श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ राजवैद्य — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

आनंदराव गाडीतून उतरून हॉटेलच्या पायऱ्या चढू लागले, तर शिर्के साहेब त्यांची गॅलरीत बसून वाट बघत होते. त्यांना पायऱ्या चढताना पाहून शिर्के साहेब म्हणाले ” गुड इव्हिनिंग आनंदराव, लॉन वरच बसू, हवा छान आहे.

“गुड इव्हिनिंग शिर्के साहेब, चालेल.” असं म्हणून दोघे हॉटेलच्या lawn मध्ये ठेवलेल्या खुर्चीत बसले.

“झाली का काम?” आनंदरावांनी शिर्के साहेबांना विचारले.

“अजून दोन दिवस लागतील, कारखान्याचे मुख्य डायरेक्टर दिल्लीला गेले आहेत, शनिवार पर्यंत येतील’.”

“हो, ते खासदार आहेत ना या भागातले, सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे ते शनिवारीच येतील.”

“बरं मग शिर्के साहेब, तुम्ही आमच्या गावात आलात, बोला काय घेणार? या हॉटेलला इम्पोर्टेड मिळते.”

“नाही आनंदराव, मी ड्रिंक घेत नाही. आश्चर्य आहे, तुमच्या व्यवसायानिमित्त तुम्हाला देशात आणि प्रदेशात फिरावे लागते. तरी पण तुम्ही ड्रिंक घेत नाही याचे आश्चर्य वाटते “.

काय आहे आनंदराव, पूर्वी मी ड्रिंक घेत होतो. पण गेली काही वर्षे मला लिव्हर चा त्रास सुरू आहे,.

“मग तुम्ही उपचार केलेत असतील!”

“उपचार? भारतातील सर्व लिव्हर स्पेशालिस्ट कडे आणि इंग्लंड मध्ये डॉक्टर स्टीफन कडे जाऊन उपचार घेतो आहे.”

“मग डॉक्टरांचे काय म्हणणे?”

“भारतातील बहुतेक डॉक्टर्स माझे लिव्हर जन्मतः खराब आहे. त्यावर निश्चित असे बरे करण्याचे उपाय नाहीत. लिव्हर ट्रान्स प्लांट करणे अशक्य आहे. कारण ऑपरेशन करताना अमोनिया वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच डॉक्टरांचे म्हणणे आहे लिव्हरची काळजी घेत चला. सध्या डॉक्टर स्टीफन यांच्याकडून आलेल्या इम्पोर्टेड गोळ्यांवर माझे चालू आहे. त्यामुळे कंट्रोल मध्ये आहे. माझ्या डॉक्टर्सनी सांगितले आहे, दारूचा एक थेंब जरी पोटात गेला तरी तरी खेळ खल्लास होईल.. म्हणून म्हणतो आनंदराव तुम्हाला काय हवं ते मागवा”. “नाही शिर्के साहेब, तुम्ही माझे पाहुणे आहात. तुम्ही ड्रिंक घेत नसताना मी मागवू शकत नाही. आपण लिंबू पाणी घेऊ.”. असं म्हणून आनंदरावांनी दोघांसाठी लिंबू पाणी मागवले.

आनंदराव शिर्के साहेबांना म्हणाले “तुम्ही एवढे उपचार केलेत, मग एकदा राजवैद्यांचा मत घेऊ. आमच्या राज्यवैद्यांकडे काही आश्चर्यकारक आयुर्वेदिक औषधे आहेत. तसं ते फारसे कुणाला माहित नाही. पण आम्ही दोघे एका कल्चरर क्लब मध्ये एकत्र असतो. त्यामुळे आमची मैत्री आहे.”

“राजवैद्य? कोण हे राजवैद्य?”

“शिर्के साहेब, आमचा हा जिल्हा म्हणजे पूर्वी संस्थान होते. राज घराण्याची गादी होती इथे. म्हणजे अजूनही आहे पण त्यावेळचा मान वेगळा होता. 60-70 वर्षांपूर्वी आमच्या महाराजांच्या पदरी हे राजवैद्य होते. महाराजांच्या खास मर्जीतले. त्याकाळी महाराजांना शरीरभर गळू आले होते. असह्य वेदना सुरू होत्या. अनेकांनी उपचार केले. अगदी मिशनरी डॉक्टर नी उपचार केले. मग कुणीतरी बातमी दिली मलकापूर भागात एक वैद्य आहे, त्यांचे कडे अनेक रोगांवरची औषधे आहेत. राज घराण्याने त्यांना बोलावले. त्यांनी पंधरा दिवसासाठी औषध लावायला व पोटात घ्यायला दिले. आश्चर्य म्हणजे आठ दिवसानंतर एक एक गळू फुटून साफ झाले. महिन्याभरात महाराज खडखडीत बरे झाले. त्या वैद्यांना महाराजांनी या शहरात आणले आणि राजवैद्य बनवले. त्या राज्यवैद्याने महाराजांची आणि महाराजांच्या कुटुंबाची अखेरपर्यंत सेवा केली. सगळीकडे नाव कमावले. महाराजांच्या शेवटच्या आजारपणात या वैज्ञानिक त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे या संस्थांच्या सर्व लोकांना त्यांचे बद्दल मोठा आदर होता.”

“आणि आता?” शिर्के साहेबांनी विचारले.

“आता राज्य वैद्य यांचे नातू आहेत. बापूसाहेब त्यांचं नाव. त्यांना पण आयुर्वेदाची चांगली माहिती आहे. पण आता काळ बदलला. इंग्लिश औषधे भारतात आली आहेत. डॉक्टर्स ऍलोपथी शिकून आले आहेत. ते ऍलोपॅथी औषधे वापरतात. त्यामुळे राजवैद्य मागे पडले.”

“पण आयुर्वेदिक डॉक्टर्स पण आहेत ना भारतभर?”

“आयुर्वेदिक डॉक्टर्स पण इंग्लिश औषधे वापरतात. ते शिकतात आयुर्वेदिक पण औषधे वापरतात ऍलोपॅथिक. अजून काही वैद्यपूर्ण आयुर्वेदिक औषधे वापरतात. पण आयुर्वेद मध्ये सुद्धा आता मोठ्या मोठ्या कंपन्या उतरले आहेत. त्यांच्याकडे मोठे कारखाने आहेत. आमचे बापूसाहेब वैद्यराज मात्र मागे मागे राहिले. ‘ कारण त्यांना पैशाचे पाठबळ नाही मी आमच्या वैद्य राज्यांना बोलावतो ते नाडी परीक्षा करतात. आणि मग औषध देतात”.

“हो बोलवा तुमच्या राज्य वैद्य ना, त्यांचे कडून काही फायदा होतो का पाहू.”

“दुसरे दिवशी आनंद रावांनी बापूसाहेब राजवैद्ययाना फोन केला. बापूसाहेब आले. त्यांची शिर्के साहेबांची भेट झाली. त्यांनी शिर्के साहेबांचे सोनोग्राफी रिपोर्ट पाहिले. नाडी परीक्षा केली. आणि यावर एक जालीम औषध मिळते का बघतो असे म्हणून ते गेले.

बापूसाहेबांच्या लक्षात आले, शिर्के साहेबांवर उपचार करण्यासाठी केरबाचे औषध मिळवणे आवश्यक आहे. नुसत्या आपल्या औषधाने शिर्के साहेबांची लिव्हर व्यवस्थित होणार नाही.

बापूसाहेब स्कूटर वरून निघाले ते 15 किलोमीटर वरील भडगाव या गावी पोहोचले. एका जंगलाजवळ त्यांनी आपली स्कूटर ठेवली. आणि लहानशा पायवाटेने जंगल चढू लागले. पंधरा-वीस मिनिटे चढण चढल्यावर त्यांना शिळ्यामेंढ्या चढताना दिसायला लागल्या. तसं त्यांनी “केरबा, केरबा” अशा हाका मारायला सुरुवात केली. दहा-बारा वेळा हाका मारल्यानंतर “जी जी” उत्तर मिळाले. आणि दोन मिनिटात त्यांच्यासमोर केरबा धनगर उभा राहिला.

“आव बापूसाब, तुमी सवता, सुरवं कुनिकडे उगवला मनायचं”.

“आर मित्रा, तुझी लय आठवण आली न्हवं” बापूसाहेब उदगारले.

“मित्र म्हणताय हे तुमच मोठेपण बापूसाहेब, तुमी कुठं आमी कुठं, तुमी आमचे राजवीद्य, तुमास्नी आमच्या महाराजणं पदवी दिली न्हवं”.

“आर पदवी दिली आमच्या आजोबांना, मला न्हवं”.

“बरं बापूसाहेब, का आला व्हता गरिबाकडं!”

 केरबा, आमचा एक दोस्त आहे आनंदराव, त्याचे साडू मुंबईचे शिर्के, ते इकडं आपल्या गावात आलेत कामासाठी, त्या शिर्केंच यकृत खराब झालंय, यकृत समजतय न्हवं (बापूसाहेबांनी पोटाजवळ हात ठेऊन लिव्हर दाखवले).

“समजलं कीं, कावीळ व्हते न्हाई का?’, पण तुमी काविली वर दवा देताय न्हवं”.

आर, नुसती कावीळ असती किंवा बारीक सारीक काय बी असत, तर मी इलाज केला असता, पर या पवण्याचं पूर यकृत खराब झालाय, त्यासाठी माझ्या कडे इलाज न्हाई बाबा, तेला तुझी मुळी हवी, माग दादा डॉक्टर साठी ती मुळी तू दिलेली ‘.

“दादा डागदार तसा भला माणूस, किती लोकांचे परान वाचवले त्याने, माझ्या आजा न दाखवलेली मुळी तुमच्या कडच्या औषतून दिली तुमी, पन माझ्या आज्यान मला बोलून ठेवलंय “या मुळीचा बाजार करू नको केररबा, म्हणून मी तस कुणला ह्या मुळी च सांगत न्हाई आणि पैस भी घेत न्हाई”.

“होय, मला माहित आहे ते, पण आनंदरावांचे हे पाहुणे भले माणूस आहेत. मी त्यांना शब्द दिला आहे, माझ्यासाठी एकदा तू ती मुळी मला दे”.

“होय बापूसाहेब, राजवीद्य हाय तुमी आमचे, आमच्या म्हरंजाचे राजवीद्य, तुमास्नी मी न्हाई म्हणु शकत न्हाई”.

“उद्या राती पर्यत मुळी पोच करतो, तुमच्या कविलीच्या दावंय मध्ये घालून द्या.”

बर, म्हणून बापूसाहेब घरी आले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केरबाने ती मुळी आणून दिली. बापूसाहेबांनी ती मुळी आपल्या नेहमीच्या लिव्हर वरील औषधात मिसळली. त्यांच्या फॅक्टरीतल्या मुलीला सांगून त्याच्या दोन महिन्यासाठी च्या गोळ्या तयार केल्या आणि दुसऱ्या दिवशी शिर्के साहेबांच्या हवाली केल्या.

शिर्के साहेब मुंबईला जाताना बरोबर त्या गोळ्या घेऊन गेले आणि नियमित घेऊ लागले. त्यांची इतर पत्ते चालू होतीच.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments