सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ भेट…. – भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

तिन्हीसांज झाली होती ,अस्वस्थपणे शालू उंबऱ्यातून स्वैपाकघरात अन पुन्हा अंगणात येरझाऱ्या घालत होती .आकाशात ढगांची गच्च दाटी झालेली अन अजूनच अंधारून आलेलं .गोठ्यात अंधार भुडुक होता अन शिवा -तिचा कारभारी गुडघ्यात मान घालून बसला होता .शेजारी सापती ,घुंगुरमाळ उदास पडलेली  बघून तिच्या पोटात कालवून येत होतं पण ..पण ती हतबल होती .चूल पेटली होती . घरोघरी जनावरांच्या अंघोळीचा अन सजावटीचा कार्यक्रम सुरू होता .आज खिचडा !  तिनेही चुलीवर खिचडा शिजत घातला होता ,करडई उखळात कुटून दूध काढून ठेवले होते , खीर रटरटत होती ; जनावरं ओढ्यावर नेऊन धुवून आणली होती ,शिंगांना हुरमुस लावून रंगवली ,पण तिला  कशातच  आनंद वाटत नव्हता. घरधण्याची  तसली अवस्था बघून तिला उदास वाटत होते ,तिच्या परीनं तिनं समजूत काढली होती पण ..पण त्याच्यात काय फरक पडत नव्हता आणि कुणी समजूत काढून ती निघणारही नव्हती .गेलं आठ दहा महिने झालं त्याचं शिवारातून ,जितराबावरून लक्ष उडल होतं ,इतकंच काय स्वत:वरून सुद्धा त्याचं लक्ष उडलं होतं . सगळी काम शालूनच पार पाडली होती ,औंदा पेरणी पण शालूनच पार पाडली होती पण पिकं कितकीशी वाढलीत ? हे बघायला सुद्धा तो शेतापर्यंत गेला नव्हता .अन का नाही अशी अवस्था होणार ?त्याजागी कुणी असता तर त्याचीही अवस्था अशीच झाली असती शालू विचारात गढली .सुंदर आणि धन्या बरोबरच वाढलं होतं आत्या सांगायच्या सुंदरच्या आणि तिच्या कारभाऱ्याच्या साऱ्या कहाण्या ! 

घरच्या गाईपासूनच सुंदर झाला होता .नावाप्रमाणच सुंदर देखणा होता . पांढऱ्या शुभ्र सशासारखी कातडी ,टपोर डोळ ,गुबगुबीत शरीर .. शिवाला त्याचा खूप लळा  होता .दिवसरात्र तो सुंदरला जपायचा ,कुठून कुठून गवत आणायचा ,कणिक खुराक ,गोठ्यात बसायला स्वच्छ जागा ..एखाददिवशी जरी सुंदर उदास वाटला  तर शिवा शाळेतच जायचा नाही ,सुंदरला माळावर  पळवल्याशिवाय त्याला चैन पडायचा नाही, सुंदरन काही खाल्ल्याशिवाय शिवा तोंडात घास घ्यायचा नाही .सुंदर मोठा धष्टपुष्ट झाला अन शेतीची काम  करू लागला .शालू अन त्याच्या लग्नाच्या वेळीसुद्धा त्यानं सुंदरकडं एव्हढंस पण दुर्लक्ष केलं नव्हतं .वरातीच्या गाडीला तो  सजून धजून ओढत होता . तिथंच तिची  सुंदरशी ओळख झाली होती .

सकाळी उठल्या उठल्या पहिलं तो सुंदरचच दर्शन घ्यायचा ,त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा ,तोही धण्याचं हात चाटायचा ,तोंड वर करून लाड करून घ्यायचा . त्याच्यामागचं शेण सारून त्याला कोरड्या जागेत बांधून मगच धन्याच्या दिवसाची सुरुवात व्हायची .काळजाचा तुकडाच होता जणू ! शिंगांना सुबक आकार ,त्यांचा लाल रंग , कंडे ,घुंगुरमाळ ,बैलपोळ्यासाठी रंगीत झूल ,रंगीत गोंडे कित्ती कित्ती हौस!  सुंदरला काही झालं की शिवाचा जीव खालवर व्हायचा .सुंदरला चारापाणी केल्याशिवाय तो तोंडात घास घ्यायचा नाही .

दिवाळीत गोठा साफ करून रंगरंगोटी व्हायची ,गोठ्यालाच दिव्याच्या माळा लावायच्या .वसुबारसेला पूजा ,पुरणपोळीचा घास असायचा सुंदरला.सुंदर जणू धाकटा भाऊच होता धन्याचा !  बैलपोळ्याची तर त्याला कित्ती हौस  ! आठ दिवसापासूनच तो त्या तयारीत असायचा . लाडक्या सुंदरला  सगळ्या माळावर हुंदडू द्यायचे. हिरव्यागार कुरणावर मनसोक्त चरून झालं की मग आपोआपच त्यो ओढ्याकडं जायचा मनसोक्त पाणी प्यायचा , मग कंबरभर पाण्यात उतरून शिवा सुंदरला स्वच्छ धुवायचा .आधीच स्वच्छ पांढरी त्याची कात अजूनच झळाळायची .आठ दिवस त्याला कुठल्याच कामाला लावत नसे.    रस्त्यानं सुंदर निघाला की सगळे बघत उभं रहात .दररोज संध्याकाळी मीठ मिरच्यांनी दृष्ट उतरून चुलीत फेकायची .तिला पण सुंदरला जपावं लागायचं ,सुंदरचा दु:स्वास धन्याला अजिबात खपायचा नाही .

खरे तर सुंदर दिसायला देखणा होताच पण तो कष्टाळू अन गुणी पण तितकाच होता .त्याला कधी चाबूक ओढलेला तिनं  बघितलं नव्हतं .शेतीच्या कामाला नेहमी सुंदरच्या जोडीला दुसऱ्याचा बैल भाड्यानं असायचा ,गाडी जुपताना पण भाड्याचाच बैल असायचा सुंदरच्या जोडीला ;पण सुंदरला कुणी भाड्यानं मागायचं धाडस केलं नव्हतं ;नव्ह कुणी मागितला जरी असता तरी स्वतः शिवाच गेला असता पण सुंदरला दिला नसता !

क्रमशः ——

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments