सौ. प्रियदर्शिनी तगारे
अल्प परिचय
रसायनशास्त्र व शिक्षणशास्त्रातील पदवी. कथा , कविता व ललित लेखन.
मासिके व दिवाळी अंकासाठी नियमित कथालेखन. तीन कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या प्रकाशित. कथासंग्रहांना विविध लेखनपुरस्कार.
☆ जीवनरंग ☆ संगत ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे ☆
काकीनं रव्यासमोर काळा कळकट चहा ठेवला.
“त्याला बटर दे की” असं काकानं म्हणताच काकीनं रागानं बघितलं. आणि रव्यासमोर बटर आदळला. खरं तर रव्याच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता.पण काकीपुढं बोलणं शक्य नव्हतं.
गडबडीनं चहा पोटात ढकलून तो बाहेर पडला.नऊ वाजायला आले होते. पाच मिनिटं उशीर झाला तरी गॅरेजचा मालक तोंडाचा पट्टा सोडत असे. जीव खाऊन सायकल मारत तो गॅरेजवर गेला.
कोपऱ्यातला झाडणीचा बुरखुंडा उचलून त्यानं अंगण झाडलं. नळावरनं पाणी आणून शिंपडलं. तेवढ्यात मालक आला. गॅरेजचं कुलूप काढताच आतून डिझेल आणि आॅईलचा घाणेरडा वास नाकात घुसला. रव्याचं डोकं वासानं भणभणलं. दुपारपर्यंत जीव तोडून काम करून तो जेवायला घरी गेला. काकी झोपली होती. चुलीपुढं त्याच्यासाठी ताट वाढून ठेवलं होतं. ताटात दोन गारढोण भाकरी ,आमटीचं खळगूट आणि चिमटभर भात होता. आईच्या आठवणीनं रव्याच्या घशाशी आवंढा आला. आई दररोज त्याच्यासाठी मसालेदार भाजी , घट्ट डाळ असं चवीचं पोटभर जेवण करायची.
रव्याला ते दिवस आठवले. तो डोक्यानं हुशार होता. वडलांच्या माघारी चार घरी राबून आईनं त्याला वाढवलं होतं.बारावीपर्यंत तो चांगल्या मार्कांनी पास होत असे.आईला समाधान वाटे. आपला मुलगा खूप मोठा झाल्याची स्वप्नं तिला पडू लागली होती.
तो कॉलेजात गेला. त्याची दोस्ती पप्या आणि सागऱ्याशी झाली. मग दररोज कॉलेजच्या कट्ट्यावर बसून त्यांच्या टवाळक्या सुरू झाल्या.तास बुडवणं सुरू झालं. कधीतरी रव्याला आतून टोचणी लागे.तो वर्गात जायला निघाला की दोस्त म्हणायचे ,” अरे ,बस लेका.आलाय मोटा शिकणारा ”
असं होता होता रव्याचं आभ्यासातलं मन उडून गेलं. सलग दोन वर्षं तो नापास झाला.आणि कॉलेज सोडून घरात बसला.
आईनं मग त्याला तिच्या ओळखीनं एका घरी कामाला लावलं.अंगण झाडायचं ,गाड्या पुसायच्या. एवढं काम झालं की तो दोस्तांच्या कंपनीत रमायचा.त्या अड्ड्यावर मुलींच्या गप्पा निघायच्या.एकदा रव्या बोलला ,” मी काम करतो त्यांची पोरगी बेष्ट आहे. कपडे तर एकदम हिरॉईन सारके घालती रे”
यावर पप्या ओरडला ” अरे ,पटव ना मग तिला. आईशप्पत तुला सांगतो ;या पोरींना आपल्यासारकीच पोरं आवडतात बघ ”
हळूहळू रव्याला तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं.त्याचं मन चळलं.ती गाडी काढायला आली की तो मुद्दाम तिथं घुटमळायचा. रोज दोस्तांची शिकवणी चालूच होती.
त्यादिवशी ती लाल टी-शर्ट आणि तोकड्या स्कर्टमध्ये भन्नाट दिसत होती. रव्याच्या डोक्यात भडका उडाला. काही कळायच्या आत त्यानं तिला घट्ट मिठी मारली. क्षणार्धात ती ओरडली. घरातून तिचे आईवडील थावत आले.
त्यांनी रव्याला पोलिसच्या हवाली केलं. आईनं हातापाया पडून सोडवलं. पण त्यांनी अट घातली की पुन्हा या गावात हा दिसता कामा नाही. रव्याची रवानगी इथं काकाकडं झाली. काकीचा सासुरवास सुरू झाला. आणि गॅरेजचा कळकट वास कायमचा त्याच्या आयुष्याला चिकटला.
© सौ.प्रियदर्शिनी तगारे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈