सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

ज्या कारणासाठी मी दयाळकडे जाण्याचे ठरवले तेव्हां अशा प्रकारच्या कामासाठी मला त्याच्याकडे जावं लागेल असं वाटलंही नव्हतं ..!!

पपांनी तर प्रथम विरोधच केला.त्यांचं म्हणणं,

“हा मार्ग आपला नव्हे. कायद्याने जे करायचं ते आपण करु.कायदा हातात घेणं हे आपल्यासारख्यांचे काम नाही. तो आपला पिंडच नव्हे. विलंब लागेल पण सत्य उघडकीस येईल. सत्याचा विजय कधी ना कधी होतोच.”

“कधी ना कधी म्हणजे कधी? संपूर्ण आयुष्य गेल्यावर? आणि हे बघा, दयाळ माझा बालमित्र आहे.गेल्या काही वर्षात खूप काही बदललं असलं तरी तो मैत्री विसरणार नाही. शिवाय तसा एकेकाळी तो आपल्या कुटुंबाशी ही जवळचा होता…!”

“कर तुला काय करायचे ते..”

पपा एकच वाक्य म्हणाले आणि माझ्यासमोरुन उठून गेले मला माहीत होतं ,हा मार्ग खोटे पणाचा धोक्याचाही आहे.

पण ज्या गोपाळकाकांना धडा शिकवण्यासाठी मी दयाळकडे जाणार होते त्यांनी तर आपल्याशी खोटेपणाच केला नं..?धोका दिला..धोक्याला धोक्यानेच ऊत्तर. हेच बरोबर.चांगुलपणा शिष्टाचार नीतीमत्ता यांच्या व्याख्या बदलल्यात.आपल्याला जर दुनियेत टिकायचं असेल तर आपणही आपले मार्ग बदलले पाहिजेत.

त्यामुळे पपांच्या विरोधाला न जुमानता मी दयाळची भेट घ्यायचं ठरवलं.

जी. के. म्हणजेच गोपाळकाका पपा त्यांना म्हणायचे, “अरे जी.के. म्हटलं की कसं रुबाबदार वाटतं. तू एव्हढा बिझनेसमन, पैसेवाला. हाय स्टेटसवाला, अनेक संस्थांचा अध्यक्ष… आणि गोपाळ काय? छे! हे नाव नाही शोभत तुला..

जीकेंचा आमच्या घरात कुटुंबीयासारखाच वावर असायचा.पपांना तर हरघडी त्यांची गरज वाटायची.

अगदी घरातल्या शुभकार्यापासून ते आजारपणं, इतर अडीअडचणी, समस्या, प्रवासाला निघायचं असेल तर त्याची तयारी करण्यापासून सर्व कामात पपांना जीके हवे असायचे, आणि तेही हजर  असायचे तत्परतेने..

अर्थात हे एकतर्फी नव्हतं. पपांचेही तितकेच त्यांच्यासाठी सहकार्य असायचे. दोघांच्यात सामंजस्य,विश्वास प्रेम मैत्री होती…!!

पण जीकेंचा आमच्या घरातला वावर ,त्यांची दोस्ती जीजीला मात्र खटकायची.जीके आले की तिची आतल्या खोलीत धुसफुस सुरु व्हायची. पण जीके मात्र जीजीला विचारायचे, “काय आज्जी कशा आहात..? बरं आहे ना सगळं.?”

जीजी मात्र म्हणायची,हो.बराय् ..बरं नसायला काय झालय?..”

पण ती पपांना नेहमी म्हणायची,

“या माणसापासुन सावध रहा बरं.. मला काही तो दिसतो तसा वाटत नाही..”

जीजीचं खास नेटवर्क होतं.ती घरातच असायची पण तिच्या फ्रेंडसर्कलमधे फळवाले भाजीवाले ,रानभाज्या घेउन येणारे कातकरी आदीवासी असत.ते घरोघरी जात.

त्यांच्याकडुन जीजीला आतल्या गोटातल्या बातम्या मिळत.जीकेंबद्दल बरेच वेडेवाकडे तिला कळले होते..

म्हणून ती पपांना वेळोवेळी सावध करायची. पण परिणामी सगळं शून्य ठरलं… पपांची पाचपाखाडीची प्राॅपर्टी डेवलप करण्याची कल्पना जीकेंचीच.

“एखादी सोसायटी बनवू. नाहीतर शाॅपींग काॅम्प्लेक्स.. खाजगी कार्यालय.. अरे तुझी ही जागा सोन्याचा तुकडा आहे…”

पपा म्हणायचे ,”मला आता काही व्याप वाढवायचा नाही बाबा..मला वेळही नाही ..माझ्या व्यवसायाचं काम वाढलय्..शिवाय आता नवीन काही झेपेल असं वाटत नाही…”

“अरे! ती काळजी सोड. मी आहे ना! माझ्याकडे माणसं आहेत. तयार टीम आहेत आणि सुटसुटीत योजना आहेत..”

नंतर जीके म्हणाले, “हे बघ शासकीय धोरणांचा काही भरोसा नाही.रस्तारुंदीकरणाचा प्रस्ताव आला तर नगरपालिकेचच आक्रमण व्हायचं.बांधकाम असलेली जागा तशी सुरक्षित असते!”

क्रमश:….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments