श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ छोटुली – भाग 3 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागी भागात आपण पाहीलं – तिच्या दृष्टीने हे सगळं अस्वाभाविक होतं पण काही तरी नवीनदेखील होतं, जे तिला छान वाटत होतं. आता पुढे)
‘सल्लू’च्या कडक सूचना, वारंवार आरशात बघून आपल्या चेहर्यावरचे भाव दाखवणं तिला छान वाटत होतं आणि ती मजेत शिकत होती. जेव्हा ती थकायची किंवा तिला भूक लागायची, तेव्हा मग ती काहीच नीट करत नसे. ‘सल्लू’ जाणून होता की हे सगळे नियम, अडकाठ्या या मुलीसाठी नवीन आहेत. तोदेखील चोवीस-पंचवीस वर्षाचा तरुण होता आणि आपल्या करियरला या शोद्वारे नवीन परिमाण देऊ इच्छित होता. हळू हळू, त्या छोट्या मुलीची मन:स्थिती त्याच्या लक्षात आली आणि कुठल्याही प्रकारे धाक-दपटशा न दाखवता, मजेत तो तिला शिकवू लागला.
छोटुली, आपली आई, ‘सल्लू’ आणि तिच्या आगे-मागे कॅमेरे घेऊन धावपळ करणारे लोक यांचं ऐकायची, पण थकायची, पाय दुखायचे. भूक लागायची. खेळावसं वाटायचं. नाचावसं तर वाटायचंच वाटायचं, पण आपल्या मानाप्रमाणे. एका मागोमागच्या रिहर्सलनी तिच्या नाकात दम आणला होता. रिहर्सल एकदा नव्हे, दिवसातून किती तरी वेळा व्हायची. पार पार थकून जायची ती. तिला चीड यायची अशा रिहर्सल्सची. तिला चीड यायची ती चकमक कपड्यांची.
आई म्हणायची, ‘बस, आता हा एकच एपिसोड.’ पण हा एकच एपिसोड पुढे… पुढे… पुढच्या तीन महिन्यांपर्यंत चालतच राहिला. आईने तिला कधी लॉलिपॉप देऊन, कधी मनपसंत खेळणी देऊन, तिला फूस लावून, फुलवत- झुलवत ठेऊन, शोपूर्वी तयार ठेवलं. अनेकदा तिने आईसक्रीमसाठी हट्ट केला, पण तो मात्र तिने पुरवला नाही कारण आईसक्रीम खाऊन ती आजारी पडली असती, तर बरं व्हायला तीन-चार दिवस तरी लागले असते आणि मग शोचं सारं गणितच गडबडून गेलं असतं.
एका मागून एक शोच्या पायर्या चढत ती अंतीम फेरीपर्यंत येऊन ठेपली. आईसाठी आणि मुलीसाठीही हे सांभाळून ठेवण्याचे महत्वाचे दिवस होते. छोटुली इथे जेव्हा आली, तेव्हा जशी होती, तशीच आजूनही आहे पण आईच्या मात्र चालण्या- बोलण्या- वागण्यात खूप रुबाब आला आहे. मुलीची वाढती कीर्ती तिच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत गेलीय. असं जेवण – खाण, असा थाटमाट पुन्हा कुठे मिळणार होता तिला? ज्या सामर्थ्यावर मुलगी इथपर्यंत येऊन पोचली होती, त्याच आधारावर आईचा गौरव वाढत चालला होता. मंचावर गेल्यावर मुलगी, लाजेल किंवा घाबरेल, किंवा स्टेप्स विसरून जाईल, अशी वाटणारी धाकधूक या अंतीम फेरीपर्यंत दृढ विश्वासात बदलली होती. मागच्या सार्या एपिसोडमधील तिचं सादरीकरण आणि परीक्षकांच्या प्रतिक्रिया यामुळे आईला खात्री वाटू लागली होती की छोटुलीच जिंकणार. दररोज फोन करून ती वडलांना प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट सांगत असे. अंतीम फेरीसाठी तेही इथे येऊन पोचले.
आई-वडलांचा उत्साह पराकोटीला जाऊन पोचला होता. आई वारंवार मुलीला संगत होती, ‘आज छान डान्स कर. मग उद्यापासून तुला जे करायचं असेल, ते कर. मग आपण आपल्या घरी जाऊ. खूप खेळू. मजा करू.’
आजचा दिवस सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. सगळ्यांचं भाग्य अजमावण्याचा दिवस होता. शोच्या अॅंकरपासून कॅमेरावाले, सफाई कामगार, चहा आणणारा पोर्या, सगळे काय होतय, ते बघण्यासाठी उत्सुक होते. सगळ्यांना मोठमोठ्या रकमा मिळणार होत्या. सगळ्यात मोठी रक्कम अर्थातच विजेत्याला मिळणार होती. जिंकणारी रक्कम डोळ्यापुढे ठेवून छोटुलीच्या आई-बाबांनी किती तरी स्वप्ने रंगवली होती. आजची एकूण चकमक, दिमाख काही वेगळाच होता. फायनलला आलेल्या चार स्पर्धकांमध्ये छोटुली सगळ्यात लहान आहे, सगळ्यात चांगली नर्तक आहे, हे सगळेच जाणून होते. तिच्या चाहर्यावरचे भाव, तिचे बोलके डोळे, नयन विभ्रम जे काही सांगायचे, ते बेजोड असायचं. सगळ्यांना वाटत होतं, तीच पहिली येणार. तीच विजेती होणार.
त्यामुळेच चॅनेलने तिला डोक्यावर बसवलं होतं. तिला विचारलं गेलं की आई-वडलांव्यतिरिक्त ती आणखी कुणाला बोलावू इच्छिते? तिने जराही विलंब न लावता उत्तर दिलं होतं की ती आपल्या छोट्या दोस्ताला अविनाशला बोलावू इछिते. त्या क्षणापासून उतावीळ होऊन ती अविनाशाची वाट पाहू लागली. त्या क्षणापासून उतावीळ होऊन ती अविनाशाची वाट पाहू लागली.
क्रमश:….
मूळ लेखिका – डॉ. हंसा दीप
Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada
Ph. 001 647 213 1817 Email- [email protected]
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈