श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
भारतीला मुलाला संभाळूनच अभ्यास करावा लागणार म्हटल्यावर आम्ही शिक्षकांनी दुसरे उपाय काढले. आठवड्यातले तीन दिवस इंग्रजी, गणित, सायन्सचे तास लागून होते. तेव्हढ्या तासाना भारतीने यायचं, मराठी शाळा दुपारी सुटायची. तिथल्या दोन तीन मुली बाळाला खेळवायला हौशीने तयार झाल्या. जादा तास शाळेच्या वेळाच्या बाहेर होते. तेव्हा भारतीची लहान भावंडं बाळाला संभाळणार. भारतीने दिवसभराचा अभ्यास मुलींकडून घ्यायचा, बाळ झोपलेल्या वेळेत तो करायचा. तिला ‘अपेक्षित’ ची गाईडं दिली. तिच्या कडून फक्त काठावर पासिंगची अपेक्षा ठेवली. हे सर्व प्रयत्न परिक्षार्थी होते खरे, पण त्या पास होण्यामुळेच तिचा पुढचा मार्ग खुला होणार होता.आम्ही सर्वानी चंग बांधला की भारतीला दहावीतून बाहेर काढायची. भारतीच्या वडिलांना इतका सगळा पत्ता लागू द्यायचा नव्हता. कारण त्यांना मुलींच्या शिक्षणासाठी खटाटोप करणं मान्यच नव्हतं. ते दिवसभर घरी नसायचेच. आई आमच्या बाजूला होती. असा अभ्यास करणं भारतीला खूप अवघड होतं, पण ती प्रयत्नाला लागली होती. तिच्या घटक चाचण्या, सहामाही झाली. वर्गातल्या बऱ्याच मुलांसारखे तिला इंग्रजी, गणितलाच फक्त मार्क कमी पडले. शाळेच्या चांगल्या निकालाला भारतीच्या पासिंगचा उपयोग ग्रहीत धरून मुख्याध्यापकांनीही आम्हाला सहकार्य दिलं. फॉर्मचे पैसे सगळ्या शिक्षकांनी भरले म्हटल्यावर वडिलांनीही फार खळखळ केली नाही.
पैसा एव्हढाच त्यांचा प्रॉब्लेम होता. तरीही त्यांना अंधारात ठेवणं बरोबर नाही असं सगळ्यांचं मत पडलं. परिक्षेच्या वेळी अडमडायला नकोत.
मी भारतीचे वडील घरी असतील अशा वेळीच तिच्याकडे गेले. म्हटलं, नीट समजावून सांगू म्हणजे ते ऐकतील. ते काही राक्षस नाहीत.
सगळं घर सामसूम होतं. वडील घरात नव्हतेच. आई होती. भारतीचे नाक डोळे रडून लाल झाले होते. चेहरा सुजला होता. मी तिच्या पाठीवर हात ठेवल्यावर तिला हुंदकाच फुटला.
‘काय झालं’मी विचारलं. तिला बोलताच येईना. आईच म्हणाली, “बाईनू, लय गुत्ता झालाय बगा. अनिताची सासू म्हनतिया, ‘भारतीला सून करून घ्येतो, म्हंजी पोराचंबी ती करील नि तुम्हास्नीबी तिच्या लगिनाचं बघाय नको. भारतीचा बा तयार झालाय. म्हनतोय, लग्नाचा खरचं वाचला. उरावरचं वझं उतरेल.एकदा त्यांच्या मनाने घ्येतलं की न्हाई ऐकायचा. जावयाकडून पैसं बी घ्येतलं असतील. तसंच काही तरी दिसतय्. बाईनू, तुमी ह्यात पडू नगासा. तुमास्नी फुकटचा तरास व्हील.”
भारतीच शिक्षण ही आता हाताबाहेरची गोष्ट झाली होती. अज्ञानाच्या, दारिद्रयाच्या काळ्याकुट्ट अंधारात आपली मिणमिणती दिवली विझून जाणार हे आम्ही ओळखलं.
मोडक्या चुलीच्या जागी नवी चूल बसवतात तशी भारती आपल्या बहिणीच्या संसारात जाऊन बसणार होती. सोपा हिशोब होता. भारती म्हणजे एक प्यादं होतं. त्याला कुठेही, कसंही सरकवलं तरी चालणार होतं.
मी तिच्या पाठीवर हात ठेवला. म्हटलं ‘रडू नकोस. बाळाला नीट वाढव. ते मोठं झालं की तुझ्या शिक्षणाचं बघू.’
तेव्हढ्या आशेने सुध्दा भारतीचे डोळे लकाकले. जवळच पटकुरावर पडलेलं, सावळं, गुटगुटीत बाळ मुठी चोखता चोखता हसत होतं. ते आनंदी भविष्याचं सूचक होतं का?
बऱ्याच वर्षानी भारती ए. डी. ई. आय होऊन शाळा तपासायला आली. मधल्या काळातली सगळी हकिगत तिने सांगितली. नवऱ्याला पुण्याला नोकरी मिळाली होती. बाळाला संभाळून तिने शिक्षण चालू केलं होतं. नोकरी मिळवली होती. सगळ्या वाटचालीत नवऱ्याने तिला साथ दिली होती. प्यादं पुढे पुढे सरकलं होतं. त्याने बरीच मजल मारली होती.
शाळेतले संस्कार फुकट जात नाहीत, ते टिकतात, बहरतात सुध्दा.
समाप्त.
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर कहानी