जीवनरंग
☆ आठवते ती रात्र ☆ सौ. स्नेहलता सुभाष पाटील ☆
रात्रीचे अकरा वाजले होते. विश्रामबाग रेल्वे स्टेशन वरचा प्रसंग. प्रवाशांची गडबड, हमालांची लगबग, उतारुंची घाई, फेरीवाल्यांची बडबड,सगळ्या गोंगाटात राधा मात्र छोट्याशा बॅगेचे ओझे वागवत स्टेशनवर उभी होती. रात्री साडे अकरा च्या रेल्वेने ती कायमची सांगली सोडून जाणार होती तिचं प्रेम टिकवण्यासाठी तिने हे धाडस केलं होतं तिच्यासोबत केशवही हे गाव सोडून जाणार होता त्याच्या विश्वासावरच तिने हा धाडसी निर्णय घेतला होता.त्याची वाट पाहत बसली होती.त्याने वचन दिले होते, “तू स्टेशन वर ये.मी तुझ्या आधीच तिथे असेन.आपण दोघेही दुसरीकडे जाऊन आपला सुखी संसार थाटू “.ती विचारात गढून गेली होती. हातातील घड्याळाकडे लक्ष गेले 11:25 झाले. केव्हाही रेल्वे येईल.केशवचाअजून पत्ताच नाही. “कुठे अडकला असेल?”
इतक्यात साडेअकराची ट्रेन आली.पण केशव काही आला नाही.ती त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होती. मन नाना शंकांनी घेरलं होतं.नको ते विचार येत होते. ट्रेन निघून गेली. ती त्याची वाट पाहत तिथेच बसून राहिली. मन भूतकाळात धावू लागलं.चित्रपटाप्रमाणे सगळ्या आठवणी नजरेसमोर फेर धरू लागल्या.
राधा “शांतिनिकेतन “कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती.दिसायला सुंदर आणि हुशार.अशी राधा स्वभावाने समंजस आणि गुणी मुलगी होती. तिथेच असलेल्या छोट्या वस्तीवर ती राहत होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले होते.घरी आई,मोठा भाऊ आणि ती. एवढेच त्यांचे कुटुंब. भाऊ काही शिकत नव्हता.पण ती हुशार आहे म्हणून आईने तिला खूप शिकवायचं ठरवलं होतं.दिवसभर मजुरी करून आई तिच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. भावाला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याच्यावर कशाचीच जबाबदारी नव्हती.तिने ठरवले होते की खूप शिकून चांगल्या पगाराची नोकरी करायची आणि आईलाही सांभाळायचं. सर्व काही सुरळीत चालू असताना तिच्या आयुष्यात आला “केशव”.
तोसुद्धा त्यांच्याच वस्तीवर राहायला आला होता. नव्याने तिथे राहायला आले होते त्यांचे कुटुंब. त्याला आई-वडील आणि एक बहीण होती.त्याची परिस्थिती जेमतेमच होती.त्याने त्याच कॉलेजमध्ये ATD कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. चित्रकलेत त्याची खूप आवड होती म्हणून त्याने ही शाखा निवडली.चित्र ही खूप सुंदर काढायचा.दिसायला देखणा, सालस,आणि हुशार मुलगा होता तो.
बघता बघता दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.तो तासंतास तिची चित्र काढायचा.हळूहळू दोघांच्या घरात ही गोष्ट कळाली. तिच्या भावाने तर तिला खूप मारले.तिला बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली.फक्त बारावीची परीक्षा होईपर्यंत तिला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली. निकाल लागला त्या दिवशी तिची केशवशी भेट झाली आणि त्या दोघांनी हा निर्णय घेतला.
रात्रीचे तीन वाजले होते. ती विचाराच्या तंद्रीतून बाहेर पडली. तिच्या लक्षात आले आपण एकटेच आहोत.केशव तर आलाच नाही.त्याने आपल्याला फसवले.
पण इतक्यात तिला आई आणि भाऊ समोरून येताना दिसले. तिने काही बोलायच्या आतच आईच्या हाताचा जोरदार फटका तिच्या गालावर पडला.या दोघांनी तिला घरीं नेऊन खूप मारले.आणि दोनच दिवसात तिच्याच नात्यातील मुलाशी लग्न लावले. तो मुंबईत बँकेमध्ये शिपाई होता. तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता.
ती हुशार होती.तिला पुढे शिकायचे होते. तिने नवर्याला खूप समजावून सांगितले.आणि म्हणून त्याने तिला परत सांगलीतच डीएड ला ॲडमिशन घेऊन दिले .ती सांगलीत दोन वर्षासाठी राहायला आली.
दिवसभर केशवला शोधायची आणि संध्याकाळी घरी यायची. आठ दिवस तिने त्याचा शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही.सगळ्यांनी सांगितले की तो गाव सोडून गेला पण कुठे गेला कोणालाच कळले नाही.
शेवटी तिने मनाला समजावले,”आता हेच माझ आयुष्य “.त्याच्याशिवाय आयुष्य काढायला लागली. तिने खूप मन लावून अभ्यास केला आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. तिला नंतर मुंबईमधील कल्याण येथील प्राथमिक शाळेत नोकरी लागली. दोनच वर्षात तिने एक आदर्श शिक्षिका म्हणून मान मिळवला.आता भूतकाळात न रमता वर्तमान काळात जगण्याचा निर्धार केला आणि मनापासून संसारात रमली.एक मुलगा व एक मुलगी आणि नवरा असे चौकोनी कुटुंब ती प्रामाणिकपणे सांभाळू लागली. नवऱ्याची म्हणावी तशी साथ मिळाली नाही.त्यांचे स्वभावही कधी जुळलेच नाहीत. पण” लग्न म्हणजे तडजोड “या उक्तीनुसार तिने वीस वर्ष संसार केला.पण केशव अधून मधून मनात डोकावत होता. त्याला ती विसरू शकली नव्हती.
अचानक एक दिवस तिला व्हाट्सअप वर मेसेज आला,” हाय राधा,ओळखलेस का ?”डीपी पाहिला तर लक्षात आले,” अरे हा तर केशव “तिने पटकन तो नंबर ब्लॉक केला. पण मन काही ब्लॉक होत नव्हते.,”त्याने का मेसेज केला असेल?”,” इतक्या वर्षांनी त्याला काय बोलायचं असेल ?”,”तो कोणत्या संकटात तर नसेल ना ?”अशा नानाविध प्रश्नांनी मन गोंधळून गेले होते.
कोणतीही स्त्री पहिले प्रेम कधीच विसरू शकत नाही.वीस वर्ष आठवणींचं ओझं मनावर घेऊन ती जगत होती. आज वेळ आली होती ते ओझ उतरवण्याची..अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची.”का असं वागलास?” याचा जाब विचारण्याची. दोन दिवस असेच गेले शेवटी. तिने ब्लॉक काढला आणि फोन लावला.तिकडून आवाज आला,” हॅलो मी केशव, राधा,मला तुला भेटायचं आहे.” तिलाही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची होती. भेटीचे ठिकाण ठरले आणि दोघे भेटले सुद्धा.
त्यानेच बोलायला सुरुवात केली. वडील आजारी होते.त्या दिवशी रात्रीच वडिलांना ऍडमिट करावे लागले. त्यांना अटॅक आला होता. ते आयसीयूमध्ये ऍडमिट होते. म्हणून मी येऊ शकलो नाही. नंतर तुझ्या भावाने दमदाटी केली. आम्ही गाव सोडून गेलो. वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न झाले.आज मी चित्रकलेचा शिक्षक आहे.मला दोन मुले आहेत.पण मी एकही दिवस तुला विसरलो नाही.
केशव म्हणाला,”राधा नको ही घुसमट.”,”आपण पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करायची का ?” राधा म्हणाली, “हो करूया की! नक्कीच.” पण त्या आधी माझे ऐक.
केशव,” प्रत्येकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मुली बरोबर संसार करता येत नाही.पण ती ?व्यक्ती कायमची तुमची झाली नाही तर काय बिघडलं,ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे. खूप छान मैत्रीण म्हणून हे काय कमी ग्रेट फीलिंग आहे.?
“मग आज पासून चांगला मित्र होणार ना माझा”.
“पुन्हा आपली नवीन ओळख
आपण नव्याने भेटल्यावर
जुनी ओळख पुसून गेली
ओल्या पापण्या मिटल्यावर.”
********
© सौ. स्नेहलता सुभाष पाटील
विटा.सांगली
मोबा_८३२९०५६१६९.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈