सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆ भरली वांगी – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
“असुदे राहुदे,पुसेन मी नंतर”
“काय झालं? कुणाशी बोलते आहेस
“मिस्टर कुरकुरे.”
“कोण?”
“हेच ग आमचे! आज सकाळी थोडा वेळ होता म्हणून टीव्ही जवळच्या प्लास्टिक फुलांचा गुच्छ, फ्लावर पॉट सगळ छान धुतलं, पाणी काढून ओट्यावर टॉवेलवर वाळत घातलं, नंतर टीव्ही आणि त्याच्या आजूबाजूची धूळ पुसून सगळं छान स्वच्छ केलं आणि ती धुतलेली फुलं फ्लावर पॉट मध्ये घालून जागेवर ठेवताना जराशी झटकली आणि नीट लावून ठेवली. त्या झटकलेल्या पाण्याचे चार थेंब जमिनीवर पडले तर झाली यांची बडबड सुरू. ‘मी इथे घसरुन पडलो म्हणजे? पाणी किती पडले आहे?’ म्हणजे तिथे सगळे छान स्वच्छ झाले त्याचं ॲप्रिसिएशन वगैरे नाहीच. उलट कुरकुर सुरु.”
“जाऊदे ग! सगळेच मिस्टर असेच कुरकुरेच असतात”.
“तर मी काय सांगत होते, राकेशला क्लासला पोचवून सुमेधा जाणार आहे पार्लरला. तिथून राकेशला घेऊनच घरी येईल. जाताना माझ्या भरल्या वांग्याचं कौतुक करीत मला भरली वांगी करायचं गोड आवाजात फर्मावून गेलीय. दोन-तीन तास पार्लरमध्ये जाऊन काय स्वतःच्या जीवाचे चोचले करून घेतात कुणास ठाऊक! आम्ही आपली करतोय भरली वांगी.”
“आपल्या साळुंक्या पुष्कळ बऱ्या म्हणायच्या! परवा वसू तिच्या अमेरिकेहून आलेल्या सुनेबद्दल काय- काय सांगत होती! तीन आठवड्यांसाठी आलेल्या या पाहुण्या सुना त्यांच्या माहेरी आणि माहेरच्या गोतावळ्यात जास्त असतात. वसु कडे होती चार दिवस, तेव्हा वसू तिला म्हणाली,’अगं घरात असताना नीलला डायपर लावू नकोस. दीड वर्षाच्या मुलाच्या नाजूक स्कीनला त्रास होतो’. नाराजीने आणि मनाविरुद्ध सुनेनं नीलला डायपर लावला नाही आणि त्याचे कपडे खराब झाल्यावर हातातल्या मोबाईल स्क्रीनवरची नजर सुद्धा न उचलता, त्याच्या रडण्याकडे ढिम्म पाहिलं नाही. शेवटी या शीतयुद्धात आजोबांनी नातवाला स्वच्छ केलं”.
“धन्य ग बाई! मागच्या महिन्याच्या आपल्या चम्मतग ग्रुपच्या मिटींगला तू नव्हतीस ना! सुनेच्या बाळंतपणासाठी सहा महिने अमेरिकेला राहून आलेली शुभा काय काय मजा सांगत होती! तिच्या नातवाचा महिन्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुनेच्या मैत्रिणी सहकुटुंब आल्या होत्या. त्यातल्या एका मैत्रिणीने सुंदर पैठणीचा ड्रेस घातला होता. तिच्या सहा महिन्यांच्या बाळाला डायपर बांधलेला असूनही तिच्या ड्रेसच्या हातावर त्याच्या शीचा थोडासा ओघळ आलाच. तर काय करावं त्या मुलीने? सरळ त्या ड्रेसचा हात कापून टाकून दिला. आहे की नाही?”
क्रमशः….
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈