मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ छोटुली – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागी भागात आपण पाहीलं – तिच्या चाहर्‍याचे भाव सुरांच्या  आरोहा-अवरोहाबरोबर असे काही बदलत जातात, जसं काही कुणी या बदालाचा रिमोटच तिच्या मेंदूत बसवून ठेवलाय आणि बटण दाबताच एकामागून एक मनमोहक भाव तिच्या चेहर्‍यावर उमटू लागतात. – इथून पुढे )

दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर एकदाचं छोटुलीच नाव पुकारलं गेलं आणि ती आईबरोबर मंचावर गेली. आईने तिला मंचावर सोडलं आणि ती मागे जाऊन उभी राहिली. मोठ्या मंचावर ठेवलेल्या तीन खुर्च्यांवर बसलेल्या तीन लोकांनी तिचं स्वागत केलं. प्रतिभावंत मुलांची निवड करणारे ते तिघे जज्ज होते. छोटुलीला तिचं नाव विचारलं गेलं. तिचं वय विचारलं गेलं. तिने नि:संकोचपणे उत्तर दिलं. तिचा जोरदार आवाज तिचा आत्मविश्वास प्रगट करत होता.  काही क्षणातच तिच्यासाठी म्यझिक सुरू झालं. ती पापणीही न लावता तिकडे बघत राहिली, जसं काही तिला हा प्रश्नच विचारला गेलाय. तिला त्याचं उत्तर द्यायचय आणि ती विचार करते आहे, बोलायचय आपण? ती अगदी गप्प उभी राहिली. कसलीच हालचाल न करता. गाणं बंद झालं. आईने तिच्याजवळ येऊन तिच्या कानात काही सांगितलं, तेव्हा तिने मान हलवली. पुन्हा एकदा गाणं लावलं गेलं आणि ती नाचू लागली. अगदी मोकळेपणाने नाचू लागली. तिच्या मनात जे जे येईल, तसतसं करू लागली. तिच्यासाठी आपली खुशी प्रगट करण्याचा तो एक मार्ग होता. दिवसभरची रांगेतील धक्काबुक्की, आणि अनेक प्रकारचे प्रतिबंध यामुळे ती वैतागली होती. आपला पदन्यासाचा शौक या मंचावर तिने मनसोक्त पुरा करून घेतला.

गाणं थांबताच ती पळत पळत आपल्या आईकडे गेली. परीक्षकांचे हावभाव पहाण्यासाठी, सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. परीक्षक गप्प होते. चकित झाले होते.  जे आत्ता मंचावर पाहिलं, ते काय होतं? कसली जादू होती की चमत्कार. एक छोटीशी मुलगी … तिच्या चेहर्‍यावरचे भाव आणि पायांचं थिरकणं यातलं सामंजस्य विलक्षण होतं. अगदी अविश्वसनीय. एकदा नृत्य काय केलं, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पाच वर्षाच्या मुलीची लवचिकता कुठल्याही कसलेल्या नृत्यकाराची बरोबरी करत होती. 

त्या शांततेनंतर किती तरी वेळ टाळ्या वाजत राहिल्या. शोसाठी या मुलीची निवड होणारच, असंच त्या जणू सुचवत होत्या.

आता आई आणि वडील या दोघांना मिळून योजना बनवायची होती की छोटुलीजवळ कोण राहू शकेल? दोघांना रहाणं काही शक्य नव्हतं. शेवटी छोटुलीच्या वडलांनी ही जबाबदारी छोटुलीच्या आईवर टाकली आणि ते निघून गेले. चांगल्या हॉटेलमधल्या खोलीत रहाणं तिच्या आईसाठी स्वर्गसुखासारखं होतं॰ ती विचार करायची, मुलगी पुढे जावो, न जावो, पण जितके दिवस माय-लेकी इथे रहातील, तोपर्यंत मजा करतील. आई काम करायची खरी पण काम असंही नव्हतं की सुट्टी मिळू शकणारच नाही. बिनपगारी रजा घेणं काही अवघड नव्हतं. या संधीपुढे  तिच्या छोट्याशा नोकरीचं काही खास महत्व नव्हतं. ‘आज खाया वही मीठा, कल किसने देखा है’, हाच तिचा अगदी पहिल्यापासूनचा विचार होता आणि ती ‘आज’च्या आव्हानासाठी मनाने तयार होत होती.

चॅनेलतर्फे अनेक निर्देशांची यादी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. शोमध्ये सामील होणं हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती, त्यामुळे शोच्या कुठल्याही नियमांचं पालन करण्यात, त्यांना कुठलीच अडचण जाणवत नव्हती. एकदा मुलीने प्रस्तुतीकरणात सामील होऊन नंतर जरी ती बाहेर पडली, तरी त्यांच्या दृष्टीने ते पुरेसं होतं. जसजशी ती मोठी होईल, तसतसा तिची भविष्याची दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने, हा मजबूत आधार असेल॰ एक नवं पाऊल, नव्या आशेसह टाकलेलं…. त्यातून पुढल्या वाटचालीची रूपरेखा निश्चित करता येईल.

यानंतर छोटुलीला पुढच्या दोन आठवड्यातील दोन एपिसोडमध्ये नृत्य करायचं होतं पण आपल्या मनासारखं नाही, यात सल्लागार किंवा मार्गदर्शक सांगतील तसं करायचं होतं. प्रथम तर तिला कळलंच नाही की हे सल्लागार कोण आहेत? त्यांच्याकडे जायला ती का कू करू लागली. पण हळू हळू तिची त्यांच्याशी चांगली दोस्ती जमली आणि मग गमतीने ती आपल्या त्या सल्लागारांना, आपल्या गुरूंना ‘सल्लू’ म्हणू लागली. नाचायचं म्हणजे नाचायचं. मनसोक्त नाचायचं पण आता तिला त्यासाठी आपल्या गुरूबरोबर ताळ-मेळ ठेवायला हवा होता. तिच्या दृष्टीने हे सगळं अस्वाभाविक होतं पण काही तरी नवीनदेखील होतं, जे तिला छान वाटत होतं.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- [email protected]

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈