सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

त्रिकोण -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

लिस्टप्रमाणे सगळं व्यवस्थित चेक करून सरलाने सगळ्या पिशव्या कपाटात नीट लावून ठेवल्या. कपाट बंद करून चावी ड्रॉवरमध्ये ठेवली आणि हुश्श करून ती सोफ्यावर बसली.

आताच काय तो निवांतपणा मिळाला होता. उद्या सगळी मंडळी आली की लग्नघर गजबजून जाणार.

सोहमचं -तिच्या धाकट्या मुलाचं लग्न तीन दिवसांवर आलं होतं. आमंत्रणं, खरेदी, केळवणं -सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या होत्या. आता परवा देवकार्याचा घाट.तसं मदतीला म्हणून ताई -भावजी उद्या येतीलच. शिवाय थोरला संकेत आणि त्याची बायको शाल्मलीही उद्यापासून राहायला यायचीयत. संकेत केव्हापासून सांगत होता, राहायला येतो म्हणून. पण शाल्मलीच्या मनात नव्हतं, इकडे राहायला यायचं. खरं तर, घरचं कार्य म्हटल्यावर थोरल्या सुनेने जबाबदारीने काही करायला नको का?

त्यांच्या लग्नाच्या वेळी सरलाने किती स्वप्नं बघितली होती!पहिल्यापासून सरलाला मुलीची हौस  आणि झाले मात्र दोन्ही मुलगेच. त्यामुळे संकेतचं लग्न ठरलं, तेव्हा सरला अगदी हरखून गेली होती. सून नव्हे, तर मुलगीच घरी येणार असल्यासारखी, ती त्यांच्या लग्नाची वाट बघत होती.

पण लग्न होऊन शाल्मली घरात आली मात्र…..!जाऊ दे. नकोत त्या आठवणी. आता वेगळ्या घरी का होईना, सुखाने नांदताहेत ना दोघं!मग झालं तर.

सोहमचं लग्न ठरल्यापासून सुरेशराव मात्र सरलाला सारखे डोस पाजत होते -‘मोठीशी पटवून घेता आलं नाही, आता धाकट्या सुनेला तरी सांभाळ.’

नवऱ्याने असं म्हटलं की सरला चिडायची.

‘काय बाकी ठेवलं होतं हो मी पटवून घ्यायचं? सगळं अगदी तिच्या मनासारखं होऊ दिलं. माझ्या मनाला सतत मुरड घातली. सासू असूनही प्रत्येक गोष्टीत मीच तडजोड केली. पण तिलाच नको होतं ना, सासरच्या माणसांत राहायला.’

त्या आठवणीने आताही सरलाचे डोळे भरले. तिने चष्मा काढून डोळ्यांच्या कडांशी जमलेलं पाणी पुसलं.

तेवढ्यात सोहम आला.

‘आई, पुढे सरक ना.’

सरला थोडीशी सरकली.

‘आणखी सरक. सोफ्याच्या टोकाला जाऊन बस.’

‘एवढी जागा लागते तुला बसायला?’

‘अं हं. बसायला नाही, झोपायला.तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय.’

‘अरे सोहम, लहान का आता तू? परवावर लग्न आलंय.’

‘म्हणूनच तर आता झोपतोय. उद्या सगळी पाहुणेमंडळी जमतील.म्हणजे तू बिझी. आणि सुनबाई आल्यावर तर काय? सासूबाई मुलाच्या वाट्याला तरी येतील की नाही,शंकाच आहे. वर्षा -दोन वर्षांनी तर आजीच्या मांडीवर नातवंडांचाच हक्क.’

नेहमीची सरला असती, तर तिने चिडवायलाच सुरुवात केली असती – ‘काय रे सोहम? आतापासूनच….’

पण आज सरला गप्पच होती.

‘काय झालं गं, आई?’

‘काही नाही रे.’

‘तरीपण….’

‘खरंच काही नाही.’

‘खरं सांग, आई. आमच्या एंगेजमेंटपासून बघतोय -तू थोडी गंभीर झाली आहेस. आणि गेले आठ -दहा दिवस तर…..’

‘अरे, आमंत्रणं, खरेदी यांनी दमायला होतं रे.’

‘बस काय, आई! हे सगळं लोकांना खरं वाटेल. मी पहिल्यापासून बघतोय ना तुला. एखादं फंक्शन असलं की किती उत्साहात असतेस!त्या उत्साहामुळे चार माणसांचं बळ येतं तुझ्या अंगात.’

‘वय वाढतंय रे आता…’सोहमच्या केसातून हात फिरवत सरला म्हणाली.

सोहम उठून बसला.

‘आई, एक विचारू? खरंखरं सांगशील?’

‘काय?’

‘खरं सांग. तुला समिधाचं टेन्शन आलंय का?’

‘नाही रे. तिचं कसलं टेन्शन?’

‘अगं, हरकत नाही ‘हो’ म्हणायला. खरं सांगायचं, तर मलाही आलंय टेन्शन.’

‘काssय?’प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखी सरला किंचाळली.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments