मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

मध्येच मी डोळे उघडले. गप्पा थोड्या थांबल्यागत वाटल्या. म्हणून पाहिलं तर अंकलने त्यांचा मोठा ट्रक वजा बॉक्स,-जसा सामान्यपणे सर्व सैनिकांकडे असतो तसा-उघडला होता व एक फोटो अल्बम त्यातून बाहेर काढला होता. मी पुन्हा दुर्लक्ष करून डोळे मिटले. वेगवेगळ्या फोटोबद्दल ते माहिती सांगत होते.

“ये हमारा खेत, ये अम्मा-बाऊजी, अच्छा… ये ना, ये बडे बडे भाई साब ।

“और अंकल ये कौन है?”

“ये मेरा बेटा सचिन और ये उसकी मम्मी।”

“ओह, हाऊ फनी! जवान अंकल, सचिन की मम्मी ने मतलब इस आंटी ने मुँह क्यों ढक रखा है ?…ओ होs हो! आगे की सारी फोटो में भी ऐसा ही है। ….अंकल आपने ऑंटी की मुँहवाली फोटो क्यों नही खिंची ?”….हीsहीsही हसणं आणि मनसोक्त खिदळणं.

हे जरा अतीच होतं.

“सानवी” मी जरा जोरात हाक मारली. तिला खूणेनं आपल्या जवळ बोलावून घेऊन तिला दटावत म्हटलं, “अंकलना त्रास देऊ नको ग.”

“जी नही मॅडम, वह क्या मुझे परेशान करेगी? बल्कि बहूत  अच्छा लग रहा है उससे बाते करके” जवान अंकल म्हणाले.

“बाते करके या बकबक सुनके?” माझा प्रतिप्रश्न होता.

डब्यातले बरेच लोक त्यांचे बोलणे इंटरेस्ट घेऊन ऐकत होते सगळे गंमतीनं हसू लागले. हळूहळू सगळ्यांनाच ही गोष्ट माहित झाली की हा आर्मीतला हट्टाकट्टा नौजवान कारगिल युद्धात भाग घेण्यासाठी चालला आहे. तीन महिन्यांच्या सुट्टीसाठी तो घरी गेला होता. पण अचानक सुट्टी कॅन्सल होऊन त्याला त्याच्या हेड-क्वार्टरला पुण्याला पोहोचावे लागले.. आणि आता ऑर्डरप्रमाणे दिल्लीपर्यंत ट्रेनचा प्रवास करून तो गंतव्य स्थानाकडे प्रस्थान करणार होता. ते पण त्याला दिल्लीला कळणार होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दल कुतूहल आणि आदराचा भाव दिसत होता.

रात्र झाली. दोघी मुली झोपल्या. मी पण वॉकमनवर गाणी ऐकत थोडा टाईमपास केला. उद्या निनाद आम्हाला रिसिव्ह करायला स्टेशनवर येईल. तो आता परत जाणार नाहीय. हा विचारच मला रोमांचित करत होता.

सकाळ झाली. दिल्ली तो बहुत दूर थी। मी जरा फ्रेश होऊन आले. पाहिलं, तर जवान अंकल आणि सानवी गप्पात रंगले होते. पुन्हा ती मोठी ट्रंक उघडल्याचा आवाज आला. सानवी चक्क खाली बसून वाकून काहीतरी पाहत होती. मी फारशी उत्सुकता दाखवली नाही. पण काही वेळानं तिचा मोर्चा माझ्याकडे वळला.

“मम्मा, जवान अंकल कडे ना गन आहे हे. मी आत्ताच पाहिली. जवान अंकल खूप सगळ्या दुश्मनांना मारणार आहेत. पण मी त्यांना सांगितलय की “हम दिल्ली से और गोलिया भेज देंगे, आप जीत के ही आ जाना। मम्मा आपण पाठवू शकतो ना गोळ्या?” सानवी सगळं प्लॅनिंग केल्यागत बोलली.

“हो ग बाई, पाठवू या. पण आता जरा गप्प बस. सोनाली आणि तू पत्ते खेळत बसा. मी तिला दटावले.”

ती गप्प झाली खरी. पण त्या पाच वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यात काय काय खदखदत होतं तिचं तिच जाणे !

“मम्मा मी ना आता या राखी पौर्णिमेला जवान अंकलच्या सचिनला राखी पाठवणार आहे.  मम्मा मी त्याची बहीण होऊ शकते ना?” तिने विचारले .

तिला गप्प बसण्यासाठी मी होकारार्थी मान हलवली.

दुपार झाली. दोघी झोपी गेल्या होत्या. डब्यात बरीच शांतता होती. जवान अंकल पण जरा खिन्न होऊन बसलेले दिसले. मधेच ते दुसऱ्या बोगीत गेले असावेत. कारण त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखेच तीन चार जवान गप्पा मारत आमच्या कंपार्टमेंटमध्ये आलेले दिसले. बोलता-बोलता सानवी कडं इशारा करत’ नन्हा फरिश्ता’ असं अंकल म्हणालेलं मी ऐकलंआणि मला खूपच समाधान वाटलं.

संध्याकाळ झाली. आमच्या हीरोइन कन्या का जाग्या होऊन जवान अंकल बरोबर हितगुज करत होत्या. तिने कागदावर अंकलचा पत्ता लिहून घेतला असावा. कारण ती सगळं काही विसरून आमचा पत्ता वगैरे त्यांना सांगत होती. माझे लक्ष गेलेले पाहिल्यावर माझ्या जवळ येऊन माझ्या कानात तिने हळूच सांगितले,

“जवान अंकल परके नाहीयेत आपलेच आहेत म्हणून त्यांना पत्ता दिला.”

मी शरणागतीच पत्करली कारण त्या वेडीला रागवण्यात आता काहीच अर्थ नव्हता.

फरीदाबाद आलं तशी आमची उतरण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली. मी, सोनाली फ्रेश झालो.  सानवीला पण बेसिन पर्यंत घेऊन येण्यास निघाले. तेवढ्यात तिचाच जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. ‘आता काय रामायण- महाभारत घडलं?’ विचार करत मी कंपार्टमेंट मध्ये गेले, पाहिलं तर खूप लोकांचा घोळका समोरचा सीन पाहत होता .

“अंकलss आप कारगिल मत् जाना….” सानवी रडत रडत म्हणत होती. आप दिल्ली स्टेशन पर उतर के सिधे अपने गाव चले जाना …. अंकल प्लीज्… अगर गलती से दुश्मन आपको मारेगा तो …..नही, नही पापा के बगैर सचिन कैसे जियेगा? भगवान जी सचिन को पापा और मुझे जवान अंकल हमेशा के लिए चाहिये। ….. जवान अंकल प्लीज “तिचे रडणे आणि हुंदके थांबतच नव्हते.

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈