सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ त्रिकोण -भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(होणाऱ्या पत्नीचं मलाही टेन्शन आलंय असं सोहमने म्हटल्यावर सरलाला धक्काच बसला…. आता पुढे )
‘खोटं नाही सांगत. खरंच अगं. मलाही टेन्शन आलंय. आता हेच बघ ना. सध्या घरात आपण इनमिनतीन माणसं. बाबा तसे स्वतःतच असतात. आपल्या दोघांचं कसं मस्त चाललं होतं!दादा बोरिवलीला राहायला गेल्यापासून तर ‘तू फक्त माझीच’ असं मला वाटायचं. एकंदरीत छान चाललं होतं आपलं. पण आता समिधा येणार म्हटल्यावर शांत पाण्यात खडा टाकल्यासारखं वाटतंय. ती आपल्या घराशी कितपत ऍडजेस्ट होईल?’
‘खरं सांगू, सोहम?मलाही तीच भीती वाटतेय. शाल्मलीचं किती कौतुक केलं होतं मी!ऑफिसमधून दमून येणार, भूक लागलेली असेल, म्हणून सगळा
स्वयंपाक तयार ठेवायचे मी. बाकीच्या बायकांसारखी, सून येऊन मदत करील, अशी वाट कधीच बघितली नाही. तर हिचं आपलं भलतंच. भूक नाही म्हणायचं आणि आपल्या खोलीत निघून जायचं. मागचं आवरणं तर सोडाच, पण एवढं शिजवलेलं अन्न -सासू काय करते त्याचं? हेही नाही. रोज फुकट कुठे घालवणार, म्हणून फ्रीझमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी…..’ बोलताबोलता सरलाला रडूच आलं.
‘तू तिला कधी सांगितलं नाहीस, आई, की रात्री जेवायला नसशील तर आधीच फोनवर कर, म्हणून?’
‘सुरुवातीला मी गप्प राहायचे रे -उगीच भांडण नको म्हणून. शेवटी न राहवून म्हटलं तसं. तर म्हणाली -रात्री भूक लागणार की नाही, ते संध्याकाळी कसं कळणार?’
‘आणि दादा?’
‘तो बिचारा कधी मध्ये नाही पडला हं. तो आपला आमच्याबरोबर जेवायला बसायचा. पण बायको जेवत नाही, म्हटल्यावर यालाही जेवण जायचं नाही. एखादी चपाती खाल्ल्यासारखं करायचा आणि ताटावरून उठायचा.’
‘कित्ती गं भोळी माझी आई!’सोहमने तिला जवळ घेतलं- ‘अगं, तोपण तिच्याबरोबर खाऊन येत असणार. पण वाद नको, म्हणून तुमच्याबरोबर थोडंसं जेवायचा.’
‘असेल, असेल. तसंही असेल. माझ्या मात्र हे लक्षात आलं नव्हतं हं कधी. बाकी संकेत हाडाचा गरीबच हं. कधी बायकोच्या बाजूने ‘ब्र’सुद्धा काढला नाही तोंडातून.’
‘आई, एक विचारू? आजीचं आणि तुझं कधी वाजायचं का गं? आणि मग बाबा कोणाची बाजू घ्यायचे?’
‘ते वाजणंबिजणं तुझ्या आजीच्या बाजूनेच व्हायचं. मी आपली गप्प राहून मुळुमुळु रडत बसायचे. कधी एका शब्दाने उलट उत्तर केलं नाही त्यांना.’
‘आणि बाबा?’
‘तेही बिचारे मध्ये पडायचे नाहीत-संकेतसारखेच. सासू-सून काय ते बघून घ्या म्हणायचे.’
‘तू का नाही बोलायचीस काही?’
‘एक म्हणजे त्या मोठया आणि दुसरं म्हणजे मी त्यांच्या घरी आले होते ना? म्हणजे तडजोड मलाच करावी लागणार. तशी बऱ्याच बाबतीत तडजोड केली मी. पण त्या दोघांच्या कधी लक्षातच आलं नाही.’
‘हेच, हेच म्हणतो मी, आई. आपल्या मनात जे असतं, ते आपण बोलून दाखवत नाही. आपण न बोलताच समोरच्याने आपल्या मनात काय आहे, ते समजून घ्यावं, अशी अपेक्षा करतो. हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. लॅक ऑफ कम्युनिकेशन. सुसंवादाची उणीव. मी तुला आत्ताच सांगून ठेवतो, आई. तुझ्या मनात माझ्याबद्दल, समिधाबद्दल काहीही असलं, तरी तू मोकळेपणाने आम्हाला -निदान मला तरी सांग.’
‘म्हणजे सुनेच्या कागाळ्या….’
‘नाही गं. हा ‘कागाळी’ शब्द आहे ना, तोच बिथरवून टाकतो आपल्याला. त्याऐवजी,’संवाद’ म्हण,’सुसंवाद ‘ म्हण.आता, माझं काही चुकलं, तर तू सांगतेसच ना मला? त्याच मोकळेपणाने नंतरही सांग. आणि हेच मी समिधालाही सांगणार आहे.’
‘नको हं. उगीच एकाचे दोन….’
‘हेच ते. तू असा नकारात्मक विचार का करतेस? नकारात्मक विचारांमुळे आपल्या वागण्यालाही नकारात्मक पदर येतात आणि समोरच्या माणसांचे रिस्पॉन्सेसही नकारात्मक मिळतात.’
‘तू बोलतोयस, त्यात तथ्य वाटतंय हं.’
‘हो ना? मग आतापासून पॉझिटिव्ह विचार कर. म्हणजे तुझं वागणंही पॉझिटिव्ह होईल आणि त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रियाही पॉझिटिव्हच असतील.’
सरलाने डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. सोहमचं बोलणं पटल्याचीच खूण होती ती. आईचं टेन्शन नाहीसं झालेलं पाहून सोहमलाही बरं वाटलं.
क्रमश:….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈