सौ. सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – दोन ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)
(चेरीने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेली सीमा चेरीने पाठवलेले पत्र टेबलावर भिरकावून देते. ज्यात तिने आपला जीवनपट मांडला आहे. पण त्याचे आता दूसरे वाचन चालू आहे……आता पुढे)
एके दिवशी आईनं सांगितलं ,”चेरी बेटा तुझं लग्न ठरवतोय. मुलगा देखणा आहे. तुमची जोडी फार शोभून दिसेल. शिवाय तो सी.ए.आहे. त्या फॅमिलीचे खूप बिजनेस आहेत… वेगवेगळ्या क्षेत्रातले …त्या सर्वांची मॅनेजमेंट त्याच्याच हातात आहे. घराणं आपल्यापेक्षा धनाढ्य आहे. जॉइंट फॅमिली आहे. लोक फार चांगले आणि शिकले-सवरलेले पण आहेत. एकदा तुझं लग्न झालं की तुझ्या भैयाच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याबरोबर मलाही साउथ आफ्रिकेत शिफ्ट व्हावे लागेल .तुझं माहेरी येणं…. आपली पुन्हा भेट होणं…. कितपत शक्य होईल? काहीच माहित नाही. या सगळ्या विचारांनीच माझा जीव तिळतिळ तुटतोय …माझी रात्रीची झोप पण उडून गेलीय. पण काय करणार?निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य मला कुठे आहे?…. पण आर्थिक बाबतीत म्हणशील तर तुझ्या नावावर दोन फ्लॅट, एक बंगला, बँकेत भरपूर पैसा- ज्वेलरी असं सगळं तुझ्या बाबांनीआधीच करून ठेवलंय.”
मोठ्या दणक्यात माझं लग्न झालं… आणि एका छोट्या कैदेतून मोठ्या कैदेत माझी विदाई झाली. इथे कशात काही कमी नाही, पण खूप काही कमी आहे, हे मला इथं राहिल्यावर कळलं.
लग्नाच्या दुसऱ्या दिवसा पासूनच माझ्या दुर्दैवाला सुरुवात झाली .माझी ‘मुँह दिखाईकी’ रस्म चालू होती. त्याच वेळी माझ्या नणदेचे पती चक्कर येऊन पडले…. अन् पाच मिनिटातच त्यांचं हार्टफेलनं देहावसान झालं. घरात दुःखाचा सागर उमडला. त्यातून बाहेर यायला दोन तीन महिने लागले. नंतर आमच्या नणंदबाई आपला बंगला भाड्याने देऊन मुलीसह आमच्याकडेच राहायला आल्या. त्यात गैर काहीच नव्हतं. पण तेव्हापासून माताजी आणि आणि वन्सबाई या दोघींनी मला तू पांढऱ्या पायाची आहेस .अवदसा आहेस .तुझी नजर फार वाईट आहे. तू सगळ्यांना खाऊन बसणार आहेस. अशा तऱ्हेचे व अर्थाचे टोमणे मारायला सुरुवात केली. हे सगळं कमी होतं म्हणून की काय …लग्नानंतर सहा महिन्यातच आई वारली. इथेच! साउथ आफ्रिकेत जायच्या आधीच.अन् मायेच्या सावलीला मी मुकले.आता जगात माझं असं कोणीच नाही .नवरा सुद्धा!
घरातल्या लोकांची वागणूक जरा विचित्र आहे हा माझा संशय हळूहळू दृढ होत गेला.अमावस्या,पौर्णिमा ,प्रदोष, शनिवार अशा दिवशी नेहमी नाही ,पण कधी कधी घरात रात्री बारा वाजल्यापासून विशेष पूजा चालायची. पूजा बाबूजी करायचे. ह्यांना कपाळभर गुलाल लावला जायचा .थोड्या वेळातच हे अंगात येऊन घुमू लागायचे .यांना पूजेच्या मधेच प्रश्न विचारले जायचे. आणखी सुबत्ता…. आणखी धन…. व्यापारात जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा पाडाव….. प्रश्न मुख्यतः या बाबतचेच असायचे. मला हे सगळे थोतांड वाटायचे.
“अलकनंदे, कपाळावर आठ्या नकोत. नीट लक्ष देऊन पूजा पहा.” माताजी माझ्यावर गुरगुरायच्या.
पण पूजा साहित्यातल्या लिंबं, गुलाल ,सुया, काळ्या बाहूल्या …यासारख्या वस्तू पाहून माझ्या अंगावर काटा यायचा. पशुबळी पण कधी कधी दिला जायचा. कधी कवट्या मांडून पूजा चालायची. मला पूजेच्या ठिकाणी बसावंच लागायचं .
सकाळी उठून पहावं तर सगळ्यांचं वागणं नार्मल! चहाच्या टेबलावर सगळ्यांच्या गप्पा ,थट्टामस्करी, हसणं सगळंअगदी नेहमीप्रमाणं! माताजी-बाबूजींच्या बोलण्यात मी यांचा उल्लेख कधीतरी एकदा’ बीच का बच्चू,असा ऐकला होता… म्हणजे लहानपणापासून ह्यांचा उपयोग ते माध्यम म्हणून करून घेत असावेत ….किंवा यांना हिप्नोटाईज करत असावेत… नाहीतर यांची दुभंगलेली पर्सनॅलिटी असावी…. असा माझा संशय होता. एकीकडे कुटुंबवत्सल, शांत, हुशार असा नॉर्मल माणूस ..आणि दुसरीकडे तो अंगात येऊन घुमणारा विचित्र ‘बीच का बच्चू’!
लग्नानंतरची दहा वर्षे मी हाच प्रकार झेलत आलेय. आत्तापर्यंत नणंदेची मुलगी, जावेची मुलगी, मुलगा सगळीच मोठी आणि कळती झालीत. पण लहानपणापासून ती या कर्मकांडात आनंदाने सामील होत आलीत .शिक्षणाने पण त्यांच्या विचारात काहीच फरक पडलेला नाही. कारण त्यांचा माईंड- सेटच तसा ॲबनार्मल झाला आहे. हेच त्यांचे संस्कार आहेत. या घरात मी एकटीच मूर्ख आणि नास्तिक! तशी तर घरातली मोठी माणसे पण खूप शिकलेली आहेत. आपले उद्योग धंदे उत्तम प्रकारे चालवताहेत. अडाणी थोडीच आहेत !पण या विचित्र पूजांबाबत अबालवृद्ध सगळेच पूर्ण अंधश्रद्धा आहेत… आणि सगळ्यांचाच एक अलिखित नियम म्हणजे त्यातला कोणीही याबाबत घराबाहेर काही सांगत नाही.
मला मूलबाळ झालं नाही. होणार तरी कसं? पती-पत्नीला एकत्र येऊच दिलं नाही तर ! हे लहानपणापासूनच ‘बीच का बच्चू!..व्रत,उपास-तापास, अनुष्ठानं यामुळं त्यांना स्त्रीसंग बरेचदा वर्जच असतो. कधी कधी मला त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात माझ्या बद्दल प्रेम भाव दिसतो… पण अचानक ‘तो बच्चू’ त्यांच्यावर हावी होतो. अन् केविलवाणा चेहरा करून ते माझ्या जवळून दूर निघून जातात …पण माझ्या मनाला मी कसं समजावू? सासरी प्रवेश केल्यापासूनच दांपत्य जीवनाबद्दलची माझी सुंदर स्वप्नं, माझ्या सोनेरी आशा, माझी उमेद,अपार उत्साह… सगळ्याचा चुराडा चुराडा झालाय. माझं मन नेहमी ठणकत असतं. आतल्या आत रडत असतं आणि एकाकीपणा अनुभवत ‘वांझ ‘हे विशेषण खाली मान घालून ऐकत मी जगत राहते.
क्रमशः…
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈