श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पिढीनुसार बदलत गेलेल्या तीन पिढ्यांच्या स्वप्नांचा हा मागोवा. . !अर्थात तीन वेगळ्या गोष्टी आणि तरीही एकसंध परिणामाचा ठसा उमटवू पहाणाऱ्या. . . !!)
मी, माझे वडील आणि माझा मुलगा. आम्हा तिघांचाही आपापल्या आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन ‘व्यक्तीनुरुप आणि अर्थातच पिढीनुरुप’ कसकसा बदलत गेला या दिशेने विचार करायचा तर कां आणि कसं जगायचं हे जसं मी मनाशी ठरवलं होतं तसं त्या दोघांनीही ठरवलं असणारच हे गृहीत धरलं, तर ते त्या त्या वेळी आपल्यापर्यंत पोचलेलं नव्हतं हे माझ्या आत्ता प्रथमच लक्षात येतंय. आज वडील हयात नाहीयेत. माझ्या मुलाच्या संदर्भातल्या सगळ्याच आठवणी इतक्या ताज्या आहेत की त्याचा त्याच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठीचा प्रवास कसा घडत गेला हे त्या त्या वेळी नेमके याच पध्दतीने जाणवले नसले, तरी आज लख्ख आठवतेय, जाणवतेय आणि त्याच्याबद्दल मन अभिमानाने भरुनही येतेय.
आम्हा तिघांचीही आयुष्यं वृक्षाच्या एकमेकांत गुंतलेल्या फाद्यांसारखीच. एकरुप तरीही स्वतंत्रपणे प्रकाश शोधत वाट चोखाळत राहिलेली. . !
आम्हा तिघांचीही स्वप्ने प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार आणि परिस्थितीनुसारही वेगवेगळी. बाबांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा. त्या काळातील कुटुंब व सामाजिक व्यवस्थेनुसार वैयक्तिक आयुष्याचे निर्णय ज्याचे त्याला घ्यायचं स्वातंत्र्य फारसं कुणाला नसेच. बाबांची गोष्ट तर त्याहीपेक्षा वेगळी. बाबांची परिस्थिती आणि आयुष्यात त्यांची झालेली होरपळ हे त्या पिढीचं प्रातिनिधिक चित्र म्हणता येणार नाही. अर्थातच त्या काळात सर्वसामान्य कुटुंबातले तरुण चाकोरीबद्ध आयुष्य स्विकारणारेच. तथापी वेगळा मार्ग स्विकारुन प्रतिकूल परिस्थितीतही एका विशिष्ट ध्येयासाठी जिवाचं रान करणारी माणसं अपवादात्मक का होईना त्याही काळी होतीच.
माझ्या बाबांचं आयुष्य मात्र सरळ रेषेतलं सहजसोपं नव्हतंच. आयुष्याला वेळोवेळी मिळत गेलेल्या कलाटण्या त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्याच होत्या. ते तान्ह्या वयाचे असतानाच वडील गेलेले. आणि बाबा शाळकरी वयाचे असतानाच आईही गेली. मोठा भाऊ अतिशय तापट आणि तिरसट. अनपेक्षित डोईवर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्यामुळे असेल पण बाबांचा मोठा भाऊ सतत कातावलेलाच. अशा परिस्थितीत बाबांच्या त्या पोरवयातील भावनिक गरजेचा विचार कुठून व्हायला? दोष परिस्थितीचाही होताच पण त्यामुळे मोठ्या भावाच्या संसारातील या धाकट्या भावाचं आस्तित्व आश्रितासारखंच असायचं. कसेबसे शिक्षण संपताच नोकरी मिळवून बाबा त्या घुसमटीतून बाहेर पडले. त्या काळातील प्राधान्यक्रमानुसार त्यांना मिळालेली पोस्टातील नोकरी म्हणजे वरदानच. तोवरच्या संपूर्ण खडतर आयुष्यामुळे हरवत चाललेला आत्मविश्वास लग्न होऊन आई त्यांच्या आयुष्यात आली तेव्हा त्यांना परत मिळाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या बाबांचं सुखाचा समाधानाचा संसार एवढं एकच स्वप्न होतं. अर्थात आईचंही. सासर माहेरचा दुसरा कुठलाही आधार नसताना कोवळ्या वयात मोठ्या हिमतीने माझी आई पदर खोचून माझ्या बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. आम्ही सर्व भावंडे मार्गी लागेपर्यंत रुढार्थाने म्हणावं तर त्यांचा संसार तसा काटकसरीचा. मीठभाकरीचाच. आर्थिक चणचण तर पाचवीलाच पुजलेली. तरीही त्यांनी त्याची झळ आम्हा मुलांपर्यंत कधीच पोहोचू दिली नव्हती. स्वतः चटके सहन करून आमच्या स्वास्थ्यासाठी ते अखेरपर्यंत झटत राहिले. हे सगळं करत असताना त्या परिस्थितीत फार मोठी स्वप्ने पहाणं बाबांना शक्य नव्हतंच. आणि पहायची म्हंटलं तरी भविष्यात अंधारच होता जसा कांही. तरीही त्यांना आनंद हवा असायचा जो त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीत शोधला. आम्हा मुलांना सतत उपदेशाचे डोस न पाजवता स्वतःच्या वागण्या बोलण्यातून, कृतीतून आमच्यावर ते चांगले संस्कार करीत राहिले. आपली मुलं आर्थिक सुबत्तेपेक्षा चारित्र्यसंपन्न व्हावीत हेच त्यांचं स्वप्न होतं. त्याकाळी सर्वच पालकांचा हाच विचार असे. तरीही टोकाचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे माझे आई न् बाबा दोघांचेही गुणविशेष होते. दोघेही देवभोळे नव्हते, पण दत्तमहाजांवरची त्यांची अढळ श्रद्धा हाच त्यांचा श्वास होता. मानेवर जू ठेवावा तशा पोस्टाच्या त्या काळातल्या प्रचंड कामाच्या रगाड्यात त्यांना श्वास घ्यायला जिथं फुरसत नव्हती तिथे कर्मकांडात अडकून पडणं दूरचीच गोष्ट. तरीही त्यांचं नित्य दत्तदर्शन कधीही चुकलेलं नव्हतं. त्यांना प्राप्त झालेली वाचासिध्दी, दृष्टांत होऊन मिळालेल्या दत्ताच्या प्रसाद-पादुका हे त्यांचंच नव्हे तर आम्हा सर्व कुटुंबियांचंच आनंदनिधान होतं. अखेरपर्यंत बाबा निष्कांचन राहिले, पण वाचासिध्दीच्या कृपाप्रसादाचा त्यांनी कधीही बाजार मांडला नाही. असा माणूस भौतिक सुखाची स्वप्नं पहाणं शक्य नव्हतंच. बाबांना दीर्घायुष्य नाही मिळालं. नातवंडाचं सुख फार दूरची गोष्ट. त्याना सूनमुखही पहाता आलं नाही. तरीही ते अतिशय प्रसन्न , शांतपणे गेले.
जाताना ते आम्हाला पैशात मोजता न येणारं असं भरभरुन खूप कांही देऊन गेलेत. संस्कारधन तर होतंच आणि जणूकांही स्वतःची सगळी पूर्वपूण्याईही ते आम्हा कुटुंबियांच्या नावे करुन गेलेत नक्कीच. त्यांनी मनोमन कांही स्वप्न म्हणून जपलं असेल तर ते फक्त आम्हा सर्वांच्या समाधानी सुखाचं. . ! त्या स्वप्नपूर्तीचं समाधान ते जिथं असतील तिथवर त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचलेलं असेल.
क्रमश:….
©️ अरविंद लिमये, सांगली
(९८२३७३८२८८)