मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मराटी असे आमुची मदरटंग – भाग -1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ जीवनरंग ☆ मराटी असे आमुची मदरटंग – भाग -1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

“ममा, तू म्हणतेस ना, ते सॉंग मला कम्प्लिट लिहून दे ना ग.”

“कुठचं रे?”

“ते ग.’मराटी असे आमुची मदरटंग.’ ”

“काssय?”

“तू म्हणतेस नाय का नेहमी? मला लवकर लिहून दे ना ग. ते सॉंग मला बायहार्ट करायचंय. उद्या सिलेक्शन आहे.”

“कसलं सिलेक्शन?”

“नेक्स्ट मंडेला आमच्या स्कुलमध्ये  ‘मराटी डे ‘आहे ना! टीचरने सांगितलंय, प्रत्येकाने ‘मराटी’वर एक सॉंग बायहार्ट करुन या. मग त्यातून उद्या फोर सॉंग्ज सिलेक्ट करणार. ती नेक्स्ट मंडेला असेम्बलीमध्ये सिंग करायची.”

“वा रे मराटी गाणी सिंग करणारे!त्यापेक्षा एक दिवस शुद्ध मराठी बोलून ‘मराठी दिन’ साजरा करा म्हणावं.”

“एकच दिवस कशाला? मराटी पिरियडला फुल क्लास मराटीमध्येच बोलतो. मिस सांगते,’ज्या मुलानला मराटी बोलायला नाय येल, त्याने एक लेसन फाय टाइम्स कॉपी करायचा.’ ”

टीचरच्या मराठीप्रेमाने धन्य धन्य होऊन मी तिचं नाव विचारलं.

“सॅली डिकून्हा.”

काय हा दैवदुर्विलास! या मायमराठीच्या स्वतःच्या साम्राज्याच्या राजधानीत असूनही या शाळेला मराठी शिक्षक मिळू नये ना!आणि मारे आम्ही जागतिक मराठी परिषदेच्या बातम्यांनी स्वर्गाला हात टेकतो.

आणि पुन्हा नेहमीच्या विचाराने मनात उसळी मारली, चालू प्रवाहाबरोबर वाहत जाऊन आपण त्याला इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये घातलं, हे बरोबर की चूक? कारण प्रश्न फक्त भाषेपुरताच मर्यादित नाही. मराठी आणि इंग्लिश मिडीयममधल्या मुलांवर होणाऱ्या संस्कारातही किती अंतर असतं!

आता या नर्सरी ऱ्हाइम्स.

‘पिगी ऑन द रेल्वे….’    ‘रेल्वे’ म्हणताना त्या बिचाऱ्या चिमुकल्या जिभा अशा काही पिळवटल्या जातात आणि लेल्वे, लेर्वे, लेवले किंवा असंच कुठचंतरी रूप घेऊन ‘रेल्वे’ त्या इवल्याशा जिवणीच्या बोगद्यातून बाहेर पडते.

‘पिकिंग अप स्टोन्स’ म्हणजे काय ते एक देव जाणे आणि दुसरा पिगी जाणे!

‘डाऊन केम अँन इंजिन

अँड ब्रोक पिगीज बोन्स ‘

आता मराठीतलं बडबडगीत असतं तर मुलांनी त्याला मलम लावलं असतं, डॉक्टरकडे नेलं असतं आणि मुळीच न दुखणारं इंजक्शन द्यायला लावलं असतं. पण आंग्ल भाषेतला इंजिन ड्रायव्हर ‘आय डोण्ट केअर’ म्हणून चालायला लागतो. मुलंही गाणं संपवून ‘त्या पिगीचं बिचाऱ्याचं काय झालं असेल’ वगैरे चांभारचौकशा न करता शांतपणे, कपाळ फुटून भळाभळा रक्त वाहणाऱ्या जॅकचं आणि डोंगरावरून गडगडत खाली येणाऱ्या जिलचं गाणं म्हणायला लागतात.

अर्थात मुलांचाही काही दोष नाही म्हणा. त्यात काही भयंकर वगैरे असेल, अशी पुसटती शंकासुद्धा त्यांच्या मनात येत नाही.

याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर झालेले मीडियाचे संस्कार. हल्ली म्हणे सेन्सार  बोर्डाने सक्तीच केलीय की, प्रत्येक सिनेमात कमीत कमी दोन तरी माणसं उंच कड्यावरून किंवा कन्स्ट्रक्शन साईटवरून खाली कोसळली पाहिजेत आणि प्रत्येक पन्नास फुटांत किमान एक तरी माणूस घायाळ होऊन त्याच्या शक्यतो चेहऱ्यावरून भळाभळा रक्त वाहिलं पाहिजे. असा सीन नसेल तर ते पन्नास फुटांचं रिळ कट.फायटिंगमध्ये हिरोने व्हिलनचा मार खाल्ला रे खाल्ला की सगळे ज्युनिअर सिटीझन्स ‘होss!’ करुन ओरडणार. (आमच्या लहानपणी हिरोने व्हिलनला मारल्यावर ओरडायची पद्धत होती.)

                         क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈