श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र- “बघ..काय ठरवतेयस? माहेर हवंय कीं महाबळेश्वर?” नन्दनाकडे पहात राहुलने मिष्किलपणे हसत विचारले.

“तू म्हणशील तसं” नन्दना म्हणाली. ठरवूनसुद्धा आपल्या बोलण्यातला कोरडेपणा तिला कमी करता आला नाहीच. राहुलच्या सूचक नजरेनेसुद्धा ती नेहमीसारखी फुललीच नाही.)

दोन दिवस उलटले तरी घरी पूजेची गडबड जाणवेचना. थोडा अंदाज घेत एक दिवस कामं आवरता आवरता नन्दनाने थेट आईंनाच विचारलं.जवळच प्रभावहिनी म्हणजे नन्दनाच्या मोठ्या जाऊबाईही  कांहीबाही करीत होत्या.

“पूजा रद्द केलीय.पुढे कधीतरी ठरवू..” आई दुखऱ्या स्वरांत म्हणाल्या.

“का..?” नन्दनानं आश्चर्यानं विचारलं.

“योग नव्हता म्हणायचं.. दुसरं काय?”

“योग आणा ना मग. मी ‘नको’ म्हंटलंय कां?” प्रभावहिनी एकदम उसळून अंगावर धावून यावं तसं बोलल्या.

नन्दना त्यांच्या या अवताराकडे पाहून दचकलीच.ती या घरात आल्यापासून प्रभावहिनी मोजकं कांहीसं बोलून गप्प गप्पच असायच्या.धाकट्या जावेला त्यांनी तोडलं नव्हतं तसं फारसं जवळही येऊ दिलं नव्हतं.

आजवरच्या त्यांच्या घुम्या वृत्तीला त्यांचं हे असं खेकसून बोलणं थेट छेद देणारंच होतं. प्रभावहिनींच्या अनपेक्षित हल्ल्याने आई एकदम बावचळूनच गेल्या.काय बोलावं तेच त्यांना समजेना.

“हे बघ,मी नन्दनाशी बोलतेय ना? तू कां मधे पडतेयस?”

“नन्दनाशी बोला, पण जे बोलायचं ते स्पष्ट बोला. मला सांगा, जाऊ कां मी माहेरी निघून? तुमची पूजा आवरली की परत येते..” प्रभावहिनी आईंना ठणकावतच राहिल्या. आई मग एकदम गप्पच झाल्या.

नन्दना बावचळली. प्रभावहिनींचा हा अवतार नन्दनाला अनोळखीच‌ होता. नेमका प्राॅब्लेम काय आहे तेच तिला समजेना.तिनं मग थेट विचारलंच.

“प्रॉब्लेम काय असणाराय..?या..या घरात मी..मीच एक प्रॉब्लेम आहे.”

“कांहीतरीच काय बोलताय वहिनी?”

“खोटं नाही बोलत.विचार बरं त्यांनाच.सांगू दे ना त्यांना.मूग गिळून गप्प नका बसू म्हणावं. काय हो? खोटं बोलत नाहीये ना मी?..सांगाs आहे ना मीच प्रॉब्लेम?”

आई काही न बोलता कपाळाला आठ्या घालून चटचट काम आवरत राहिल्या.नन्दनाला एकदम कानकोंडंच होऊन गेलं.

प्रभावहिनींना एवढं एकदम चिडायला काय झालं तिला समजेचना.

राहुलशिवाय तिच्या मनातल्या या प्रश्नाला नेमकं उत्तर कोण देणार होतं? पण राहुलकडेसुध्दा या प्रश्नाचं नन्दनाचं समाधान करणारं उत्तर नव्हतंच.

“तू त्यांच्या फंदात पडू नकोस”

“फंदात पडू नकोस काय? माझ्यासमोर एवढं रामायण घडलं.आईंचा त्यांनी एवढा अपमान केला..,मी तिकडे दुर्लक्ष करू?”

“मग जा.जा आणि जाऊन वहिनीच्या झिंज्या उपट तू सुद्धा” 

“तू असा त्रागा कां करतोयस?चिडून प्रश्न सुटणाराय कां?”

“प्रश्न आहेच कुठे पण..? असलाच तर तो दादा-वहिनींचा आणि आई-वहिनींचा असेल. आपल्याला काय त्याचं? आपण दुर्लक्ष करायचं आणि मस्त मजेत रहायचं.”

“तू रहा मजेत. मला नाही रहाता येणार.”

“का? अडचण काय आहे तुझी? मला समजू दे तरी.हे बघ, तुझं माझ्याशी लग्न झालंय की त्यांच्याशी? इतरांचा विचार करायची तुला गरजच काय?”

नंदना कांही न बोलता उठली. अंथरूणावर आडवी झाली. राहुलसारखा फक्त स्वतःपुरता विचार करणं तिच्या स्वभावात बसणारं नव्हतं. तिला पटणारं नव्हतं.आणि न पटणारं ती कधी स्वीकारूच शकत नव्हती.

नन्दनाला तिचं लग्न ठरल्यानंतरचं आण्णांचं बोलणं आठवलं.

‘सहजीवन’ कसं असावं हे किती छान समर्पक शब्दांत समजावून सांगितलं होतं त्यांनी. आणि हा राहूल…! कसं स्विकारु त्याला? आणि स्विकारताच आलं नाही तर समजावू तरी कशी?…

‘तिचं जेव्हा जळेल तेव्हाच तिला कळेल.पण तोवर फार उशीर झालेला असेल.’ या शब्दांचा नेमका अर्थ तिला या क्षणी अस्वस्थ करू लागला… लाईट आॅफ करुन राहुल जवळ कधी सरकला तिला समजलंच नव्हतं.त्याचा स्पर्श जाणवला.. आणि..ती एकदम आक्रसूनच गेली. अंग चोरुन पडून राहिली.

“नन्दना..”

“……..”

“गप्प का आहेस तू?” 

“काय बोलू..?”

“तुला एक सांगायचं होतं”

“सांग”

“तू रागावशील”

“नाही रागावणार. बोल”

“आपण महाबळेश्वरला पुन्हा कधीतरी गेलो तर चालेल?”

“कधीच नाही गेलो तरी चालेल”

“बघ चिडलीयस तू”

“………”

“का म्हणून नाही विचारणार?”

“तसंच कांहीतरी कारण असेलच ना‌. त्याशिवाय तू आधीपासून केलेलं बुकिंग रद्द कशाला करशील?”

“आपण पुन्हा नक्की जाऊ.प्रॉमिस.”

“माझी अजिबात गडबड नाही”

“असं का म्हणतेस?”

“महाबळेश्वरला जाऊन भांडत रहाण्यापेक्षा इथे आनंदाने रहाणं मला जास्त आवडेल.”

..हिचं आनंदानं रहाणं महाबळेश्वर-ट्रीपपेक्षा आपल्याला जास्त महागात पडणार आहे या गंमतीशीर विचाराने राहूल हसला. क्षणभर धास्तावलासुद्धा.

             ————

“हे काय गं नन्दना?महाबळेश्वरचं बुकिंग केलं होतं ना भाऊजीनी?”प्रभावहिनींनी  एकटीला बघून नन्दनाला टोकलंच.” त्या आज आपण होऊन आपल्याशी बोलल्या या गोष्टीचं नन्दनाला थोडं आश्चर्यच वाटलं.ती भांबावली.त्यांना काय उत्तर द्यावं तिला समजेचना. प्रश्न सरळ होता मग उत्तर तिरकं कां द्यायचं..?

“हो.बुकिंग केलं होतं”

“मग?”

“कॅन्सल केलं”

“अगं, कमाल आहे. कॅन्सल का केलंस? जाऊन यायचं ना चार दिवस..”

“मी नाही हो.. राहूलनं कॅन्सल केलंय”

“भाऊजींनी? कमालच आहे. पण कां ग? आणि ते सुद्धा तुला न विचारता? आणि तू गप्प बसलीस?”

“हो. गप्प बसले.” नन्दनाला हा विषय वाढू नये असं वाटत राहिलं,म्हणून ती सहज हसत म्हणाली.

“मूर्ख आहेस.” प्रभावहिनी कडवटपणे बोलून गेल्या.

“का मग दुसरं काय करायला हवं होतं मी?”

“गप्प बसायला नको होतंस. हिसकावून घेतलं नाहीस ना तर या घरात तुला कांहीही मिळणार नाही. सुख तर नाहीच,अधिकारसुध्दा नाही.”

प्रभावहिनींचे शापवाणी सारखे शब्द नंदनाच्या मनावर ओरखडे ओढून गेले. तरीही ती हसली.ते हसणं तिला स्वतःलाच कसनुसं वाटत राहिलं. तेवढ्यात आंघोळ करून आई लगबगीने स्वयंपाकघरात आल्या. त्यांच्याकडे पाहून कपाळाला आठ्या घालून प्रभावहिनी गप्प बसल्या.

“नन्दना..”

“काय आई..?”

“राहुल बोलला का गं तुझ्याशी?”

“कशाबद्दल?”

“मीच त्याला म्हंटलं होतं, लग्नानंतरचा सत्यनारायण एकदा होऊ दे मगच जा प्रवासाला”

“हो. बोललाय तो मला.”

“मी आपलं मला योग्य वाटलं ते सांगितलं त्याला.तरीही तुला वाईट वाटलं असलं तर….”

“नाही आई. ठिकाय.”

“तोवर मग माहेरी जाऊन येतेस कां चार दिवस?”

“नाही. नको. माहेरीही नंतरच जाईन सावकाशीने”

आईना ऐकून बरं वाटलं.पण प्रभावहिनी….?

क्रमश:….

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments