श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ भाजी मंडई – भाग (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले – चेहर्‍यावरची उत्तेजना, एखाद्या साहित्यिक समारंभाचा नाही, तर चौकातल्या टपोरींचा आभास निर्माण करत होती. उग्रता आणि संताप वाढत चालला होता.  सगळे हातघाईवर आले होते. आता इथून पुढे – )

जो इंचार्ज होता, त्याला सगळ्यांनी चारी बाजूने घेरलं होतं आणि तो मागे सरकला होता.  आपल्या हातातील प्रशस्तीपत्रकांचं बंडल इकडे-तिकडे विखुरताना तो बघत होता. मंचावर उभे असलेले मुख्य अतिथि आणि अध्यक्ष, काय चाललय काय, असा विचार करत इकडे बघू लागले होते. ज्याचं नाव पुकारलं गेलं होतं, तो सन्मान घेण्यासाठी मंचावर उभा होता, पण सन्मानपत्र तिथपर्यंत पोचलं नव्हतं. गर्दी अशी काही अस्ताव्यस्त झाली होती की भाजी मंडईची आठवण येत होती. ताज्या भाज्यांच्या जागी ताजे छापलेले सन्मानपत्र होते. स्वस्त-महाग भाज्यांप्रमाणे यांचेदेखील वेगवेगळे भाव होते. भेंडी आणि वांगी महाग होती. कांदे-बटाटे सगळ्यात स्वस्त होते. ज्यांना कांद्या-बटाट्यांप्रमाणे सन्मान मिळाला होता, ते सगळ्यात जास्त खूश होते. सध्याच्या काळात नुसतीच भाकरी खाणार्‍यांसाठी कांदे-बटाटे मिळणं हीही  काही कमी भाग्याची गोष्ट नव्हती.   

मोहिनीजींना घाम फुटला होता. कसला विचार केला होता आणि काय घडत होतं. घाबरत घाबरत त्या बॅक स्टेजला गेल्या. सगळ्यांना हात जोडून बसण्याची विनंती केली. स्वत: मंचावर जाऊन माईक सांभाळत अतिशय विनम्रतेने या अव्यवस्थेबद्दल त्यांनी माफी मागितली. परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली पण आत ठिणगी होतीच.  समारंभाच्या प्रमुख, प्रबुद्ध महिला आयोजकाच्या अनुनय-विनयाचा मान ठेवला गेला. दैवी शक्तिची कृपा झाली. लोकांनी संयम ठेवला आणि गप्प बसले. सगळ्यात चांगली गोष्ट आशी झाली की या गडबड-गोंधळाची बातमी बाहेर फुटली नाही कारण स्थानिक लोक खाऊन –पिऊन आधीच निघून गेले होते. कार्यक्रमाच्या चिंध्या उडता उडता राहिल्या.

आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. अशांतजीच्या डोळ्यातून आग उसळत होती, तर मोहिनीजींचे डोळे त्यावर पाणी टाकत होते. पूर्वी राजकीय पुढारीच फक्त घोडेबाजार करायचे. आज साहित्यिकांची फौजच्या फौज या बाजारात उतरली होती. ही फौज साहित्यात कमजोर होती पण लढण्या- लढवण्याच्या बाबतीत तगडी होती. साहित्याच्या नावावर, कांदाभाजीसुद्धा नाही, शिळी भाजी वाढून आपला अहंकार तुष्ट करत होती. आता खा, किंवा उलटी करा. त्यांना काही फरक पडत नव्हता. त्यांनी आपल्या हिश्याचं लिहून दिलं होतं. हे सगळे समारंभाचे शहेनशाह होते. छोटा-मोठा समारंभ नाही. विश्वस्तरीय समारंभ. देशा-विदेशातील साहित्यिक येत होते आणि आपल्या नावापुढे विदेशी पदवी लावून जात होते. संस्थेच्या इतिहासात नाव समाविष्ट होत होतं. त्याचबरोबार प्रशस्तीपत्रकांचा ढीग लागत होता. 

हे सन्मानधारी मग सोशल मीडियाची आणि वर्तमानपत्रांची शान बनत होते. सगळ्या गावात त्यांच्या नावाचा प्रकाश फाकत होता. आपल्या गावातल्या फलाण्या व्यक्तीला विदेशात सन्मान प्राप्त झालाय. भारतातल्या आणि स्थानिक वर्तमानपत्रांत जागोजागी लोकांना मिळालेल्या सन्मानाचे वर्णन असे. सोशल मीडियावर प्रत्येकाने आपल्या पोस्टबरोबर मोहिनीजींचा फोटो लावून त्यांना आदरपूर्वक धन्यवाद दिले होते. एक पोस्ट अनेक ठिकाणी शेअर केलेली होती. यत्र तत्र सर्वत्र या कार्यक्रमाचीच चर्चा होती. मोहिनीची शान आता वाढली होती. तिच्या व्यक्तिमत्वावर आता अनेक चंद्रांची आभा पसरली होती.

अकस्मात भाजी मंडईत कांदे-बटाट्यांचा भाव वाढला होता.

समाप्त

मूळ कथा – भिंडी बाजार    मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments