मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

स्वागतिकेला विचारले, ” मिस् जोकर कोण, कुठे ,कधी भेटेल मला? काका कुठे आहेत आता?”

ती म्हणाली, “आमच्या मुख्य  नर्स म्हणजे ‘मिस् जोकर’.आता येतील ड्युटीवर इतक्यातच.येताना काकांना पण घेऊन येतील.फार प्रेमळ, उत्साही, परोपकार आणि मुख्य म्हणजे विनोदी आहेत.त्या आपल्या विनोदाने, मस्करी ,मज्जा करुन पेशंटचे अर्धे आजार बरे करतात आणि त्यांच्या नातेवाईकांचं  अर्धे टेन्शन.”

इतक्यांत “Good morning everybody” म्हणत एक चाळीशीची एक गोरी, सडसडीत, हसतमुख बाई काकांबरोबर येताना दिसली. हीच ती माझी आणि स्वागतिकेची ‘मिस जोकर.’

मला बघितल्यावर चक्क मला तिने मिठीच मारली. तिला जुनी ओळख पटली. जवळपास पंधरा वर्षानी आम्ही भेटलो. मला म्हणाली, “मी वाॅर्ड मध्ये रोजची फेरी  मारुन येते. सगळे पेशंट बघून येते. मग निवांत आपण बोलू या.”

मी काकांना विचारले “काय काका, काल कुठे होतात तुम्ही?” काका म्हणाले ”काल तुम्ही सगळे गेलात.पण मला तुमच्या काकूंना सोडून जायला मन तयार होईना. मग बसलो इकडेच. नाहीतरी घरी जाऊन भुतासारखा हिच्याशिवाय  एकटा रात्र कशी काढणार? पण रात्री ह्या मुख्य नर्स बाई आल्या. त्यानी बळेबळेच मला स्वतःच्या रुम वर नेले. गरम गरम जेवू घातले. झोपण्याची व्यवस्था केली. आता सकाळी पण नाश्ता वगैरे दिला. आणि इकडे घेऊन आल्या. वर बजावले जोपर्यंत काकू इकडेअॅडमिट आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या कडे रहायचे अगदी निःसंकोचपणे. तुमच्या मुलीकडे आहात असे समजा”.

थोड्या वेळाने मुख्य नर्स बाई राऊंड मारुन सगळ्या पेशंटची विचारपूस करून त्यांना जरुरीनुसार सुचना देऊन आल्या. मला म्हणाल्या, ” चल ग आपण चहा घेत घेत दहा पंधरा मिनीटे गप्पा मारुया. “मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला विचारले, “तु एक नंबरची टवळी. ह्या सिरीयस आणि तुझ्या स्वभावाशी विसंगत अशा पेशाकडे कशी काय वळलीस”.

मग ति सांगू लागली, “मी घरच्या परिस्थितीमुळे इंटरनंतर  काॅलेज सोडले नर्सिंगचा कोर्स घेतला. मला काय लग्न संसारात फारसा रस नव्हता. पण समाजासाठीं काही करण्याची मनापासून इच्छा होती. खरं तर डाॅक्टरी पेशा मला फार प्रिय. पण ते होणं परिस्थितीने आणि बुध्दीमतेने पण शक्य नव्हते. म्हणून मग परिचारिका बनून लोकांची सेवा करु.असा विचार केला आणि स्विकारला. “ह्या जोकरला इतके गंभीरपणे बोलताना मी पहिल्यांदाच बघत होते.”

त्या दिवशी मनात असून पण मार्च महिना, इयर एंडिंग म्हणून दांडी तर मारू शकत नव्हते. ठरवले रात्री झोपायलाच जाऊ या. काकूंना सोबत आणि त्यांच्या बरोबर निवांत गप्पा पण होतील. सकाळी  घरी सगळ्यांची व्यवस्थित रात्रीच्या जेवणखाणाची तयारी करून रात्री परस्पर बँकेतून हॉस्पिटल मध्ये गेले. काकूंशी गप्पा मारल्या. बाहेर सोफ्यावर झोप येईपर्यंत वाचत बसले.  रात्रपाळीच्या नर्सची स्टाफची कामे चालूच होती. माझ्याशी मधे मधे गप्पा मारायला मला कॉफी, हवे नको विचारायला आस्थेने येत होत्या, कारण मी त्यांच्या ‘मिस जोकरची’ मुख्य नर्सबाईंची मैत्रिण होते ना.

मीना म्हणून एक वयस्कर नर्स माझ्याशी गप्पा मारायला बसली., “ताई, ताई म्हटले तर चालेल ना तुम्हाला?” माझ्या होय नाहीची वाट न बघता पुढे बोलू लागली. ” ताई तुम्ही, तुमची मिस जोकर माझ्या मुलीसारख्या म्हणून जीव तुटतो. इतकी सुंदर,शालिन मुलगी. साऱ्या करिता धडपडते, झटते.”

क्रमशः…

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈