सौ. सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – पाच ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)
वटव्रत आणि त्याची भयंकर सांगता चेरीला टाळायची आहे. त्यामुळे मदत मागायला मोठ्या विश्वासाने ती सीमाकडे आली आहे .आता पुढे ..
एवढं बोलून झाल्यावर, चेरी आपादमस्तक थरथर कापते आहे, तिचा चेहरा पांढरा फटक पडलाय, तोंड कोरडे पडल्याने ती बोलूच शकत नाहीय… हे सगळं सीमाच्या लक्षात आलं .फाशी लावून ‘सगळी आत्महत्या करणार? वडिलांना मोक्ष देऊन स्वतः दीर्घायुषी होण्यासाठी? अतर्क्य!’….तरीही आपली उडालेले घाबरगुंडी लपवून सीमानं चेरीला आधार दिला. तिच्या पाठीवर आपुलकीने हात फिरवत तिला विचारलं, ” ह्या पाईप आणि भोकांच्या मागं काय तर्क आहे?”
“अगं फाशीला लोंबकाळल्यावर आमचे आत्मे शरीरातून पाइपद्वारे वरती जाणार. तिथल्या आत्म्यांना गती देऊन पुन्हा भोकामधून आमच्या शरीरात प्रवेश करणार. मृतात्मे स्वर्गात …तर आम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्य उपभोगणार!…..”
सीमा उद्गारली,” ओ माय गॉड!…. नऊ जणांची अंधश्रद्धेमुळे…इतक्या टोकाला गेलेल्या अंधश्रध्देमुळे… सामूहिक आत्महत्या…माझी तर मतीच कुंठित झालीय…”
तरी सगळं धैर्य एकवटून…मोठी जबाबरीची भूमिका घेत ती चेरीला समजावू लागली की आम्ही तुझी सर्वतोपरी मदत करू.तू योग्य जागी आली आहेस.
खूप वेळ पसरलेल्या भयाण शांततेला चिरत, स्वतःच्या भावनांवर मिळवलेल्या ताब्यामुळे, आशावाद…अन् आत्मविश्वासाने भरून गेलेली चेरी ठामपणे बोलू लागली,
“पण हे सगळं मी होऊ देणार नाही. कारण तू मला मदत करणारच आहेस. बराचसा मुख्य पुरावा आता तुझ्या मोबाईलमधे आहेच. मंगळवारी संध्याकाळपासून मदिरा प्राशन करून पूजा सुरू होईल….. पण मी तिथे नसेन…. बॅकयार्डच्या कुंपणाच्या तारा मी वाकवून ठेवल्यात. त्यामुळे मी आजच्या सारखीच मंगळवारी पण बाहेर पडेन.”
डायरी घेऊन जाता जाता ती पुन्हा थांबली. म्हणाली,” आता मी पूर्वीसारखी लेचीपेची राहिली नाहीय. त्यामुळे वड- व्रताचा विचार माझ्या मेंदूचा भुगा पण करू शकला नाही. आणि मला वेड पण लागलं नाही. माझं नशीब पण जोरावरच आहे त्यामुळे तू मला आज घरातच भेटलीस. नाही तर…. हो ,माझं आता ठरलंय… सगळ्यांना मी वाचवणारच आहे…. तुझ्या मदतीने ..आणि हो, यापुढे मी त्या घरात राहणार ही नाही.. जर हा जो सगळा बच्चूवाला विचित्रपणा आहे नां तो सोडून… मेडिकल सायन्सची मदत घेऊन… नॉर्मल जीवन जगायला माझा पती तयार असेल तर त्याच्या बरोबर ,नाहीतर त्याच्या शिवाय ,….पण मी आता आत्मसन्मानानं,माझ्या टर्म वर जगणार आहे. ती गेली…
अजय आल्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता सीमानं सगळा वृतांत त्याला सांगितला. दोघांनी मोबाईल मधले डायरीचे फोटो वाचले . हे सगळे खूप गंभीरपणे घ्यायची गरज होती आणि वेळ वाया न घालवता उपाय पण शोधायची गरज होती.अजयने अंनिसच्या पाटील काकांची मदत घेतली.. आणि सगळी चक्र जोरात फिरू लागली. अजय, पाटील काका, वकील, सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, पोलिस यंत्रणा सर्वांनी विचारविमर्श करुन , प्लॅन तयार केला…आणि मंगळवारचा भयंकर प्रसंग घडू न देण्यासाठी ते सज्ज झाले . कोण्या तांत्रिक-मांत्रिकाचा यात हात नसल्याची माहिती त्यांना प्रयत्न केल्यावर मिळाली. त्यामुळे हे कृत्य घरच्यांचे आहे हे उघड झाले .
मंगळवार उजाडला .सीमाचं घर कामात लक्षच लागत नव्हतं. नेमकं खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. आज वटपौर्णिमा !वडावर पूजा करणाऱ्या बायकांची गर्दी दिसली… पण…जशी तिची पारंब्यावर नजर गेली… तसं तिच्या हातापायातलं त्राणच गेलं.
तिच्या मनःचक्षूला पारंब्यांच्याजागी , लोंबकळणारी…. वाऱ्याबरोबर हलणारी,….
जीभ बाहेर आलेली…नऊ प्रेतेच दिसत होती…खिडकी बंद केली तरी डोळ्यासमोरचं ते दृश्य जाईना. मनातली तळमळ जाईना.चेरी येऊ शकेल ना ?….. सगळ्या गोष्टी प्लॅन प्रमाणं होतील ना?….. शंका..शंका….आणि फक्त शंकाच.. मनात थैमान घालत होत्या.
संध्याकाळी चेरी आली. तशी सीमाला हायसं वाटलं. दोघी गळ्यात गळे घालून रडल्या.पण नंतर एकमेकींना धीर देत राहिल्या.कानात- डोळ्यात प्राण आणून दोघी मोबाईलकडे आणि घड्याळाकडे पाहत राहिल्या. घड्याळाचा काटा पुढे सरकतच नाहीय असं दोघींना वाटत राहिलं….. शेवटी एक मोठा मेसेज आला ‘खूप मोठी जीवितहानी टळलीय…. पण माताजी वाचू शकल्या नाहीत.आणि या सगळ्याचा सूत्रधार जीवन मेहता, व त्याला साथ देणारे सर्व – त्याची पत्नी ,भाऊ, आणि बहीण पोलीस कस्टडीत आहेत .या प्रसंगाने भयभीत झालेले इतर कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये अंडर- ऑब्झर्वेशन आहेत.
फोनवर झडप घालून दोघींनी मेसेज वाचला.सीमानं सुटकेचा निश्वास टाकला… प्लॅन तसा खूपसा सक्सेसफुल झाला याबद्दल… पण त्या न पाहिलेल्या माताजींबद्दल तिला हळहळ ही वाटत राहिली….आणि चेरी?…तिची फारच विचित्र अवस्था झाली होती.क्षणात ती देवाचे आभार मानत होती.. तर क्षणात जोर-जोरात रडत होती. तिच्या पाठीवरून हात फिरवत , तिला सांत्वना देता देता सीमा विचार करत होती,’ हे उभ्या घराला लागलेलं खग्रास चंद्रग्रहण आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे लागण्यापूर्वीच सुटले. पण माताजींचा बळी गेलाच…चेरी पुन्हा पुन्हा मेसेज वाचतेय. तिचं दुःख आपण समजू शकतोय…. पण…. त्या बिचारीच्या संसाराला, आशा -आकांक्षांना, उत्साह, उमेदीला, सुखी दांपत्य जीवनाच्या पाहिलेल्या स्वप्नांना.. सगळ्या सगळ्याला लागलेलं एक खग्रास, आजवर न सुटलेलं ग्रहण, कधी सुटेल का? त्यातून ती बाहेर पडेल का?’
एक मोठा सुस्कारा सोडून सीमा निशब्दपणे चेरीकडे पाहत राहिली.
क्रमशः…
कथा समाप्त. पण ज्या सत्यघटनेवर ती आधारित आहे, ती घटना सहाव्या आणि सातव्या भागात.
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈