सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-5 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
आज मी परत घरी एकटी पडले डोळ्यासमोरुन सुखी, समाधानी, आनंदी प्रतिक्षा हलत नव्हती. त्यामुळे हा एकटेपणा आज तरी मला त्रासदायक वाटत नव्हता.
आता मी नोकरी सोडली होती. गाण्याचा क्लास जाॅईण्ट केला होता. न चुकता जवळच्याच अनाथाश्रमांत एका दिवसा आड जात होते. त्या मुलांना शिकवत होते. त्यांच्या गोकुळात माझे मन रमत होते.ती मुलं पण माझ्या वाटेकडे डोळे लावून बसायची.
मधे मधे प्रतिक्षा नितीन येऊन भेटायचे. कधी मी त्याच्याकडे जायचे. मी, प्रतिक्षा, नितीन त्याचे पप्पा चौघेजण नाटक, सिनेमा, कधी छोटीशी पिकनिकला जात होतो. मस्त मजेत दिवस चालले होते. आणि एक दिवस माझ्याकडे रात्री ही जोडीअचानक आली. इकडच्यातिकडच्या गप्पा झाल्या. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. मला काहीतरी सांगायचे होतं. पण ते सांगायला कचरत होते. शेवटी मीच म्हटलं “जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगा माझी ऐकायची तयारी आहे”
प्रतिक्षा चाचरत सांगू लागली म्हणाली,”आई, नितीनला परदेशी जाण्याची संधी आली आहे. माझ्या कंपनीची पण तिकडे शाखा आहे. तू आणि नितीनचे पप्पां इकडे एकटे रहाणार म्हणून ती संधी स्विकारायची कि नाही अशा द्विधा मनस्थितीत आम्ही आहोत. आई तू फार सोसलं ग. मला एकटीनेच वाढवलसं. आपलं सोन्यासारखं आयुष्य आमच्यासाठी घालवलसं. दोन्ही आजी आजोबांची दुखणी, खुपणी म्हातारपण म्हातारपणाची त्यांची चिडचिड, हे मुकाट्याने सहन केलंस. आता मला म्हणजे नितीनला, म्हणजे मलाआणि नितीनला”
“अग बोल ना प्रतिक्षा काय ते एकदाच सांगून टाक”
“म्हणजे तू आणि नितीनच्या पपानी लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? एक तर तुमचे विचार जुळतात.ते पण एकटे रहाणार आणि इकडे तू पण. आम्ही usला तिकडे गेल्यावर आम्हाला तुमची काळजी पण नाही.”
“नाही प्रतिक्षा तुम्ही तिकडे बिनधास्त जा. मी इकडे माझी काळजी व्यवस्थित घेईनच पण नितीनच्या पपांची पण घेईन. तुम्ही आमच्या दोघांची थोडी सुद्धा चिंता करु नका.निश्चिंत मनाने जा. पण आता ह्या वयांत मला हे स्विकारण्यास सांगू नका. जे मी ऐन तारूण्यात सुध्दा स्वीकारले नाही.”
रात्रभर विचार केला. सकाळी लगेचच मी माझ्या जवळपास राहणारी माझी एक जिवलग मैत्रिण विनीता सध्या सुनेच्या जाचाला कंटाळून वृध्दाश्रमात जायचा विचार करत होती. तिला माझ्याकडे कायम रहायला येण्याबद्दल विचारले. ती एका पायावर तयार झाली.नितीनच्या पप्पांना पण एखाद्या मित्राला घरी रहायला बोलावण्यासंबंधी सांगितले. ते म्हणाले, “मित्र कशाला ? भाऊच माझा येईल की. भावजय हल्लीच वारली आहे. आणि पुतणी सासरी. आम्ही दोघं भाऊ मजेत राहू. खरं म्हणजे तोच मला पुण्याला बोलावत होता. पण नितीनला सोडून जायला मन तयार होत नव्हते. आता त्यालाच इकडे बोलावतो.
मग मी कामाला एक जोडपं शोधलं. ती बाई माझ्या घरी स्वयंपाक करेल. आणि नितीनच्या पपाना आणि काकांना डबा पोचवेल. दोन्ही घरचे घरकाम पण करेल. आणि तिचा नवरा दोन्ही घरची बाहेरची कामें, बाजारहाट आणि इतर सटरफटर कामे करतील. दोघंही आमच्याच घरी रहातील. कारण माझं घर तसं भरपूर मोठं होतं. एक गच्ची होती. त्याला जोडून एक खोली पण होती. तिकडे ती दोघं आरामात राहू शकत होती. मी माझा प्लॅन प्रतिक्षा, नितीन आणि पप्पांनी सांगितला. माझ्या ह्या प्लॅनवर तिघेही खुष.. त्याना पण ते पटलं. वेळा काळाला आपण आहोतच. एकमेकांना.
नितीन आंणि प्रतिक्षा बिनधास्त usला गेले. आता मला अजिबात एकटं वाटत नाही. माझी मैत्रीण सुनिता 24 तास बरोबर असते. मग काय मनसोक्त भटकणं खाणंपिणं. आम्ही अनाथाश्रमांत जातो. त्या मुलांना शिकवतो. गाणी गोष्टी सांगून त्याचं मनोरंजन करतो. नितीनच्या पप्पांना कधी बोलावतो. कधी आम्ही तिकडे जातो. कधी वॄध्दाश्रमांत जातो. आमच्यापेक्षा वृध्द आहेत त्यांची जमेल ती सेवा करतो. त्यांना पुस्तके वाचून दाखवतो. मनोरंजन करतो. आता मी अजिबात एकटी,एकुलती एक नाही.
माझा परिवाराचा परीघ खूप रुंदावला आहे. गोकुळाची कक्षा वाढली आहे. एकुलतं एकपण त्या गोकुळात कधीच विसरुन गेले.
! समाप्त !
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈