मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चिरेबंदी भूक ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

? जीवनरंग ❤️

चिरेबंदी भूक ☆ श्री मुबारक उमराणी ☆

” साहेब, मेनू कार्ड.”.

“ठेव आणि बाळ, तोपर्यंत पापड प्लेट दे!”

मेनू कार्ड पहात, “आणि हे बघ, दोन मटन हंडी, चार विस्की,”

‘आणखी काय आणू साहेब ?”

“पाच इंग्लिश बॅण्ड! “

” आणि हे बघ, चपात्या दहा,  रस्सा पाच ,बिसलरी तीन!”

“हं करा सुरवात  ग्लास मध्ये घाला अर्धा अर्धा ,!

“सोडा  तर मला हवाचं गड्या, शिस्तीत!”

“चिअर्स ! व्वा! मस्त!   फर्स्टक्लास! “

“मला चढत नाही कधीच…. लावा शर्यत .!”

“शर्यत लावायला आपण काय घोडे आहोत काय ?”

” गप्प आस्वाद घ्या आता, उगाच ओरडू नका! “

“ए, आम्हाला काय तू हलका समजलास का काय ? अरे बॅरेल हाय बॅरेल .. अजून किती बी घेतली तरी काय होत नाय ! “

“आपण मापात असतो काय पण होऊ दे! “

” दुसरा राऊंड फुल्ल घाला,  भितोय काय? ” 

”   अरे ए, हंडीतलं घाला की प्लेटमध्ये ..”

” आज मस्त मजा आली ! कितीतरी दिवसांनी!”

” आपल्याला तर हंडी, रोट्यापेक्षा ही इंग्लिश लई भारी वाटते बुवा ! 

” अरे,  सगळंच दोन दोन दिसायला लागले..”

 “जास्त झाली वाटतं! उठा !”

 “साहेब बील! “

“किती झालं ?”

” चार हजार!”

” हे घे ! आणि तुला दोनशे  रूपयाची टिप, !”

 “साहेब, आपण कायच खाल्लं नाय सगळं तसचं पडलंय! “

” ए, जादा बोलू नकोस ?  गप्प बसं! तुझं काम काय आहे? वाढायचं. तेवढा कर आणि बील घे. “

सगळे उठून तरंगतच बाहेर जाऊ लागले. वेटर सर्व उरलेलं अन्न खरकटं भांड्यात भरू लागला.

हाँटेलच्या दाराबाहेर काही अंतरावर एक भिकारी तिष्टत बसून होता. भुकेल्या पोटाने अधूनमधून आतला कानोसा घेत होता. हे अन्न आता कचरा कुंडीत कधी पडतय याची तो वाट पहात होता. आपणास आता खायला मिळणार हा मनातला आनंद त्याच्या चेह-यावरुन स्पस्ट दिसत होता.

त्याच्या उपासमारीच्या  चिरेबंदी दुःखाला आता भागदाड पडणार होते.

 

© मुबारक उमराणी

 शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈