श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆
लहानपणापासून जोपासलेली डायरी लिहायची सवय म्हणजे नन्दनाचा विरंगुळा होता.आपण लग्नानंतरही नियमीतपणे डायरी लिहायची हे तिने मनोमन ठरवून ठेवलेलं होतं !
…’ माहेर सोडताना मळभ भरून आल्यासारखं आण्णांचं मन गच्च होतं.आतल्याआत गदगदत ते स्वतःला सावरत होते. शेवटच्या क्षणापर्यंत मला मात्र आतून असं भरून येतच नव्हतं. राहुल मला आवडला होता. मिळालाही. त्या आनंदाच्या उर्मीच एवढ्या तीव्र होत्या की आता माहेर अंतरणार असल्याचं दु:ख तेवढ्या तिव्रतेने मला जाणवलंच नव्हतं एवढं खरं. पण शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं कुणास ठाऊक..?..पण माझ्याही नकळत मी आईच्या मिठीत गेले..आणि आतून उन्मळून पडले.पहिल्या श्वासापासून गृहीत धरलेल्या या वटवृक्षाचा आधार सोडताना माझ्यातली वेल जणू मुळापासून हलली होती.त्या वेलीला तसाच भक्कम आधार हवा होता.तो राहुलच्या रूपात मिळेल?…’
हे नन्दनाच्या डायरीतलं लग्नानंतरचं पहिलं पान..! ते लिहून झालं आणि नन्दनालाच आश्चर्य वाटलं.’ राहुलच्या रूपात आपल्याला हवासा वाटणारा आधार मिळेल कां?’ हा प्रश्न आपल्याला पडलाच कसा? राहुलने हे वाचलं तर..?..या कल्पनेनेच ती शहारली.मग डायरी तिने मिटूनच टाकली. कायमची. लिहिण्यासाठीसुद्धा पुढे कितीतरी दिवस तिने ती उघडलीच नाही.
—————–
राहुलला तिने प्रथम पाहिलं तेव्हा ते ‘लग्न’ याच उद्देशाने ! पत्रिका देणं , त्या जमणं , एकमेकांना बघणं , पसंत पडणं , मग सविस्तर बोलणी आणि पुढचे सगळे सोपस्कार. सगळं कसं रीतसर , रूढीप्रमाणे झालेलं. आधीची दोन स्थळं मुलं चांगली असूनही नन्दनाने नाकारली होती. ‘कां’ ते तिला सांगता येत नव्हतं.
आई खनपटीलाच बसली तेव्हा नन्दना थोडी चिडली होती. तिच्या नकाराला आईचा आक्षेप नव्हता. पण तिला नन्दनाकडून समर्पक कारण हवं होतं.नन्दना ते नेमक्या शब्दात व्यक्त करू शकत नव्हती.मुलं देखणी होती. रुबाबदार होती.आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतली होती. पण कां कुणास ठाऊक त्यांच्याकडे पाहून हा आपला जन्माचा जोडीदार असावा असं तिला मनोमन वाटलेलं नव्हतं..!
राहुलकडे पहाताच मात्र..? नंदनाला बघताना,तिला जुजबी प्रश्न विचारताना,राहुलचे मिष्किल डोळे हसत होते. त्या डोळ्यांचं ते हसणं नन्दनाला सुखावून गेलं होतं. जाताना त्याची हसरी नजर चोरपावलानं नन्दनाच्या मनात सहवासाची ओढ पेरुन गेली होती..! राहुल बद्दलची प्रेमभावना त्यामुळेच नैसर्गिकपणे फुलणाऱ्या फुलासारखी नन्दनाच्या मनात उमलंत गेलेली होती..!
एरवी नन्दनाने दिलेल्या आधीच्या एक-दोन नकारांच्या वेळी चिडलेली नन्दनाची आई तिच्या या होकाराने मात्र दुखावली गेली होती. नन्दनाचा होकार तिच्यासाठी अनपेक्षितच होता.
” अजून हातात काही स्थळं आहेत नन्दना.ती पाहू या. उगाच होकाराची घाई कशाला?”
” पण या स्थळात वाईट काय आहे ?” आण्णा नंदनाच्या मदतीला धावले होते.
” ते तुम्हाला समजणार नाही. शेवटी तडजोडी बायकांनाच कराव्या लागतात.तिचं जेव्हा जळेल ना,तेव्हा तिला कळेल,पण तोवर खूप उशीर झालेला असेल”
” तुला एवढी भिती कशाची वाटतेय?”
” चार माणसांचं कुटुंब आपलं.जे हवं ते फारसे हट्ट न करता मिळत आलंय तिला आजपर्यंत.तिथं एकत्र कुटुंबात रहावं लागणाराय.तिला जमणाराय कां सगळं?”
“मला जमेल” नंदना स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली.
अखेर आण्णांनीच आईची समजूत घातली.”अगं, घरचा धंदा व्यवसाय असणाऱ्यांची ‘एकत्र कुटुंब’ ही गरज असते.वेगळे संसार त्यांना सोईचे नसतात आणि परवडणारेही नसतात. नन्दना लाडात वाढलीय हे खरं, पण ती लाडावलेली नाहीय हे नक्की. ती जबाबदारीने सगळं नक्कीच निभावून नेईल.” आई निरुत्तर झाली होती. पण तिच्या कपाळावरच्या आठ्या मात्र लग्नाची तयारी सुरू झाली तरी विरलेल्या नव्हत्या.नन्दनाला राहुलची हसरी नजर खुणावत होती. राहुलची आठवण झाली की त्रासिक चेहऱ्याची आई तिला जास्तच कोरडी, व्यवहारी वाटायला लागायची.एकदम कुणीतरी अगदी परकीच..!
——————-
राहुलच्या घरातलं वातावरण नन्दनाला खूप मोकळं, प्रसन्न वाटलं. तिथे परकेपण नव्हतंच. सुगंधात भिजलेला मोकळा श्वास तिथं राहुलच्या रूपानं स्वागताला उत्सुक होता. राहुलच्या मिठीत तो सुगंध नन्दना भरभरून प्याली. तृप्त झाली. पण…? राहुलच्या सहवासातला आनंद, घरातली प्रसन्नता आणि मोकळेपण..ही सगळी तिच्या स्वतःच्या मनोवृत्तीची तिच्या मनात उमटलेली प्रतिबिंबंच होती हे तिच्या लगेच लक्षात आलंच नसलं तरी हळूहळू तिला ते उमगणार होतंच. म्हणूनच नव्या नवलाईचे सुरुवातीचे दिवस असे धुंदीत तरंगतच गेले.
त्या चार दिवसात माहेरची आठवण तिला आलीच नव्हती. त्या दिवशी आईचा फोन आला आणि नन्दनाला हे घरची आठवण न होणं प्रथमच तीव्रतेने जाणवलं. ‘ तिकडे आई अण्णा मात्र आपली आठवण काढत चार रात्री तळमळत राहिले असतील..’ नुसत्या कल्पनेनंच नन्दनाचे डोळे भरून आले. महत्प्रयासाने तिने दाबून धरलेला हुंदका तिच्याही नकळत फुटलाच.
“नन्दना, काय झालं गं..?”
“नाही..काही नाही..”
” कशी आहेस..?”
“मी..मी छान आहे.मजेत..”
” खरं सांगतेयस ना..?”
“हो गं. तुझी शप्पथ.आई, तू..कशी..आहेस?”
“माझं काय गं..मी बरी आहे..” आईचा आवाजही थोडा ओलावला होताच.”तू मजेत आहे म्हणालीस ना,आता बरं वाटलं बघ.जीवाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. माझ्याही आणि यांच्याही..”
” काहीतरीच काय गं?”
” बरं, ते राहू दे. हे बघ, राहुलच्या आई घरी आहेत कां? मी बोलते त्यांच्याशी. चार दिवस माहेरपणाला पाठवा म्हणून सांगते. चालेल ना?”
नन्दनाला काय बोलावं सुचेचना. जावंसं तर वाटत होतं. पाय मात्र निघणार नव्हता. तेवढ्यात राहुलच्या आईच आल्या.
“आईचा फोन आहे. तुमच्याशी बोलणाराय” तिने आपला मोबाईल त्यांच्या हातात दिला आणि त्याच क्षणी तिच्या मनातला ‘तो’ धागा तिला एकदम तटकन् तुटल्यासारखंच वाटलं. आपण जाऊ,मजेत राहूही.. पण राहुल?.. राहुलच्या आईंनी तिला मोबाईल परत दिला पण त्या दोघी काय बोलल्या हे या भांबावलेल्या अवस्थेत नन्दनाच्या लक्षातच आलं नव्हतं. जावं की जाऊ नये या दोलायमान अवस्थेत नन्दना दिवसभर अस्वस्थच राहिली..! पण… रात्री..?
“आईचा फोन आला होता ना ?” राहुलनं विचारलंच.
” हो आईंशीही बोलली ती. माहेरपणासाठी विचारत होती.”
“तू काय ठरवलंयस?तुला जायचंय?”
राहुलचा स्वर थोडा टोकदार झालेला होता.नन्दनालाही ते जाणवलं.तिने चमकून वर पाहिलं. त्याची नजर नेहमीसारखी हसत नव्हती.
“तू तुझ्या आईला काय बोललीयस? येते म्हणालीयस कां?”
राहुलचा चढलेला स्वर,त्याचं हे असं जाब विचारणं सगळंच नन्दनाला अनपेक्षित होतं. त्याच्या तीक्ष्ण नजरेला नजर देऊन ती फार वेळ पाहूच शकली नाही. तिने आपली नजर खाली वळवली. भरून येतायतसं वाटणाऱ्या डोळयांना तिने निर्धाराने गप्प बसवलं.
“मी येते म्हणालेली नाहीये.ती या विषयावर आईंशी बोललीय. त्या काय म्हणाल्या कुणास ठाऊक ” शक्यतो शांत राहायचा प्रयत्न करीत नन्दना म्हणाली. आणि मग राहूलचा स्वर आणि नजर दोन्ही क्षणात निवळली.
” तू विचारलं नाहीस आईला?” त्याने हसत विचारलं.
“अंहं”
“का ?”
“कां असं नाही..पण..”
” ती नको म्हणेल अशी भिती वाटली का?”
“अजिबात नाही”
“आता मी सांगतो ते शांतपणे ऐक.आईने त्यांना ‘मी राहुलशी बोलून घेते’असं सांगितलं होतं. रात्री त्यांना पुन्हा फोन करायलाही सुचवून ठेवलं होतं. हे बघ.रात्रीचे दहा वाजून गेलेत. कुठं आलाय त्यांचा फोन अजून? आला तर काय सांगायचं?”
… तिच्या मनातला तिचा हसरा राहुल तिची नजर चुकवून कुठेतरी दडून बसलाय असंच तिला वाटत राहिलं. लग्नानंतरचं या घरातलं मोकळं आणि प्रसन्न वातावरण तिला एकदम कोंदट वाटू लागलं. तेवढ्यात तिच्या मोबाईलचा डायलटोन.
” बघ तुझ्या आईचाच असणार.”
नन्दनाने न बोलता मोबाईल उचलला.फोन आईचा नव्हता. आण्णांचा होता.
आण्णांचा आवाज ऐकला आणि नन्दनाला एकदम भरून आलं.
” कसे आहात? तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही ना?”आण्णांनी हसत विचारलं.
” नाही हो. काहीतरीच काय?”
” राहुल आहेत ना तिथे? मी बोलू त्यांच्याशी?”
“हो.. देते.”
” राहुल, अण्णा तुझ्याशी बोलतायत.”
” माझ्याशी? कशाला?” मनातली नाराजी लपवायचा प्रयत्न करीत छान प्रसन्न हसून तिने लटक्या रागाने राहुलकडे पाहिलं.
“असं काय करतोयस रे? घे ना..बोल पटकन्.”
“हां आण्णा. हो.आई बोलली मला. आम्हाला कांहीच हरकत नाहीये..पण.. पण एक मिनिट.” मोबाईल वर हात ठेवून राहुल क्षणभर थांबला.मग हलक्या आवाजात नन्दनाला म्हणाला,
” आई सत्यनारायणाची पूजा करायची म्हणतेय आणि मी त्यानंतरची आपली महाबळेश्वरची बुकिंग केलीयत. बघ काय ठरवतेस? माहेर हवंय की महाबळेश्वर?” नन्दनाकडे पहात तो मिष्किल हसत राहिला.
” तू म्हणशील तसं” ठरवून सुद्धा आपल्या बोलण्यातला कोरडेपणा तिला कमी करता आला नाही. राहुलच्या सूचक नजरेनेसुद्धा ती नेहमीसारखी फुललीच नाही….!
क्रमश:….
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈