सौ. राही पंढरीनाथ लिमये
(गेली वीस वर्षे मासिकात कथा, कविता लिहिते. ललना, माहेर, उत्तम कथा, मानिनी, प्रपंच दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.)
☆ जीवनरंग ☆ अ ल क ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆
1) पंचवीस वर्षे पलंगावर लोळागोळा होऊन पडलेल्या आणि नुकत्याच शांत झालेल्या मुलाच्या देहाकडे शीलाताई शांतपणे पहात होत्या. मनात भावनांचा कल्लोळ होता पण चेहरा निर्विकार होता. सगळे शोक व्यक्त करत होते. हळुच त्या देवघरात गेल्या. बाळकृष्णाला हात जोडले. तुझे आभार कसे मानू?अनंत उपकार केलेस. रोज तुला प्रार्थना करत होते माझ्या आधी माझ्या या गोळ्या ला ने.लाज राखलीस. खरा सखा झालास.आता मागे काही चिंता नाही. मी सुखाने डोळे मिटीन.
2) ती त्याच्या फोटो समोर उभी राहुन म्हणाली तुला माहितेय माझी मैत्रीण मला म्हणाली हल्ली तु शब्दातुन छान व्यक्त होतेस.ती आता माझी गरज झाली का रे? तु असताना कुठल्याही परिस्थितीत असणारी तुझी भक्कम साथ.तुझ्यावरचा दृढ विश्वास हा च मोठा भावनिक आधार होता. आता तो मी शब्दातुन शोधतेय का?सांग ना. तो फोटोतुन हसत होता. तिचे डोळे भरून आले.
अल्याड पल्याड चं हे अंतर–‐—-‘.
3) रात्री उशिरा फोन वाजला. बस दरीत कोसळली होती. तो रेस्क्यु टीम मध्ये होता. ती म्हणाली सांभाळून हं.त्याने तिला जवळ घेतलं. तुझा हा च शब्द मला सुरक्षित ठेवतो.तो भराभर निघुन गेला. ती दारातून अभिमानाने बघत होती. ती देवघरात आली. समई लावली आणि हात जोडून उभी राहिली. काही सांगायचं नव्हतच.कारण सांभाळून ह्या तिच्या शब्दातल॔ सुरक्षा कवच देवाच्या आशीर्वादाचच तर होतं.
सौ. राही पंढरीनाथ लिमये
मो नं 9860499623