श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 3 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

ताराचंद चे ते वाक्य “पैसे रत्ना नाम की वेश्या भेजती है” दिवसभर मला बेचैन करीत राहिले.  दुसऱ्या दिवशी मी पुन्हा ताराचंद च्या झोपडीचा दरवाजा ठोठावला. मला पाहून ताराचंद निर्विकार चेहऱ्याने म्हणाला सर मुझे पता था, आप जरूर आओगे, पैसे वापस करने आयेना सर आप….. इसीलिए मै नहीं बता रहा था….. मी काहिच बोललो नाही….. थोडा वेळ शांततेत गेल्यावर मी पलंगावर बसत म्हणालो….. ताराचंद तू सोच रहा है, मैं उनमें से नहीं हूँ, मै पैसे वापस नहीं करूंगा, और मै तुझ पर गुस्सा भी नहीं हूँ …….

ताराचंद ला आनंद झाला हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मी ताराचंद ला विस्वासात घेत म्हणालो क्यो आज चाय नही पिलाएगा….. क्यो नही सर म्हणत ताराचंद ने चहाची ऑर्डर दिली. मला थोड़ा वेळ हवा होता तो चहा मुळे मिळाला.

चहाचा कप खाली ठेवत मी विषयाला हात घातला. ताराचंद जी आप एक काम करो, मुझे उस रत्ना बाई से मिलना है, औंर ये काम आपको करना है. माझ्या या अनपेक्षित बोलण्याने ताराचंद अवाक झाला…. नहीं सर आपका उससे मिलना सही नहीं रहेगा. आपका रुतबा और पोस्ट क्या सर, नहीं….. सर मै ये काम नहीं करूंगा.

त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो ताराचंद डर मत जो महिला गरीब बच्चियों का पढाई खर्चा देती हैं, वह महान है, उसके वेश्या होने से मुझे फरक नही पड़ता, मिलवा मुझे।

ताराचंद ला माझे बोलणे पटले. काही वेळ विचार करून तो म्हणाला, सर मुझे समय दो उसी से बात करके मै बताता हूँ.

मै कोशिश जरूर करूंगा, पक्का.

त्याच्या कडे विश्वासदर्शक नजर टाकून मी निघालो.

बरोबर तिसऱ्या दिवशी ताराचंद चां फोन आला, सर कल दोपहर् को चलेंगे. पर सर मैं  अभी भी कहता हूँ, वहाँ आपका जाना सही नहीं है.

ताराचंद तू मेरी चिंता मत कर, मिलवा मुझे. ठीक है सर म्हणून त्याने फोन ठेवला.

ताराचंद ला कार मध्ये घेऊन मी निघालो गावच्या बाहेर निघाल्यावर ताराचंद म्हणाला सर अपने को वणी जाना है.

वणी हे गाव वीस किलोमिटर अंतरावर होते. गावाच्या आधी वेश्यांची वस्ती आहे हे मला माहीत होते. कार तिकडे वळविताच टीनेच्या छपराची काही घरे व झोपड्याची वस्ती दिसू लागली. वस्तीत शिरताच अनेक डोळे आमच्यावर रोखलेले जाणविले. एका टपरीवजा हॉटेल समोर गाडी उभी करण्याची खुण ताराचंद ने केली. खाली उतरताच हे लक्षात आले की अनेकांची ताराचंद शी ओळख आहे. अरे क्या मामु कहा थे, बहोत दिन हुये आये नहीं. हॉटेलच्या मालकाने ताराचंद ला आवाज दिला. ताराचंद आत जाऊन त्याचा कानाशी लागला. त्याबरोबर हॉटेल मालकाने मोठ्या अदबीने मला आत बोलाविले. तो पर्यंत नोकराने कपडा मारून बाकडे पुसले, मीही अंग चोरुन बसलो. सर आप बैठिए म्हणून ताराचंद समोरील वस्तीत दिसेनासा झाला. दोन तीन वारांगणानी तो पर्यंत माझा अंदाज घेतला पण हॉटेल मालकाने खुण करून, कामका नहीं हा संदेश दिला. दहा मिनिटांनी ताराचंद एका प्रौढ महिलेसोबत परत येताना दिसला. गोरा रंग व शरीराने स्थूल झाली असली तरी आपल्या तारुण्यात ती सुंदर होती हे जाणवत होते. जवळ येताच ताराचंद ने माझी ओळख करून दिली.

अम्मा येहीच सर है. जिसका मैने कल जिक्र किया था. दोन्ही हात जोडून ती म्हणाली गुरुजी मीच रत्ना हाये. ताराचंद ने तुमचे खूप गुणगान केले, तुमच्या बद्दल लई सांगितले त्यानं. म्हणूनच मी हो म्हणाली. काय बोलावे हे न सुचल्याने मी तिच्याकडे पहातच राहिलो. ताराचंद नेच समोरच्या बाकावर तिला बसविले. स्वतःला सावरून मी बोलणे सुरू केले. रत्नाबाई तुम्ही आमच्या महाविद्यालयातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करता म्हणून तुमचे आभार मानायला मी आलोय. मला तुमचा आदर वाटतो. रत्ना काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ सरकतो आहे हे मी ओळखलं.

एक निस्वास सोडून रत्ना बाई बोलू लागली…..गुरुजी तुम्हाला पाहून मला आमच्या खेडकर गुरुजींची आठवण झाली. बेळगाव जवळच्या वेश्या वस्तीत माझा जन्म झाला बाप कोण होता माहित नाही पण माझी आई सुंदर होती. ती वेश्या असली तरी मी शिकून मोठी व्हावं असं तिला वाटे. आमच्या वस्तीत एका संस्थेची शाळा होती त्यात आम्ही सर्व वेश्यांची मुलेच होतो. खेडकर गुरुजी तिथेच शिकवायला होते. आमच्यावर खूप जीव लावायचे. मी त्यात सर्वात हुशार, मी शिकून मोठी व्हावे म्हणून गुरुजींनी मला दहावीच्या परीक्षेला बसविले पण वस्तीतून विरोध सुरू झाला. गावातील शाळेच्या हेडमास्तरने ही विरोध केला. खेडकर सरांनी खूप मदत केली पण त्यांचे वस्तीपुढे चालले नाही. शेवटच्या पेपरला वस्तीने मला जावू दिले नाही कोंडून ठेवले. त्यादिवशी खेडकर सरांजवळ मी खूप रडली. माझी आई बिमार पडली टी. बी. होऊन ती महिण्याभरात मेली. माझ्या समोर जीवनाचा प्रश्न उभा राहिला या धंद्या शिवाय पर्याय नव्हता. पण शिक्षणाची आवड संपली नाही. आज माझा कोठा आहे. आठ दहा पोरी धंदा करतात. पैसे कमावले वाटते कुण्या गरीब पोरीचे शिक्षण सुटु नये. प्रयत्न सुरू केला. गावातील शाळेत जाऊन पैसे देण्याचा प्रयत्न केला हेड मास्तर बाई होती पण अंगावर धाऊन आली म्हणाली तुझा गंदा देह अन् गंदा पैसा उचल नी बाहेर हो. तुझी छाया शाळेवर नको. खूप वाईट वाटले. मी शरीर विकून पैसा मिळविला म्हणून तो अपवित्र होतो का गुरुजी. जमिनीत आपण अनाज पिकवितो. तीच जमीन अफु गांजा, जहर ही पिकाविते म्हणून जमीन अपवित्र होते का गुरुजी तुम्हीच सांगा. हा ताराचंद यायचा वस्तीवर ओळख झाली माणूस इमानदार आहे, त्याच्यासमोर मन मोकळं केलं शपथ दिली माझं नाव नाही सांगायचं, त्यानेही मदत केली गुरुजी तुमच्या कालेजात पाच पोरी. चंद्रपुरात दहा पोरींचा शाळेचा खर्च करते तीन पोरी नागपूरला नर्सिंग च ट्रेनिंग घेत आहे गुरुजी मी माझा धंदा बदलू शकत नाही. पण माझ्या शिक्षणाची माझ्या आईची इच्छा अशा रीतीने मी पुरी करतेय. तुम्हीच सांगा गुरुजी गरीब पोरींचे शिक्षण घडविणारा माझा पैसा खरंच अपवित्र आहे काय……. रत्ना बाईंचा डोळ्यात आलेलं पाणी गालावर ओघळल. आपल्या पदराने पुसत ती म्हणाली गुरुजी आणखी एक गोष्ट तुम्हाला शपथ आहे विद्येची, ही गोष्ट त्या पोरींच्या मायबापाला कळू देऊ नका. नाहीतर ते मुलींना घरी बसवतील पण माझा अपवित्र पैसा स्वीकारणार नाही. रत्ना बाई   हात जोडून उठली. मी म्हणालो बाई तुमचा पैसा कधीच अपवित्र ठरू शकत नाही गरीब पोरींना शिक्षणाची दारे उघडणारा पैसा गंगे सारखा पवित्र आहे. तो पवित्रच आहे. रत्ना बाई पलटून केव्हा निघाली कळलेच नाही, पण तिचे डोळे भरून आले हे पाठमोरी असूनही मला जाणवले. ती दिशेनाशी होई पर्यंत मी पाहत राहिलो. डोक्यात मात्र विचार सुरू होता रत्नाच्या पवित्र पैशाचा.

समाप्त.

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments