डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ आपल्या पायावर उभी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
कल्याणी घाईघाईने क्लासला निघाली होती. तिचे हे खूप महत्त्वाचं वर्ष. गरीब परिस्थिति असताना देखील जिद्दीने छान मार्क्स मिळवून डॉक्टर व्हायची जिद्द होती तिची. कल्याणी दिसायला तर सुरेख होतीच पण गरीब परिस्थितीत असतानाही आईला सगळी मदत करून मगच ती शाळेत जात असे.
आज तिची मैत्रीण कल्पना आणि ती दोघीही निघाल्या होत्या शाळेत. अकरावी बारावी नुकतेच त्यांच्या शाळेत सुरू झाले होते. आणि यांना छान मार्क्स असल्याने शाळेने फ्रीशिप दिली म्हणून त्यांनी शाळेतच प्रवेश घेतला.
कल्पना आणि कल्याणीची घरची परिस्थिती तर वाईटच होती. कल्पनाच्या वडिलांची वडापावची गाडी होती. कसेतरी भागत असायचं त्यांचं. कल्याणीचे वडील एका ऑफिसमध्ये शिपाई होते तर आई घरकाम करायला जायची. मुलगी शिकायचं म्हणते, हुशार आहे म्हणून तिची शाळा चालू राहिली.
कल्याणीला शिकण्याची फार हौस होती. आपण शिकावं आई जिथे काम करते, त्या बाईंसारखी नोकरी करावी असं वाटायचं तिला.
त्या दिवशी कल्पना आणि कल्याणी घाईघाईने चालल्या होत्या.. , अचानक समोरून टेम्पो आला. त्याचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालकाचा कंट्रोलच गेला. या दोघी मुली रस्ता क्रॉस करत असताना अचानकच दोघीना टेम्पोची जोरात धडक बसली. कल्पना फेकली गेली आणि कल्याणी टेम्पोखाली आली. आरडा ओरडा झाला. मुली चिरडल्या, मुली चिरडल्या. कल्याणी बेशुद्ध होती. तिचे पाय टेम्पोखाली अडकलेले होते. लोकांनी तिला बाहेर काढले. रक्तबंबाळ अवस्थेत लोकांनी तिला ससून हॉस्पिटलला नेले. कल्पना फेकली गेली म्हणून ती बचावली. हाताचे हाड फ्रॅक्चर झाले पण ती घरचा पत्ता सांगू शकली. तिने लोकांना कल्याणीचं घर दाखवलं.
घडलेली हकीगत समजताच तिच्या आईवडिलांनी ससूनला धाव घेतली. कल्याणीच्या एका पायावरून टेम्पोचे चाक गेले होते. , डॉक्टर म्हणाले, दोन दिवस बघूया. पण सुधारणा नसली तर मात्र मांडी पासून पाय कापावा लागेल. नाहीतर गॅंगरीन होईल. बिचारे आईवडील घाबरून गेले. दोन दिवसानंतर कल्याणाचा पाय काळानिळा पडला, तिला अत्यंत वेदना होऊ लागल्या. त्या पायाचा रक्तप्रवाह थांबला होता आणि गॅंगरीनची सुरवात झाली होती. नाईलाजाने आईवडिलांच्या सह्या घेऊन कल्याणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
कल्याणी चा डावा पाय गुढघ्याच्यावर मांडीपर्यंत कापावा लागला. आईवडिलांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. एक तर गरीबी, आणि आता ही अशी मुलगी.. तिचे भविष्य त्यांना भेडसावू लागले.
कल्याणी शुद्धीवर आली. बँडेज असल्याने तिला हे काहीच समजलं नाही. गुंगीत होती कल्याणी तीन दिवस.
आई तिच्याजवळ बसून होती.
” बाळा, आता बरं वाटतंय ना ? “ मायेने डोक्यावरून हात फिरवून आई म्हणाली.
चौथ्या दिवशी तिला अंथरुणातून उठवल्यावर कल्याणीला समजलं, मांडीखाली काहीच नाहीये. तिने किंकाळी फोडली. ”आई ग, आई, हे काय? माझा पाय? मला समजत कसं नाहीये काहीच?” आईने डॉक्टरांना बोलावून आणलं. अतिशय कनवाळू सहृदय तरुण डॉक्टर होते ते.
शांतपणे ते तिच्याजवळ बसले आणि म्हणाले, ”बाळा, तू वाचलीस ही देवाची कृपा. तुझा पाय आम्हाला कापावा लागला. पार सडला होता तो. तुला मग गॅंगरीन झाला असता. अजिबात रडू नकोस. सगळं आयुष्य उभं आहे तुझ्यासमोर. काय रडायचं ते आत्ता रडून घे. पण नंतर हे अश्रू पुसूनच तुला उभं रहायचं आहे खंबीरपणे. ” तिला थोपटून धीर देऊन डॉक्टर निघून गेले.
कल्याणी हमसून हमसून रडायला लागली. ” मला नाही जगायचं. मी जीव देणार आता. ”.. म्हणत ती उठून उभी रहायला लागली आणि धाडकन पडलीच कॉटवर. आपला आधाराचा पाय आपण गमावला आहे हे चरचरीत सत्य लक्षात आलं तिच्या. पंधरा दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळाला. पायाची जखम अजून ओली होती.
कल्याणीला क्रचेस घेऊन चालायची सवय करावी लागली. सगळा भार एकाच धड पायावर येऊन तो अतोनात दुखायचा. काखेत क्रचेस घेऊन खांद्याला रग लागायची.
कोवळं वय कल्याणीचं. आई वडिलांना अत्यंत दुःख होई की हे काय नशिबी आलं आपल्याच मुलीच्या.
कल्याणीची आई जिथे काम करायची त्या बाई पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल हॉस्पिटल मध्ये नर्स होत्या. कल्याणीला त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या. हॉस्पिटलचा, अशा युद्धात झालेल्या अपघातात, अवयव गमावलेल्या सैनिकांसाठी वेगळा सुसज्ज विभाग आहे. सगळा स्टाफ या सुंदर तरुण मुलीला बघून हळहळला.
तिथल्या सिनिअर डॉक्टर म्हणाल्या, “काळजी नको करू. आपण तुला नवीन पाय देऊ. तुला इथे रहावे लागेल निदान सहा महिने. किंवा एक वर्षदेखील. ”
कल्याणी म्हणाली ” मी राहीन मॅडम. मला पुढे शिकायचे आहे आणि या एकाच पायावर उभे रहायचे आहे. ”
ते दिवस खरोखरच परीक्षेचे होते तिच्या. त्या वेड्या वाकड्या तुटलेल्या पायावर पुन्हा तीनवेळा शस्त्रक्रिया केल्या. मग तिला आधी हलक्या ठोकळ्यावर चालायला शिकवलं. मग चार महिन्याने मापे घेऊन तिला अतिशय हलका पायलॉनचा मांडी पासून खाली कृत्रिम पाय दिला गेला. लहान मूल चाचपडत चालतं तशी कल्याणी पहिले काही दिवस अंदाज येई पर्यंत पडत, अडखळत चालली. पण नंतर सवय झाल्यावर तिला आणखी चांगला हलका मांडीपासून पावलापर्यंत नवीन पाय दिला.
… ज्या दिवशी कल्याणी त्याची सवय करून घेऊन सफाईने चालू लागली तो दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा होता तिच्यासाठी. तिला अत्यंत कष्ट झाले हे करण्यात. तिचा काहीही दोष नसताना. ,
रोज मरणयातना सोसून फिजिओथेरपी घेणे, त्या उरलेल्या थोट्या जखमेतून रक्त येई. पुन्हा पुन्हा नवीन जखमा होत. कल्याणीने एका जिद्दीने ते सहन केले. या जवळजवळ सात आठ महिन्यात ती घरीही गेली नाही. उरलेल्या मांडीच्या भागावर बेल्टने पायलॉन बांधून कृत्रिम पावलात बूट घालायला ती शिकली. त्या पायाची रोजची साफसफाई तिला तिथल्या डॉक्टर्सनी आपुलकीने शिकवली. आता मात्र तिला हा कृत्रिम पाय आहे हे कोणाच्या लक्षात सुद्धा न येण्याइतकी कल्याणी सफाईने पाय वापरायला शिकली.
हॉस्पिटलच्या सर्जन आणि कृत्रिम विभागाच्या डॉक्टर्सना म्हणाली, ” तुमचे उपकार कसे फेडू मी?
माझ्या गरीब आईवडिलांना कोणताही खर्च झेपला नसता हो. तुम्ही माझी स्पेशल केस म्हणून सगळी फी माफ केलीत. सर, मी इथेच रहाते. मला इथेच नोकरी द्या. मला त्या कृत्रिम जगात जायचेच नाही. , इथे मला खरे जगायला शिकवलं तुम्ही सगळ्यांनी. इथे उपचार घेणाऱ्या माझ्या सैनिक भाऊ मामा काका यांनी. ”
डॉक्टर म्हणाले, ” तू आता छान बरी झालीस. आता घरी जा. नवीन पायाची काळजी घ्यायला तुला आम्ही शिकवलं आहे. दर सहा महिन्यांनी तुला इथे तपासणीसाठी यावं लागेल. आता नवीन आयुष्य सुरू कर बाळा. मनासारखं शिक्षण घे. ”
कल्याणी घरी परतली. जग एक वर्षात खूप पुढे गेलं होतं. तिच्यासाठी थांबायला कोणाला वेळ होता?
कल्पना येऊन तिला भेटून गेली. आपली मैत्रीण पुन्हा आपल्या पायावर उभी राहिलेली बघून कल्पनाला अतिशय आनंद झाला. कल्याणीने आपली स्वप्नं बाजूला ठेवली. तिने बारावीची परीक्षा दिली आणि डीएड व्हायचं ठरवलं. तिला ते झेपणारं आणि लगेच नोकरी देणारं क्षेत्र होतं…
कल्याणीने चांगले मार्क्स मिळवले आणि डीएड ला प्रवेश मिळवला. तिने कुठेही, अनुकंपा असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग न करता प्रवेश मिळवला.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈