सौ.अंजली दिलिप गोखले
☆ जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
बरोबर दहा वर्षापूर्वी याच बागेत मी निलेश बरोबर गप्पा मारत होतो. त्याचं आपल्या बागेवर खूप प्रेम होतं. पहिल्यापासूनच झाडाझुडपात राहणार त्याचं संवेदनशील मन होतं. म्हणूनच मेडिकलला ऍडमिशन मिळत असूनही तो गेला नाही. त्याच्या आवडत्या ”बॉटनी” तच त्यानं BSc आणि M Sc सुद्धा केलं. मला स्वतःला त्याच्या मैत्रीमुळे, त्याचा सहवास मला आवडायचा आणि त्याहीपेक्षा काढलेल्या नोट्स तो मला अभ्यासाला द्यायचा म्हणून मी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून M.Sc केलं. नंतर मला एका कोर्सला बेंगलोर ला ऍडमिशन मिळाली आणि नोकरीसाठी म्हणून मी दहा वर्ष तिकडेच होतो. त्यामुळे तिथे निलेश च्या आयुष्याची झालेली उलथापालथ मला समजू शकली नाही. त्याच्या आणि चंदाच्या !
होय चंदा ! सी. चंदा. साउथ इंडियन. मुद्दाम एम एस सी साठी इकडे आली आणि इकडची होऊन गेली. निलेश सारखं तिचंही बॉटनी वर फार प्रेम होतं. दोघांचंही एकच स्पेशलायझेशन. त्यामुळे त्यांची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. निलेश सदैव आपल्या विषयाच्या विचारांच्या तंद्रीतच असायचा. त्याच्या मेंदूत इतके सारखे सारखे नवनवीन विचार प्रश्न येत असत की बरेचदा त्याला वर्तमानकाळाची शुद्ध नसायची. यामुळे युनिव्हर्सिटीत तो विक्षिप्त म्हणूनच प्रसिद्ध होता. पण त्याच्या हुशारीवर, विक्षिप्तपणा वर चंदाचा जीव जडला आणि निलेश च्या मनात नसतानाही तिने आपला आयुष्याचा जोडीदार त्याला निवडले. संसार -लग्न -दोन वेळचं जेवण. घर असल्या मध्ये निलेशच मन रमणारच नव्हतं. त्याला फार मोठे संशोधक व्हायचे होते. आपल्या डोक्यातले विचार प्रत्यक्ष सिद्ध करायचे होते. त्यामुळे तो चंदाला दाद देत नव्हता.
एकेदिवशी होस्टेलवर रूमवर आम्ही दोघेही वाचत बसलो होतो. पण रोजच्या सारखे निलेश चे वाचनाकडे लक्ष दिसत नव्हते. तेवढ्यात त्यानेच मला हाक मारली, “अरे, प्लीज माझ्यासाठी दहा-पंधरा मिनिटे देतोस? मला फार महत्त्वाचे बोलायचे आहे तुझ्याशी.”
“हो, मी एका पायावर तयार आहे. काय रे निलेश? माझ्याशी गप्पा मारायला तुला विचारायची काय गरज? बोल बोल. काय चंदाचा विचार करतोस की काय ” मी उगाचच त्याला विचारले.
“अगदी बरोबर. चंदा चाच विचार करतोय मी. अरे, ही हट्टी मुलगी माझा पिच्छा सोडत नाहीये. आपली परीक्षा झाली की रिझल्ट लागेपर्यंत आपण होस्टेलवर या रूमवर राहू शकणार नाही. मी आमच्या गावातल्या बागेतच छोटी लॅब टाकून संशोधन सुरू करायचं म्हणतोय आणि त्यासाठी चंदाची मदत घ्यावी असे मी ठरवतोय. केवळ तेवढ्यासाठी तिच्या प्रेमाला होकार देणार आहे. लवकर लग्न करून मी तिला एक मोठी अट घालणार आहे. ऐकतोयस ना? लग्न झाल्यावर तिनं फक्त माझ्या बरोबर राहायचं. बाकी कोणाशीही बोलायचे नाही, भेटायचे नाही, अगदी तुला सुद्धा किंवा तिच्या स्वतःच्या आई-वडिलांना सुद्धा.”
“अरे पण का? ही कसली अट ?”मी एकदम न रहावून विचारले,”ती तयार होईल असली विचित्र अट मान्य करायला?”
“निश्चित होईल. “निलेश शांतपणे म्हणाला, ”ती तशी तयार नसेल तर मी तिच्या प्रेमाचा स्वीकारच करणार नाही ना.. जाऊदे. कुठे जायचे तिथं. करू दे कोणाशी लग्न. माझे काहीच बिघडणार नाही.”
क्रमशः ….
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈