श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 5 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

“कोण टँली करून बघतय” हे सरांचं पालुपद सारखं चालूच होत. शेवटची ‘संकीर्ण ‘  नावाची फाईल होती. सरांची भाषणं, कुटुंब नियोजनाची केस करणं, साक्षरता प्रसार अशा कामांच्या बातम्या, फोटो, शीर्षकासह त्यात होत्या.

“तुम्ही ही जी कार्य करता तिथले फोटो कसे मिळतात?”

“फोटो काढतातच तिथे. एक दोन कॉप्या मागूनच टाकतो. शिपाई बरोबर असतो. तो मोबाईल वरुन फोटो मारतो. क्लार्क बातम्यांच्या चार पाच झेरॉक्स काढून ठेवतो. सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे.

“चार पाच झेरॉक्स? त्या कशाला?”

“म्हणजे बघा ,एकच बातमी-उदा. व्रुक्षारोपणाची बातमी शालेय विकास, मूल्य शिक्षण, नवोपक्रम ह्या सगळ्या फाईलीत टाकायची.”

“पण पुरस्काराचे तपासनीस हरकत नाहीत घेणार?”

“हरकत काय घेतात!फायलीचे नि फोटोंचे ढिगारे बघून डोळे दिपतात त्यांचे. कपाटभर कागदं बघून पार चक्रावतात.

“त्यानीन च सगळीकडे माझ्याबद्द्ल सांगितलंय्, “पाकुर्ड्याचे ढेकळे सर म्हणजे अफाट गावचा अचाट माणूस. डोंगरा एव्हढं काम केलय शाळेसाठी. पुराव्यासकट सगळं जिथल्या तिथं. ब्र काढायचं काम नाही.”

“पण एव्हढं सगळं करायला वेळ कसा काढता?निकालही चांगले लागतात बोर्डाचे, शिकवता कधी ?”

“माझा हिंदी विषय,तो सुधरायचं काम टीव्ही, सिनेमे करतात की. माझी सगळी पोरं हिंदीत पास. आता बोर्डपण हिथच. एखादी चक्कर मारायची. अधिकाऱ्यांना द्राक्ष बाग लावायची होती. लाऊन दिली. तोंडं गोड करावी लागतात. गेल्या वर्षी ग्रामीण भागात , मागासवर्गात तिसरा आणला.”फोटो, शीर्षक होतच. ‘शाळेचं भूषण !’

“आता ह्या फायली मी केल्या म्हणता? स्टाफ, पोरं काम करतात. अँडमिनिस्ट्रेशनच कडक आहे.”

“सर, तुम्ही मुख्याध्यापक कधी झालात? ह्या पदावर असल्याशिवाय एव्हढं अवाढव्य काम करणं शक्यच झालं नसतं.”

“नेमणूकच झाली त्या पदावर.” सर अभिमानाने म्हणाले.

कुणाला ठाऊक! आपल्याला ते पद मिळावं म्हणून शाळाच काढली असावी. माझ्या मनात आलं.

“मी परीक्षक असते ना तर तुम्हाला आणखी एक पुरस्कार दिला असता.”

“कोणता?” सर निरागस आशाळभूतपणे म्हणाले.

“प्रयत्न आणि चिकाटी पुरस्कार.” मी दिलखुलासपणे म्हटलं. सरानी माझं बोलणं  भलत्याच गांभीर्याने घेतलं. एक नक्षिदार कागद माझ्यासमोर  ठेऊन ते म्हणाले, “हां. ह्यावर लिहा मजकूर.”

सरांच्या कर्तृत्वपूर्ण कारकिर्दीने मी आधीच पुरती भारावून, भांबावून, चक्रावून वाकले होते. त्यामुळे त्या कागदाकडे दुर्लक्ष  करून मी म्हणाले “राष्ट्रीय पुरस्कारासाठी शुभेच्छा! “हसऱ्या बाईंसकट सर्वांचा निरोप घेऊन मी बाहेर पडले. सुटलेच तिथून.”

“शुभेच्छा लेखी कळवा.” सर हात हलवून मला मोठ्याने सांगत होते.

समाप्त 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments