सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ एक दिवस…. भाग १ व २☆ सौ राधिका भांडारकर ☆
भाग १
एखादा दिवस असा उजाडतो की,त्या दिवशीचा प्रत्येक क्षण दडपणाखाली असतो फार उदास निराश,चिंतातुर व्हायला होतं.स्वत:वरचा विश्वास उडून जातो.काहीतरी चूक करतोय् असं वाटत रहातं!
कारण नसताना आयुष्यात फार धोका तर नाही ना पत्करला? त्यापेक्षा एखादं सुरक्षित साचेबंद आयुष्य जगणं बरं… स्वत:बद्दलच्या कल्पना नको.निराळ्यावाटा नकोत. काहीतरी टिकवताना मनाची फसवणुक करतोय् का! कशासाठी? काय मिळवण्यासाठी?..
मोनानं रात्रभर झोपू दिलं नाही.सर्दी ,हलका ताप..
रात्रभर बेचैन होती..सकाळी सकाळी तिला झोप लागली.
पण माझा दिवस उगवला होता.त्यातून शेखरला लवकर जायचं होतं.त्याचा लाईन आउट होता.म्हणजे सबंध दिवस त्याचा साईटवर जाणार.मोनाला आज डे केअर मधे पाठवता येणार नाही. मलाही आज रजा घेणं शक्य नव्हतं.घरुनही काम करता येणार नाही.आमच्या कंपनीच नवीन प्राॅडक्ट लाँच होणार होतं. प्रेझेंटेशन माझंच होतं…
शेखरला विचारलं, “तुला आज गेलच पाहिजे कां?”
“अर्थातच!”त्याचं उत्तर.
मनात येतं,कधीतरी याने त्याच्या मीटींग्ज, अपाॅईन्टमेन्ट्स जुळवून घ्याव्यात की..माझंही रजांचं वेळापत्रक बघावं लागतं.अजुन वर्ष संपायला वेळ आहे.
शेखरची तयारी भराभर करुन दिली.तो गेला.
क्षणभर वाटलं..’मी कमावते..खरं म्हणजे शेखरपेक्षा थोडं जास्तच..मला कंपनीत मान आहे.माझ्या शिक्षणाचं करीअरचं चीज होतंय या सर्वांचं महत्व कोणाला आहे?
शेखर तर नेहमीच म्हणतो, “सोडुन दे नोकरी…”
माझ्या धडपडीचा .स्वत्व टिकवण्याचा संसाराला काहीच उपयोग नाही का?हे जे राहणीमान सांभाळलय त्यात माझ्या कर्तृत्वाचा काहीच वाटा नाही का? ही जाणीव त्याला आहे का? असेलही .पण कबुली नाही. ईगो..
प्रेस्टीज ईश्शु…मला मात्र सारखं अपराधी वाटत..प्रचंड गील्ट येतो कधीकधी….
निघताना साराला सगळ्या सुचना दिल्या.
“सारा मोनाचं डे केअर नाहीय्..
तिला मऊ भात भरवायचा.त्यात थोडी पालेभाजी कालवायची.या बाटलीतले औषध दोनदा द्यायचे.
दुपारी चाॅकलेट मिल्क दे.संध्याकाळी केळं भरव..”
तीनचार वेळा हा पाढा घोकला.
साराला सवयीनं सगळं माहीत झालंय् .मोनाला घरी ठेवायचं असलं की मी तिला बोलावते.ती करतेही
व्यवस्थित..तरीही धाकधुक .साशंक मन…
आॅफीसमधे जायला निघताना सारा म्हणालीही..
“नका काळजी करा ताई .निवांत जावा..मि हाय ना…”
साराच्या या बोलानं कितीतरी धीर मिळाला.
तसा मोनाचा त्रास नसतोच.खूप शहाणी गुणी आहे ती. पण तिचं शहाणपणच मला हळवं करत.माझ्या मागे तिच्या वाटेला येणारं हे काही तासांचं विलगीकरण…ती दिवसभर मजेत असते.खेळते बागडते कारण ती अजाण आहे…तिच्या भावनांना अजुन आकार नाही आलाय्…
आफीसमधे पोचेपर्यंत विचारांची साखळी तुटली नाही….
भाग २
पपांची मेल आली होती.आजीच्या तब्येती विषयी लिहीलं होतं.रजा मिळाली तर येउन जा एखादा अठवडा..तिलाही बरं वाटेल..वर्ष उलटलं तू आली नाहीस..
आधीचं दडपण या मेलनं आणखी वाढलं. जाॅब नसता तर भुर्रकन् उडुन जाउन आजीला भेटुन आले असते…
ऊगीच मोठे झालो. बंधनं वाढली अन् माया दूर गेली.जवळची माणसं दूर गेली.त्यांचा सहवास मिळत नाही…त्यातून व्हीसाचे प्राॅब्लेम्स.वेळ मिळाल्यावर पपांना सविस्तर मेल लिहायचं ठरवलं..
“माझं छान चाललंय्..मोनाही रुटीनशी अॅड्जस्ट झाली आहे.मला लवकरच वरची पोस्ट मिळेल.मागच्या रविवारीच एका सोशल कँपच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली..इथल्या ईमीग्रन्ट्सच्या बर्याच समस्या आहेत.दिसतं तसं, वाटतं तसं, काहीच नाही…दुरून डोंगर साजरे..”पपा खूश होतील मेल वाचून.
प्रेझेंटेशन छान झालं. खूप अभिनंदन.खूप प्रशंसा.!!
थोडं रिकामपण मिळालं.
पुन्हा मनातला कोवळा कोंब हलकेच उघडला. वाटलं इतका वेळ यांत्रिकपणे काम केलं’जणू मी म्हणजे एकच व्यक्ती नव्हते.दोन वेगळ्या व्यक्ति एकाच ठिकाणी एकत्र आल्यासारख्या होत्या.त्यातली एक निरंतर चिंतातुर. सतत टेन्स्. विचारमग्न. आत्मविश्वास हरवलेली. काय चूक काय बरोबर काहीच न समजु शकणारी..
पण दुसर्या व्यक्तीने त्या व्यक्तीलवर वर्चस्व गाजवलं होतं. ती तेजस्वी होती, निराळी होती. स्वत:ची ओळख टिकवणारी..आत्मनिर्भर….
उठले. पटकन घरचा नंबर फिरवला.काही वेळ रिंग वाजली पण फोन ऊचलला गेला नाही. तोपर्यंत मनात हजार शंका…पण पलिकडुन फोन उचलला गेला आणि मी लगेच म्हणाले, “मी बोलतेय्..”
मोनाच्या रडण्याचा आवाज येत होता.पुन्हा कालवाकालव!!!
“मोना कां रडते?”
“आत्ता झोपेतुन उठली”
“भात खाल्ला?”
“हो”
“औषध दिलंस?”
“हो”
“आणि चाॅकलेट मिल्क?”
“सगळं नाही संपवलं…”
बरं. संध्याकाळी तिला वाॅश दे आणि कम्युनाटी पार्क मधे घेउन जा….”मला जरा उशीर होईल.
जरा टेन्शन दूर झाल्यासारखं वाटलं.पण तगमग होतीच.
कदाचित ही तगमग आयुष्यभर राहील. जणु माझा अतुट घटक असल्यासारखी.खरं म्हणजे शेखर जेव्हां म्हणतो “जाॅब सोड..”तेव्हां वाटतही द्यावा सोडून.लाईफ पीसफुल होईल.पण नाही..स्वत:लाच हरवुन बसल्याची एक भलीमोठी रूखरूख कायम राहून जाईल.म्हणजे कुठलीतरी एक शांती मिळवण्यासाठी दुसरीकडे अशांत रहायचं.साराच विरोधाभास.यातूनच सीझन्ड व्हायचं..
संध्याकाळच्या मीटींगला हजर राहण्याची मुळीच इच्छा नव्हती. वाटलं सांगून द्यावं, “माझी मुलगी आजारी आहे, मला नाही थांबता येणार…”पण सगळीकडे बरोबरी करायची.समान हक्कासाठी भांडायचं.आणि मग अपरिहार्य कारणाचं पांघरुण पसरुन सवलत मागायची हे बरोबर नाही….
ऊशीर झालाच होता.पटापट ड्राॅवर आवरले.किल्ल्या, पर्स उचलली..वाॅशरुमलाही गेले नाही.लिफ्टने तडक पार्कींग लाॅटमधेच आले…
क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना..
गाडीजवळ चक्क शेखर उभा!! सोबत मोनाही.. नवा ड्रेस.
हातात रंगीत बलुन्स..मस्त मजेत होती…
“अग!लवकरच घरी आलो.काॅन्ट्रॅक्टरला गाईडलाईन्स दिल्या.. पुढचं बघेल तो.शिवाय मोनाला डाॅक्टरकडेही घेउन गेलो.तसं विशेष काहीच नाही.शी इज् व्हेरी हेल्दी
चल, मोनाला घेउन मार्बल पार्कमधे जाऊ.जेऊनच घरी परतु…..
हो !आणि एक खुशखबर!! आपलं ई ए डी आलं. आता आपण भारतात जाउ शकतो..ठरवुया…”
मन कसं एकदम शांत झालं.! सकाळपासुन आलेली निराशा मरगळ निगेटीव्हीटी ओसरुन गेली.किती छोट्या गोष्टी पण वादळं मात्र मोठी..
सकाळी शेखर खूपच अडमुठा, हेकेखोर आणि टीप्पीकल वाटला होता…
पण आता मात्र एक समंजस, सहाय्यक, मनातलं जाणणारा जोडीदार वाटला….
आयुष्याची वाट खूप मोठी आहे पण आता हातात हात घालुन चालू शकु असा विश्वास बळावला…..
समाप्त
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈