मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चिटींग ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

 ? जीवनरंग ?

☆ चिटींग  ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

टेरेसमध्ये उभा होता तो उदासवाणा.

खाली बागेत रंगात आलेल्या मुलांच्या खेळाकडे पहात.

“Fire in the mountain” एकाचे सांगणे. “Run, run , म्हणत बाकीच्यांचे गोलगोल फिरणे,.

“Two” पहिल्याने सांगीतले. जोडी जमवण्यासाठी इतरांचे कोणालातरी ओढणे, कोणालातरी जाऊन भिडणे.

आपणही, तिला असच ओढुन जोडी जमली होती.त्याच्या चेहर्‍यावर मंद हसु.

“Fire in the mountain”.

“Run, run, run”

आता आवाज आला, “Four”

लवकरच, २, गोड, गोंडस, गोजिरवाण्या चिमण्या येऊन बिलगल्या होत्या आपल्या दोघांना. त्याचे जरा सुखावून, खुलेपणाने हसणे.

परत, “Fire in the mountain”

“Run, run, run,”

पहिल्याची सुचना, “Again Two”.

दोघादोघांची जोडी जमवण्यासाठी परत इतरांची धावपळ, जरा दमछाक.

आपल्याही दोन्ही चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या, बघता, बघता मोठ्या होऊन, उडून गेल्या. अगदी दूर, दूर–परदेशी. परत आपली दोघांची जोडी,. त्याच्या चेहर्‍यावर–कृतार्थतेचे स्मित.

फिरुन सुरु केले, “Fire in the mountain”.

“Run, run, run”.

आदेश आला- “One”

सवयीप्रमाणे कोणालातरी धरायला लागली,.गोंधळली. आणि, “One” चा अर्थ पटकन आपल्या लक्षात आला नाही ,म्हणुन आरडाओरड सुरु केली,  “Cheating, Cheating, it’s Cheating”.

अन्, त्याच्या मनात आले, आपणही एकटेच. अजुन पटत नाही.

कोरोना दोघांनाही झाला होता, आणि, अचानकच ती गेली.

दैवाने,आपल्या बरोबर केलेले हे-चिटींग च ना?

Yes, it’s Cheating.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈