श्री बिपीन कुलकर्णी
जीवनरंग
☆ पुनरागमन… ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆
घरात श्री च्या प्राण प्रतिष्ठेची गडबड. माझ्या आठवणीत आम्हा भावंडाना भाऊंकडून बारीक बारीक सुचने बरोबरच हे केलं कां ..? ते का नाही केलं ..? असंच कां ? तसंच कां? वगैरे सुरु असायचं. सगळं त्यांच्या सूचनेबर चालवून घ्यावं लागायचं. आई मात्र शांत असायची नजरेतून बोलायची आणि आमच्या कपाळावरच्या आठ्या विरून जायच्या.
आज हा पारंपरिक सणांचा, व्रत-वैकल्याचा धार्मिक वसा भाऊ, आई, काका ह्यांच्या कडून आमच्या पिढी कडे आला. त्या बरोबरच भाऊंचा हा स्वभाव वारसा जणू हक्काने माझ्याकडे. मुलं म्हणतात पण … बाबा, तुम्ही सुद्धा ना …अगदी भाऊंसारखे…!!! मी चमकतो. अरेच्या…! “खरंच की”. पण त्याचवेळी जाणवतं कीं आपल्या अगोदरची पिढी किती बारीक सारीक विचार करायची. त्या वेळी जेंव्हा केव्हां अश्या प्रकटलेल्या विचारातून त्यांचा हेकेखोरपणा नाही, तर त्या त्या कृतीतून होऊ शकणाऱ्या चुका टाळण्याची कदाचित ती धडपड असावी.
क्षणभर मनात विचार येतो की भाऊंचे पैलतीरावरून पुनरागमन की मला दिसू लागलेला पैलतीर…??
© श्री बिपीन कुळकर्णी
मो नं. 9820074205
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈