सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆ भरली वांगी – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
??♀???
“शालन आली होती का गं ‘चम्मतग’ला?”
“नव्हती आणि त्या आधीच्या ‘चम्मतग’ ला तरी कुठे होती? मोबाईलवर फोन केला तर कध्धी उचलत नाही. ती एकीकडे आणि तिचा मोबाईल कुठे दुसरीकडे ठेवलेला. तिच्या लँडलाईन वर फोन करायचा म्हणजे आपल्या सहनशक्तीची परीक्षा!”
“का बरं”?
“पुटुपुटु येऊन तिच्या सासूबाईच फोन घेतात आणि साऱ्या जगाच्या चौकशा करीत राहतात. नाहीतर तेच तेच पुन्हा नव्याने सांगत बसतात.”
“वय फार वाढलं की कठीण होत जातं जगणं. नव्वदीच्या पुढे असतील ना आता त्या?”
“हो तर! पण त्यांची गंमत माहितीये ना तुला?”
“कसली गंमत?”
“महिन्यापूर्वी त्या घरातच पडल्या थोड्याशा. शालनच्या मिस्टरांनी डॉक्टरांना बोलावून कुठे हाडबिड मोडलं नाही ना याची खात्री करून घेतली. डॉक्टरांनी सांगितलं की,’ आता तुम्ही आजींना चालताना काठी वापरायला सांगा. ‘तर नातवाने लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना छान चार पायांची काठी आणली. ती कशी वापरायची याचं आजीकडून प्रात्यक्षिक करून घेतलं. आजींनी दोन-तीन दिवस ती काठी वापरली. मग लागल्या पुन्हा पहिल्यासारखं तुरुतुरु चालायला. ते बघून नातवानं विचारलं, ‘अगं आजी, काठी कुठाय तुझी? डॉक्टरांनी चालताना काठी वापरायला सांगितलेय ना?’ तर त्या म्हणाल्या,” नको अरे! काठी घेऊन चाललं की म्हातारं झाल्यासारखं वाटतं.”
“शाब्बास. ग्रेटच आहेत अगदी. दोन दिवसांपूर्वी मोहिनी भेटली होती. ती तिच्या नणंदेकडील वेगळीच गंमत सांगत होती. नणंदेच्या नवीन सुनेच्या माहेरचे लोक ‘हरेराम ‘च्या पंथाला लागलेले.ती सून सुद्धा कांदा-लसूण काही खात नाही. दर रविवारी सकाळपासून बाहेर. कधी मंदिरात भजन-कीर्तन तरी असतं नाहीतर कुणाकडे तरी साजुक तुपातल्या 108 पदार्थांचा अन्नकोट. मूर्तीवर गुलाब पाकळ्यांचा अभिषेक करायचा आणि प्रसाद म्हणून सर्वांनी ते नाजूक-साजूक ड्रायफ्रूटचे पदार्थ, फळं खायची. ती सूनपण नेते एखादा पदार्थ करून. कांदा-लसूण, मसाले काही नाही. कपाळभर गंधाचा मळवट भरायचा आणि पांढऱ्या साड्या नेसायच्या!नस्ती एकेक थेरं. साधे घरात शेंगदाणे भाजले तरी त्याचा भोग दाखवायचा. प्रत्येक भोगाच्या वाट्या वेगवेगळ्या. त्या इतर कशाला वापरायच्या नाहीत.
“मी म्हटलं ना तुला, की आपल्या साळुंख्या पुष्कळ बर्या.”
“पुढच्या महिन्यात आपल्याला चारूच्या मुलाच्या लग्नाला जायचंय ना, त्या आधी आपण एखाद्या पार्लरमध्ये जाऊन यायचं का? बघूया तरी तिथे काय काय प्रकार असतात ते! आपण घरी रंगवलेल्या केसांचा काही दिवसांनी तिरंगा झेंडा तयार होतो. केसांचा मूळ रंग,रंगवलेल्या केसांचा अर्धवट उडालेला रंग आणि मधे मधे डोकावणारे पांढरे केस.”
“चालेल-चालेल. आपली विद्या नेहमी फेशिअल करून घेते. तेही करून बघूया.”
“चल, ठेवते फोन. इतका वेळ मी फोन अडवून बसलेय म्हणून फोनकडे आणि माझ्याकडे रोखून बघत यांच्या अस्वस्थ येरझाऱ्या सुरू झाल्या आहेत. आजची पत्त्यांची बैठक कुणाकडे ठरली ते विचारायला मोबाईल वरून फोन करून ते त्यांचा बॅलन्स कमी करणार नाहीत. मागच्या रविवारी आमच्याकडे होता तो पत्त्यांचा गोंधळ अच्छा, पाठव लवकर मसाला.”
“पाठवते. पण आपल्या गप्पांची ‘भरली वांगी ‘अगदी मसालेदार झाली नाही?”
समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈