श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? जीवनरंग ?

“शिकार…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आई मी आता खूप खूप थकलोय गं! होत नाही हल्ली पूर्वीसारखी शिकार करणं!

तारुण्यातली रग, उमेद गळून पडली या म्हातारपणात… का कुणास ठाऊक सतत तुझी मला अलीकडे फार आठवण येत होती…

आणि आजही ती आठवण मला येते, तेव्हा डोळे भरून येतात आई. त्यावेळी किती लळा

लावलास तू आई मला! मी लहान बछडा असल्यापासून सांभाळलंस.

मला माझे गणगोत कुणी असतील असं आठवतंही नव्हतं…

नाही म्हणायला तूच कधीतरी मला ते सांगत असायचीस. काळाचा घाला यावा तसा त्या नराधम शिकाऱ्यांनी आमच्या कुटुंबावर बंदुकीच्या फैरीवर फैरी झाडल्या..

आमच्या कुटुंबातले सगळे बळी पडले. तेव्हा मी एकटाच मृत आईच्या कुशीत पहुडलेलो..

त्या शिकाऱ्यांनी मला पाहिलं आणि उचलून घेत गुहेतून बाहेर आले..

तसा मी टणकन खाली उडी घेतली. माझ्या आयुष्यातील ती पहिली उडी..

मी पळत पळत निघालो. शिकारी माझ्या मागे मागे येत होते…

आणि तितक्यात आई तू कुठून तरी अवतरलीस, मला तू अलगदपणे तोंडात धरून जंगलात नाहीशी झालीस..

शिकार्‍यांना बंदुकीचा चाप ओढताच आला नाही..

आणि तु माझा जीव वाचवलास.. तिथून पुढे मी तुमच्या बरोबरच राहू लागलो..

मला तू घेऊन आलेली तुझ्या दादल्याला आवडलं नाही हे त्याचं वेळी मला जाणवलं.

त्यानं तुला म्हटलं देखील,

‘हि पीडा इथं कशाला आणलीस आणि कळून सवरून आपलाच मृत्यू लवकरच का ओढवून घेतेस? कधी असं झालयं का आजवर वाघाच्या जातीनं आपली शिकार केलेली नाही. तो एक ना एक दिवस आपली शिकार नक्की करणारं’

 तेव्हा तू तुझ्या दादल्याला म्हणाली होतीस,

 ‘लहान अनाथ बछडं पाहून माझं आईचं हृदय द्रवलं. मी त्याला सांभाळेन आणि कळता सवरता झाला कि त्याला त्याच्या बिरादारीत सोडेन. त्यानं शिकार करणं हा त्यांचा जीवन धर्म आहे, त्याचा तो पाळेल आणि मी एक आई आहे, तो माझा धर्म मी पाळेन’..

 पण तुझ्या दादल्याला ते तितकसं रूचलं नाही तुझ्यापुढे त्याचं काही चाललं नाही..

 पहिले काही दिवस तुझ्या अपरोक्ष मला त्रास देऊन हाकलू पाहात होता पण तू मात्र मला सतत जपत असायची.

तुमच्या कळपातील इतरजण दादल्याच्या सांगण्यावरून मला कितीतरी वेळा त्रास देऊ लागले.. पण मी तिकडं तुझ्याकडे पाहून दुर्लक्ष केले..

हळूहळू मी वयात येऊ लागलो आता मला माझी बिरादारी हवी हवीशी वाटू लागली तसचं तुझ्या कळपातले देखील माझ्यापासून दोन हात लांब राहू लागले..

आणि एक दिवस तूच मला आमच्या बिरादारीच्या वेशीवर सोडून गेलीस.

त्यावेळी तुझे ते पाणावलेले डोळे मी पाहिले..

अगदी संथ गतीने तू निघालीस सारखी सारखी मान वेळावून तू माझ्या कडे पाहात होतीस..

मला गलबलून आलं होतं. डोळेही पाणावले होते गं माझे तेव्हा.. कदाचित नैसर्गिक ती गोष्ट असावी माय लेकरात ताटातूट होते असते तेव्हा अशीच घडणारी.

अशी जगावेगळी, न भुतो न भविष्यती अशी आपली माय लेकराची जोडी जमली होती..

तू मला तिथे सोडून गेलीस खरी, पण माझ्या बिरादारीतल्या लोकांनी मला जवळ केलं नाही..

 ते मला डरकाळया फोडत म्हणाले,

‘आपल्या बिरादारीत शेळपटांना थारा नाही.

तुला आम्ही बहिष्कृत केले आहे.. तुझा तुला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे.

स्वतःची शिकार, गुहा तुझं असेल. आमच्यापैकी कुणीच तुझ्या मदतीला सोबतीला असणार नाही. तू त्या हरणांच्या कळपात लहानाचा मोठा होत गेल्याने डरपोक झाला आहेस. ’

अशी बरीच निर्भत्सना त्यांनी माझी केली आणि तिथून त्यांनी मला बाहेर हाकलं..

आई! आता परत तुझ्याकडे येणं सुज्ञपणाचं नव्हते.

मग मी एकट्याने राहण्याचा निर्णय घेतला.

गुहेचा प्रश्न सोडवला आणि भुक भागविण्यासाठी सगळं जंगल पालथं घालावे म्हणून भटकू लागलो. पण पदोपदी माझ्या बिरादारीतल्या लोकांनी धमकावलं.

 ‘हे जंगल आमच्यासाठी आहे. इथं तुला शिकार करता येणार नाही. तुला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल’..

त्यामुळे मला शिकार करणं मुश्किल झालं. इकडं माझी भुक खवळू लागली..

एक दिवस गेला, दोन दिवस गेले. दुसऱ्या जंगलात जाण्याचा मी विचार केला. पण ते कुठे असेल किती लांब असेल. असेल का नसेल याचा काही अंदाज येईना..

बरं तिथवर जाण्यासाठी अंगात ताकद तरी हवी होती..

आधीच दोन चार दिवसाच्या उपासमारीने जीव घायकुतीला आलेला आणि केलेली सततच्या पायपीटेने शरीर गलितगात्र झालेले..

आता एक तरी अन्नाचा कण पोटात गेल्याशिवाय काही होणे नव्हते..

मी हताश, पेंगळून टेकडीवर बसलो होतो आणि माझी नजर सहज कुरणावर चरणाऱ्या त्या तुमच्या कळपावर गेली..

भूक शमवणे हाच एकच विचार डोक्यात घोळत असताना, मागचा पुढचा कोणताच विचार न करता जीवाच्या आकांताने मी धावत सुटलो..

आई तुला सांगतो मी सुसाट धावत येतोय हे त्यांना दिसले, मग तेही पाच दहाजण, आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. त्यात एक लंगडत धावताना मला दिसले.. आणि माझी शिकार पक्की झाली..

मी होता नव्हता त्राण आणला आणि त्या भक्ष्यावर झडप घातली..

आपला पाय ओढत जिवाच्या आकांताने पळू पाहणारा तो… अखेर माझी शिकार बनला..

मी प्रथम लचक्यावर लचके तोडून काढले बकाबका दोनचार घास गिळले असतील नसतील तोच मला तो चेहरा दिसला.. तुझ्या दादल्याचा… माझी भुकच मेली.. आई!…

आई मी तुझा खूप खूप अपराधी आहे. ज्याला जिवापाड जपून मातेच्या वात्सल्याने वाढंवलंस, आपल्या शत्रूच्या बिरादारीतला असून मी, बछ्डा असल्यापासून आईचं प्रेम दिलंस… आणि मी… मी मात्र आमच्या वाघाच्या मुळ स्वभावधर्माला भुकेला शेवटी बळी पडलो गं… आई मी कृतघ्न ठरलो. मला क्षमा कर असं मी कोणत्या तोंडाने म्हणू ?आता आई तुला जी काही मला शिक्षा करशील, ती भोगायची माझी तयारी आहे.. “

 एकीकडे आपलं कुकूं आज पुसलं गेल्याच दु:ख आईला दाटून आलं होत आणि त्याची शिकार करणारा आपलाच मानसपुत्रच निघावा या नियतीच्या कात्रीत एक आईच प्रेम सापडलं गेल होतं. पण शेवटी मातृहृदयच जिंकलं गेलं होतं.

“आई तू मला जवळ ओढलंस तुझं तोंड माझ्या डोक्यावर ठेवलंस.. नि आपल्या डोळ्यांतील आसवांना मुक्त वाहू दिलेस. माझ्या पाठीवरून तुझा प्रेमळ हात फिरला गेला, ती तुझी मुक संमती समजून तिथून मग मी मूकपणे निघून गेलो… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments