☆ जीवनरंग ☆ बोध कथा – लबाडीचा व्यवहार ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
?लघु बोध कथा?
कथा १९. लबाडीचा व्यवहार
एकदा एका राजाला तो त्याच्या महालातून बाहेर पडत असताना दारात कोणी एक मनुष्य हातात कोंबडा घेऊन उभा असलेला दिसला. तेव्हा राजाने त्याला “तू कोण आहेस? आणि इथे का उभा आहेस?” असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, “मी आपल्या नावावर कोंबड्यांच्या व्यापारात हा कोंबडा जिंकलो. तेव्हा त्याला आपल्या चरणांवर अर्पण करण्यास आलो आहे.” “ठीक आहे, कोंबडा आत देऊन ये” असा राजाने त्याला आदेश दिला.
दुसर्या वेळी मेंढा घेऊन तो मनुष्य राजाच्या दारात उभा राहिला. पूर्वीच्याच त्या माणसाला पाहून राजाने “हे काय आणले?” असे विचारले. तेव्हा, “हा बोकड सुद्धा मी आपल्या नावावर जिंकला” असे त्याने कथन केले. राजाने त्याला पूर्वीप्रमाणेच आत येण्यास अनुमती दिली. राजाची अनुमती मिळालेल्या त्या मनुष्याने बोकडाला राजगृही ठेवले व तो निघून गेला.
पुन्हा तिसर्या वेळी काही व्यापाऱ्यांसोबत आलेल्या त्या मनुष्याला पाहून “काय आज काहीही बरोबर न आणता आलास?” असे राजाने विचारले. तेव्हा तो म्हणाला, “महाराज, मी काहीही न घेता आलेलो नाही. आपल्या नावाने लावलेली दोन सहस्र नाणी मी व्यापारात हरलो. ती नाणी दे असे म्हणत या व्यापाऱ्यांनी मला निर्दयपणे पकडले आहे. म्हणून महाराजांजवळ मी त्यांना आणले आहे.” तेव्हा राजाने त्याच्या कोषागारातून तों हजार नाणी त्याला आणून दिली व ‘यापुढे माझ्या नावावर व्यापार करू नकोस’ असे त्याला बजावून पाठवून दिले.
तात्पर्य – लबाडीचा व्यवहार जास्त काळ टिकू शकत नाही. तो उघडकीस येतोच..
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी