? जीवनरंग ?

☆ एक कटिंग असाही – भाग 1 ☆ सुश्री समिधा ययाती गांधी ☆ 

(हृदयस्पर्शी व्याख्या “लंगोटी यार” ची)

सकाळी सकाळी मला फोन आला.

“नमस्कार. आपण भास्कर आपटे बोलताय का?”

“नमस्कार, मी भास्कर आपटे बोलतोय. आपण कोण बोलताय?”

“काका, तुम्ही सुरेश कामतांना ओळखता ना? मी त्यांचा मुलगा बोलतोय. “

” कोणाचा मुलगा?”

” सुरेश कामतांचा. बाबा म्हणाले की तुम्ही कॉलेजात असताना जिगरी दोस्त होतात. “

” हो. होतो आम्ही जिगरी दोस्त. पण आता त्याचे काय. आमची मैत्री मोडून पण चाळीस वर्षे झाली. आता आम्ही कित्येक वर्ष भेटलेलो सुद्धा नाही. “

” हो. बाबा नेहमी तुमच्या आठवणी सांगायचे. तुम्हाला कॉलेजचे जय वीरू म्हणायचे ना? “

सुरेशाच्या मुलाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडत होते खरे पण मी पूर्णपणे भूतकाळात शिरलो होतो. एखादा सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये पहावा तसे माझे बालपण माझ्या नजरेसमोर येत होते.

मी आणि सुरेश काही दिवसांच्या फरकाने एकाच चाळीत जन्माला आलो. आमची मैत्री आधी झाली मग कधीतरी आम्ही चड्डीची नाडी बांधायला शिकलो. इतक्या लहानपणापासून आम्ही दोघे एकत्रच असायचो. एकमेकांशिवाय आमचे पान हलत नसे. कधी भांडलो तरी तेवढ्यापुरते. तासादोन तासाच्यावर आमचे भांडण टिकायचेच नाही.

आम्ही गेल्या जन्मी एकमेकांचे भाऊ असणार असे आमच्या आया म्हणायच्या. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघे एकत्रच माझ्या आणि त्याच्या आजोळी राहायला जायचो. मी कामतांकडे मासे खायला शिकलो  सुरेश आमच्याकडचे शाकाहारी जेवण मनापासून जेवायचा. अगदी पंचामृत, अळूच्या फतफद्यासकट सगळे पदार्थ  तो आवडीने खायचा.

कॉलेजातही आमची मैत्री फेमस होती. आम्ही कॅंटीनमधला कटिंग चहा पण अर्धा अर्धा करून प्यायचो. चहा हा आमच्या दोघांचाही वीक पॉईंट..दिवसभरात दोघांचा मिळून दहाबारा कप चहा होत असे. गप्पा मारताना, अगदी मुलींकडे चोरून बघताना, अभ्यास करताना. आम्हाला चहा हवाच असायचा. आमच्या चहा पिण्याची थट्टा व्हायची. आम्ही दोघे नेहमी म्हणायचो आमची चहाची सवय आणि आमची मैत्री कधीच तुटणार नाही. 

सगळे म्हणायचे दृष्ट लागण्यासारखी मैत्री आहे या दोघांची. खरच कोणाची दृष्ट लागली आमच्या मैत्रीला?

 कॉलेजमधल्या आमच्या इतर मित्रांनी एकमेकांत आमच्यात भांडण लावून द्यायची पैज लावली होती. जो त्यात यशस्वी होईल त्याला दोन हजार रुपये इतरांनी मिळून द्यायचे असे ठरले होते.

आम्हाला दोघांना या प्लॅनची अजिबात कल्पना नव्हती.

आम्ही आमच्याच विश्वात मश्गुल असायचो. पण हळूहळू इतरांनी मिळून आमच्या मनात एकमेकांविषयी स्पर्धा निर्माण करण्यात यश मिळविले. कधी नव्हे ते आम्ही एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पहायला लागलो. आमचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला. दरवर्षी मी पहिला यायचो आणि सुरेश दुसरा किंवा तिसरा असायचा. यावेळी पहिल्यांदाच माझा दुसरा नंबर आला आणि सुरेशचा पहिला..

माझा मूड आधीच खराब होता. त्यात इतर मित्रांनी मला सांगितले की सुरेशने कॉपी करुन पहिला नंबर मिळवला आणि मुलींवर पहिल्या नंबरचे इंप्रेशन मारत फिरतोय.

तेवढ्यात सुरेश व आमच्या वर्गातलीच एक मुलगी मला भेटायला कॅंटीनमधे आले. तो बिचारा स्वतःचा पहिला नंबर येऊनसुद्धा माझा पहिला नंबर आला नाही म्हणून अस्वस्थ झाला होता. पण मला काय  झाले होते कोणास ठाऊक. मी त्याला वाट्टेल ते बोललो. त्या मुलीवरूनही त्याला बोलायला लागलो. तो सुरूवातीला शांत होता पण नंतर त्याचा ही संयम संपला. आम्ही खूप भांडलो. एकमेकांची उणीदुणी काढली. आणि पुन्हा एकमेकांचे तोंडही पहायचे नाही असे मनाशी पक्के करूनच घरी आलो. आमच्या घरच्यांनी आमची खूप समजूत काढायचा प्रयत्न केला. ज्या मित्रांनी पैज लावली त्यांनीही आमच्यात समेट घडवून आणायचा प्रयत्न केला. आम्ही दोघेही अडून बसलो. प्रेस्टीज इश्यू केला. पुढे मला नोकरी मिळाली. मी पुणे सोडून मुंबईत आलो. आमची जुनी चाळ पाडली. सगळी पांगापांग झाली.

आताशा कॉलेजच्या मित्रांची रियुनियन झाली. सुरेश तिथे असेल म्हणून मी जायचे टाळले. एकदा वाटले की आपण फोन करून सुरेशशी बोलावे. रियुनियनच्या निमित्ताने का होईना पुन्हा भेटावे. पण माझा इगो आड आला. इतकी वर्षे गेली तरी त्यानेही स्वतःहून कधीच फोन केला नाही. तो ही कॉलेजच्या व्हॉटसॲप ग्रुप पासून दूरच राहिला. आणि आज अचानक हा त्याच्या मुलाचा फोन ——-

क्रमशः….

© सुश्री समिधा ययाती गांधी

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments