवार चालणं…   कुणाच्या अंगावर जायचं नाही आणि कुणी अंगावर आलंच तर त्याला आईचं दुध आठवावं असा माझा प्रतिहल्ला…  बाहेरचे शहाणे माझ्यापासून त्यामुळे थोडे अंतर ठेवीत असत. मात्र घरातले सर्व माझ्या अगदी अंगाशी खेळणारे..  लहान मुलं तर माझ्याभोवती निर्धास्त खेळत.

फार काही अंगाला झोंबलं, लागलं, दुखलं म्हणून कधी डोळ्यांतून एक टिपूस पाणी नाही आलं कधी…   पण एके दिवशी उजव्या डोळ्याला धार लागली. डोळ्यांत काहीबाही जातं शेतात कामं करीत असताना म्हणून मी आणि सगळ्यांनीच ही गोष्ट डोळ्याआड केली….    कामाचा धबडगाच इतका असतोय रानात….    आजारा-बिजाराला आणि त्यांचे कोड पुरवायला शेतक-याला कसली आली सवड?

पण मोठ्या दादांच्या ध्यानात आलं दोनच दिवसांत. काहीतरी गडबड आहे म्हणाला…   डॉक्टर साहेबांकडे लगोलग घेऊन गेला. “डोळा वाचणार नाही!” मी ऐकले आणि दादाने सुद्धा. पण माझ्याआधी त्याच्याच डोळ्यांत काळजीचं आभाळ दाटून आलं. डॉक्टर म्हणाले, ”कुठं खर्च करीत बसता! बघा काय निर्णय घेताय ते…   पण याला सांभाळत बसावं लागेल घरीच ठेवलं तर!”

तसं दादा लगबगीने म्हणाले, ” हा आमचाच आहे..  आमचाच राहील. सांभाळू की घरच्या घरी. काय खर्च व्हायचा तो करू…   पण याचा हा डोळा वाचतोय का बघा…   दुसरा डोळा आहेच की अजून शाबूत. ” 

डॉक्टर साहेबाचं मन ओलं झालं…   ”तुम्ही एवढी नुकसानी पदरात घेताय…   तर माझा पण शेर असू द्यात की या कामात. माझी फी बी काही नको. करून टाकू आपण जे काही गरजेचे असेल तेवढं!’ 

मी माझ्या चांगल्या डोळ्याने त्या दोघांकडे एकवार पाहून घेतलं….    दुसरा डोळा त्याच मार्गाला जाणार असं मला आपलं वाटून गेलं! 

दुखलं खूप तो डोळा डॉक्टर टाके घालून शिवत होते तेंव्हा….    पण या देहाला सवय होती सोसायची…   जन्मच तसा दिलाय देवानं…   करणार काय? 

घरी आलो…   पण खूप दिवस बसून राहणं मनाला पटेना. उभारी धरली आणि कामाला जुंपून घेतलं स्वत:ला..  जमेल ते करीत राहिलो…   एका डोळ्याने अजिबात दिसत नाही हे पार विसरून गेलो. देवाची पण काय करणी पहा…   महत्त्वाच्या चीजा एक एक जास्तीच्या दिल्यात त्यांनं…   एक निसटलं तर दुसरं हजर. बघा ना, दोन-दोन कान, दोन-दोन डोळे!

पण हे दान मला नाही पुरलं…   वर्षभरात दुस-याही डोळ्याने पहिल्या डोळ्याची वाट धरली! आता तर कुणाचा काही इलाज असेल असं वाटावं अशी हिंमतच नाही उरली काळजात. पण याही वेळेस दादा, डॉक्टर आणि इतर सर्वच माझ्या पाठीशी उभे राहिले. राहू द्या…   एका कोप-यात पडून राहील जन्मभर…   आम्ही खायला-प्यायला घालू…   शेतकरी आहोत…   घासातला घास देऊ! आमच्यात घरातल्यांना वृद्धाश्रम दाखवला जात नाही…..     उद्या आपली सुद्धा तीच गत होते…   म्हणून आपलं म्हणून जे कोणी आहेत त्यांना घरात आणि उरात जागा करून द्यायची रीत मातीत पावलं रुतवून असणा-या कृषीवलांची.

याही वेळी कुणीच माझ्या दादाकडून एक नवा पैसा घेतला नाही. पुण्य करण्याची अशी एखादी लहानसहान संधी चांगली माणसं बरी सोडतील….    मोठं पुण्य करण्याची ताकद देव देईल तेंव्हा देईल! 

आता उरलेला उजेडही माझ्यासाठी परका झाला…   आणि मी हिरव्या शेताला पोरका झालो….    मातीला पारखा झालो!

दादांची आई होती म्हातारी झालेली. तिने तिच्या सुरकुत्या पडलेल्या हातांनी मला घास भरवले…   बाकीची कामांत गुंतले असताना ही माऊली या तिच्या नातवाला गोंजारत राहिली…   दुखलं-खुपलं पाहू लागली. आणि माझ्याही नकळत मी तरुण झालो..  धष्टपुष्ट बनलो! माझा मी मला पाहू शकणार नव्हतो शेतातल्या पाटात वाहत असलेल्या पाण्यात माझं प्रतिबिंब पडेल पण मी पाहू शकणार नव्हतो….    हो…   दादाच्या डोळ्यांनी मात्र पाहीन..  त्याने शेतात नेलं तर.

एखाद्या लहानग्या पोरांचं करावं तशी माझी काळजी घेतली गेली. येणारे-जाणारे पाहुणे मला बघायला यायचे..  आणि कुणी काही, कुणी काही म्हणून जायचे. या बिनाकामाच्याला नुसतं सांभाळून होणार तरी काय? असा सर्वांचा सवाल होता…   आणि त्यात काहीही खोटं नव्हतं! 

दुसरं कुणी असतं दादाच्या जागी तर माझी रवानगी एव्हाना झालीही असती आणि माझ्या खुणा कायमच्या पुसल्या गेल्या असत्या या जन्माच्या सारीपाटावरच्या! 

गिधाडं आभाळात घिरट्या घालून घालून थकली….    पण मी कोसळून पडलो नाही. कारण बाकीचे अवयव शाबूत..  बुद्धी जागेवर..  आणि मनाची तयारी भरभक्कम होती. एखाद्या चित्रातील सुंदर चेह-यावर चित्रकार डोळे रंगवायचे विसरून गेला असावा..  तशी त-हा! 

जागच्या जागी बसून राहणे…   माझ्यासाठी चांगले नव्हते आणि मलाही ते नकोच होते. शरीर धडधाकट आहे…   का नाही काम करायचं? त्याच्या मनात नसूनही दादाने माझ्या खांद्यावर थोडं ओझं टाकून पाहिलं…   मी नको म्हणालो असतो तर त्याने जबरदस्ती नसती केली…   माझी खात्री आहे! 

पण इतक्या दिवसांच्या आरामाने स्नायू जरा आळसावलेले होते..  त्यांना सरळ करायला पाहिजेच की. लागलो कामाला. इतका का हळूहळू मी आणि सारेच विसरून गेले…   मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे ते! 

डोळ्यांना माती दिसत नसली तरी पावलांना तिची ओळख आधीपासूनची. पण जराशी पावलं चुकली की थांबायचो…   मग दादा म्हणायचा…   सोन्या…   जरा थोडा इकडं सर…   पलिकडं हो…   थांब…   आणि आता चल! बास…   हे चारच शब्द पुरू लागले…   मी आपसूक योग्य रस्ता धरून चालू लागलो. मजबूत खांद्यांना ओझ्याची तमा नव्हती…   पाठीवर दादाचा राठ पण प्रेमाचा हात पडला की दिसत नसलेलं आभाळ समोर येऊन उभं ठाकायचं…   आभाळातली गिधाडं मला तर केंव्हाच विसरून गेली असतील! 

घरातल्या लग्नांना जाताना मी सोबत असायचो…   खळाळून हसणा-या कलव-या, नटलेली बाया माणसं…   नाचणारी पोरं..  आणि लाजणा-या नव्या नव-या…   सारं काही अनुभवलं या शिवलेल्या डोळ्यांमधून….    दिवस गोडीने आणि जोडीने पुढे पुढे चालत होते…   माझ्यासारखे!

दादाचा संसात वाढत गेला…   खाणारी तोंडं वाढत गेली आणि माझं शेतातलं काम सुद्धा. मग कधी दुस-याच्या शेतावर जाऊ लागलो…   वाट दावायला सर्व होतेच सोबत. मला काही पाहण्याची गरज उरली नव्हती. खाल्लेल्या घासाला जागायचं म्हणून जगायचं होतं…   शेवटापर्यंत…   दादाच्या जवळ..  त्याच्या वावरात…   त्याच्या अंगणातल्या झाडाखाली!

खूप दिवस…   नव्हे खूप वर्षे उलटून गेली की माझे काळीज अंधारून गेले होते त्या गोष्टीला…   आता शरीर थकलं! दादाने मला आता शेतावर नेणं बंद केलंय…   पण घरी मन रमत नाही….    धाकल्या-थोरल्या भावंडांना इतरांनी मारलेल्या हाका ऐकल्याशिवाय गमत नाही! मला जायचं असतं…   दादासोबत शिवारात…   पण दादा नको म्हणतोय! किती केलंस आमच्यासाठी…   आता पुरे झालं की रं मर्दा! सुखानं पडून रहा…   गळ्यातल्या घाटी हलवत हलवत…   तो आवाज घुमू दे अंगणात, घरात! नातवंडं-पतवंडं खेळतात की तुझ्या नजरेच्या पहा-यात! 

शेवट दिसत नसला तरी जाणवतोय हल्ली….    देहातली शक्ती क्षीण झालीये…   पैलतीर दिसतो आहे! 

दादा कुणाला तरी सांगत होता…..     याचा देह मातीत गेला तरी याची समाधी बांधीन….    याला नजरेसमोरून हलून देणार नाही….    मी असेतोवर! 

हे ऐकून डोळ्यांच्या आत पाझारलेली आसवं…   थेट काळजात घुसली…   आणि काळीज ओलं ओलं झालं! देवा…   मी गेल्यावर डोळे भरून पाहण्याची एकवार मुभा देशील मला…   माझ्या या शेतकरी दादाला पाहण्याची? 

(गोवंश हा आपल्या मातीचा खरा आधार. आईच्या आणि गाईच्या पोटी जन्मलेलं प्रत्येक लेकरू शेतक-यास प्राणाहुनी प्रिय. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील वाळूज गावात एक शेतकरी दादा राहतोय…   शेती कसतोय. त्यांचं नाव…   इंद्रसेन गोरख मोटे. त्यांच्या कपिलेने एका खोंडाला जन्म दिला. दोन वर्षात हा सोन्या औतकाठीच्या कामाला आला. पण दुर्दैवाने त्याचा एक डोळा निकामी झाला. लोकांनी हा बैल बाजारात विकून टाकण्याचा व्यवहारी सल्ला दिला. पण दादांनी सोन्याला विकले नाही. कालांतराने सोन्याने दोन्ही डोळे गमावले. आता तर सोन्याची कसायाच्या कत्तलखान्यात रवानगी होणं निश्चित होतं..  पण इंद्रसेन आणि त्यांच्या कुटुंबाने सोन्याला शेवटापर्यंत सांभाळण्याचे ठरवले आणि ते करूनही दाखवले. दोन्ही डोळ्यांनी दिसत नसूनही सोन्याने शेतीच्या कामांत प्रचंड कौशल्य कमावले! दादांच्या एका शब्दावर त्याला नेमकं कुठं वळायचं, चालायचं, थांबायचं हे सर्व समजू लागलं…   आणि दादांचा संसार चौखूर चालला! 

 सोन्यावर उपचार करणा-या सर्व डॉक्टर साहेबांनी बहुतांशी मोफत उपचार करून मानवतेचा धर्म पाळला. हा सोन्या आता म्हातारा झाला आहे. सोन्या आज न उद्या हे जग सोडून जाईल…   प्राण्यांची आयुष्ये तशी कमी असतात….    पण दादा सोन्याचे स्मारक बांधणार आहेत…   त्याच्या स्मृती जपणार आहेत! महाराष्ट्र टाईम्सच्या इरफान शेख यांनी या सोन्याची आणि त्याच्या शेतकरी मालकाची एक सुंदर विडीओ बातमी केली आहे. ही बातमी पाहून मी सोन्या झालो…   आणि हे शब्द सुचले…… 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments