श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ अश्रू …भाग 1☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
रखमाला काही कळत नव्हते. रोज गप्प गप्प असणारा पप्या आज बाहेरून आला तो खुशीत दिसत होता. नेहमीच स्वतःच्या विचारात गुरफटलेला पप्या आज मात्र चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचे समाधान दाखवत घरात फिरत होता. नक्कीच काहीतरी विशेष घडले असणार त्याशिवाय पप्या एवढा मोकळा वागला नसता आणि काही वेळाने रखमाच्या कानावर बातमी आली ‘पप्याचा बाप मेला’.
पप्या रखमाचा पहिल्या नवऱ्यापासून म्हणजेच म्हादबाकडून झालेला मुलगा. गावाच्या वेशीबाहेर म्हादबा आणि रखमाचे झोपडे होते. तीन ते चार जण जेमतेम झोपू शकतील एवढीच काय ती झोपडीची जागा. म्हादबाचे रखमावर खूप प्रेम. दिवसभर गावात जाऊन काम करून म्हादबा संध्याकाळी घरी येऊन रखमा बरोबर सुखाचे दोन घास खात होता. रखमाही म्हादबाला जे काही आवडते ते बनवून खायला घालत होती. सुखाने चाललेल्या त्यांच्या संसाराला पप्याच्या रूपाने पालवी फुटली. दोघेही पप्याला खूप शिकवून त्याला मोठे करण्याची स्वप्ने बघत असताना त्यांच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आणि म्हादबाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. रखमाला दोन वर्ष्याच्या पप्याला मोठा करण्यासाठी तिच्या मामाच्या ओळखीच्या सदू बरोबर दुसरे लग्न करावे लागले.
सदू रखमापेक्षा पाच वर्षाने मोठा तर होताच पण काहीही काम करत नव्हता. दिवसभर दारू ढोसून कधी घरातच नाहीतर दारूच्या अड्ड्याच्या जवळच कुठेतरी पडलेला असायचा. रात्रीच्या जेवणाच्या वेळेला मात्र तो घरात जेवायला यायचा आणि रखमाने काही बनविले नसेल तर रखमाला मारहाणही करायचा. कसेबसे पप्याला सांभाळून रखमा गावात जाऊन दोन चार उणीधुणी करून घर चालवत होती. रात्री सदू आला की काही ना काही कारणाने आरडाओरडा करून रखमाला मारहाण हे रोजचेच झाले होते. एक वर्षा नंतर छोटीचा जन्म झाला. रखमाला आता दोन जीवांचा सांभाळ करावयास लागत होता. झोपडीच्या मागच्या बाजूला एक पडीक जागा होती तिथे रखमानी पालेभाज्या लावून, त्यांची मशागत करून, त्या गावात जाऊन, विकून त्याच्यावर गुजराण करावयास सुरवात केली. सदूचा रोजचा त्रास चालूच होता. रखमा कडे दारूसाठी पैशाची मागणी आणि त्यासाठी तिला मारहाण हे रोजचेच झाले होते. पप्या लहान होता पण त्याच्या डोळ्यात सदूबद्दलचा राग दिसत होता. लाल झालेले डोळे मोठे करून स्वतःचेच ओठ चावण्यापलीकडे त्याला काहीही करता येत नसे.
पप्या जसा मोठा होत गेला तसा घुम्या होत गेला. शाळा नाही, दिवसभर घरात नाहीतर रखमाच्या मागे असायचा. रखमा पालेभाजी विकायला गावात गेली की छोटीला सांभाळायची जबाबदारी पप्यावर येत असे. रोज रात्री सदू आला की रखमाला मारहाण ही ठरलेलीच असायची तेंव्हा छोटीला सांभाळायचे कामही पप्याच करायचा. तिला आपल्या मांडीवर थोपटून झोपवायचे हे त्याचे काम आता नित्यच झाले होते. छोटीवर त्याचे विलक्षण प्रेम होते. दिवसभर तिला तो मायेने सांभाळत तिची तो खूप काळजी घेत असे. पप्याला समज यायला लागली तसा त्याचा घुमेपणा वाढला. कोणाशीही न बोलता तो स्वतःशीच मग्न असायचा. त्याला मित्र तर नव्हतेच पण तो रखमाशीही फारसा बोलायचा नाही. बापाचे, हो. पप्याला जेंव्हा पासून समजायला लागले तेंव्हापासून सदूला तो बाप ह्या नावानेच संबोधित होता. तर बापाचे हे रोज रात्रीचे नाटक बघून बापाचा त्याला खूप राग यायचा. रखमाला बापाच्या त्रासातून बाहेर काढावयासे त्याला नेहमीच वाटत असे पण त्याचे लहान वय आणि कमजोर शरीर ह्यामुळे त्याची कुचंबना होत असे. लहान असल्यापासून पप्याचे डोळे मात्र नेहमीच कोरडे असायचे. त्याच्या डोळ्यात रखमाला कधी अश्रू दिसले नाहीत, की अश्रू डोळ्यातून बाहेर पडे पर्यंत सुकून जायचे हे काही रखमाला कळले नाही.
वर्षांमागून वर्षे जात होती. शाळेत न जाता परिस्थिती जे शिकवत होती ते पप्या शिकत होता. घरातल्या पाळीव कुत्र्यांवर आपला जीव ओवाळून टाकत होता. भटक्या गुरांना खायला घालत होता. माणसांपासून दूर राहून मुक्या प्राण्यांशी मूकपणे संवाद साधत होता. त्यांच्यामध्येच राहून प्रेमाने त्यांना आपलेसे करत होता पण त्याचा घुमेपणा, एककेंद्री राहणे आणि अबोलपणा काही गेला नाही.
क्रमशः …..
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈