श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-3 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
मी थोडा वेळ बोललो नाही सुषमा आशाळभूत पणे पाहतेय हे न पाहताही मला समजत होते.
मी नामदेव कडे वळून विषय काढला तुमच्या पोरीचा डोळा पूर्वी सारखा झाला तर तुम्हाला आवडेल काय,नामदेव व तिच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव एकदम बदलले. पुढच्याच क्षणी खर्च किती येईल हे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. कोणताही खर्च न करता हे होईल मी बोलताच दोघेही जवळ आले.
आता सुषमाही बाहेर आली मी त्यांना डॉक्टरांशी झालेल्या संवादाची माहिती दिली. व होणाऱ्या शिबिरात सुषमाला घेऊन येण्याचे सांगून निघालो,दोघांचेही चेहरे सकारात्मक दिसले, मला विस्वास होता ते सुषमाला आणतील, खात्री होती.
ठरलेल्या दिवशी डॉक्टर अधलखिया आले, पेशंटची तपासणी सुरू झाली,पण माझी नजर सुषमाच्या येण्याकडे लागली होती,थोड्या वेळाने सुषमा आई वडीलां सोबत आल्याचे मला दिसले. सुषमा ला डॉक्टरांनी तपासणी साठी आत घेतले जवळपास पांढरा मिनिटे डॉक्टरांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी केली. सुषमा बाहेर आली, डॉक्टरांनी मला बोलावून घेतले, सर केस थोडी किचकट आहे.नजर येईल की नाही ते सांगता येत नाही पण डोळ्याचा पांढरे पणा आपण घालवू शकतो. दिसायला दोन्ही डोळे सारखे दिसू शकतात,मला आशेचा किरण सापडला.डॉक्टरांनी सुशमा च्या आई वडिलांना बोलावून घेतले,दोघेही खुश झाले,दिसले नाही तरी डोळा दिसायला सर्वसाधारण होईल हे त्यांची समस्या सोडवू शकणार होते.दुसऱ्याच दिवशी सर्व आवश्यक टेस्ट करून डॉक्टरांनी सुषमाला आत घेतले ऑपरेशन थिएटर चा लाल दिवा लागला.ऑपरेशन संपवून डॉक्टर बाहेर आले.नजरेनेच डॉक्टरांनी जमले अशी खूण केली नामदेव च्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टरांनी ऑपरेशन सक्सेस झाल्याचे सांगितले. व ते पुढील ऑपरेशन साठी आत गेले.
पुढील काही दिवस स्थानिक डॉक्टर दांडेकर यांनी सुषामाची काळजी घेतली. आज सकाळपासून मी अस्वस्थ होतो आज सुषमाची पट्टी खुलणार होती, तिला दिसणार की नाही हे ठरणार होते डॉक्टर अधलखीयाआले सुषमाची पट्टी सोडण्याची तयारी सुरू झाली. हृदयाची धड धड सुरू झाली…….पट्टी खुलली डॉक्टरांनी हळू हळू डोळे उघडण्यास सांगितले दोन्ही डोळे सारखे पाहून सर्वच खुश झाले. आता हर्ष वायू होण्याची वेळ माझी होती,सुषमा चांगला डोळा झाकून ऑपरेशन झालेल्या डोळ्याने पुढील अक्षरे वाचत होती क.ख ग घ. सुषमा चे आई वडील दोन मिनिट बोललेच नाही पण दोघांनीही डॉक्टरांचे पाय केंव्हा पकडले समजलेच नाही माझ्या डोळ्यात पाणी तरळले. डॉक्टरांचे आभार मानून मी बाहेर निघालो. सुषमाचे ते अबोल डोळे बोलके झाले होते.
पुढे सुषमा कॉलेजला आली पास झाली मी सुद्धा आपल्या कामाला लागलो, प्रमोशन मिळाले प्राचार्य झालो……
सर पेढा घ्यान…….सुषामाचा आवाजाने मी भानावर आलो. कसलाग पेढा…..सर मी शिक्षिका झाले.बी एड केले आता हायस्कूल टीचर म्हणून माझी नियुक्ती झाली. वा…अभिनंदन. सर सारे श्रेय तुमचे आहे. आजचा दिवस तुमच्यामुळे उगवला सर ….तिचे डोळे पाणावले. नामदेव मुक होता पण त्याच्या मौना तूनही आभाराचे स्वर उमटत होते. सर पोरीसाठी तीन स्थळ सांगून आले आहे.ताडाळीचे दिवसे गुरुजी मागे लागले आहे,पोरगा तहसीलदार आहे सर, तुम्हाला यावं लागलं सर पोरीच्या मायचा खास आग्रह आहे जी. येईन येईन….मी सहजतेने बोललो. सगळा प्रकार पाहून रमेश शिपाई चहा घेऊन आला.
सुषमाने घेतलेल्या शिक्षणाची माहिती सांगितली. कशी स्कॉलरशिप मिळाली व औरंगाबादला घेतलेल्या उच्च शिक्षणाची माहिती दिली. थोड्याच वेळात दोघेही निरोप घेऊन निघाले. नकळत मी ही बाहेर आलो. कॉलेजच्या मुख्य दरवाज्या पर्यंत जावून सुषमा पलटली….माझ्याकडे पाहून हात हलविला न बोलताही तिच्या डोळ्यातून कृतज्ञता बोलत होती………
समाप्त
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈